Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

साईसच्चरित - अध्याय ४५

sai satcharitra chapter 45
, शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (15:10 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
सहज जातें मांडूनि दळतां । जेणें प्रवर्तविलें निज सच्चरिता । काय अलौकिक तयाची कुशलता । भक्त सत्पंथा लाविले ॥१॥
मोक्ष जो कां परमपुरुषार्थ । त्याहूनही गुरुचरण समर्थ । सेवितां ऐसिया गुरुचरणींचें तीर्थ । मोक्ष नकळत घर रिघे ॥२॥
होईल गुरु करुणाकर । तरीच सुखाचा हा संसार । घडोनि येई न घडणार । लावील परपार क्षणार्धें ॥३॥
जरी जाहली इतुकी पोथी । कथा कथिलीसे अति संकलितीं । साईंची ती अगाध कीर्ति । ती म्यां किती वर्णावी ॥४॥
जिचे्नि दर्शनें नित्यतृप्ति । जिचेनि सहवासें आनंदभुक्ती । जिचेनि भवभयविनिर्मुक्ति । ती साईमूर्ति हारपली ॥५॥
जिचेनि परमार्थमार्गप्रवृत्ती । जिचेनि  मायामोहनिवृत्ती । जिचेनि आत्यंतिकक्षेमप्राप्ति । ते साईमूर्ति हारपली ॥६॥
जिचेनि नसे भवभयभीती । जिचेनि जागृत न्यायनीति । जिचेनि संकटीं मनास धृति । ते साईमूर्ति हारपली ॥७॥
ध्यानीं स्थापूनियां निजमूर्ति । साई जाई निजधामाप्रति । निजावतारा करी समाप्ति । हे योगस्थिति अतर्क्य ॥८॥
पूर्ण होतां अवतारकृति । हारपली ती पार्थिवाकृति । तरी हा ग्रंथ ही वाङ्गाय मूर्ति । देईल स्मृति पदोपदीं ॥९॥
शिवाय ह्याचिया कथा परिसतां । मना लाभे जी एकाग्रता । तज्जन्य शांतीची अपूर्वता । केवीं अवर्णीयता वर्णावी ॥१०॥
आपण श्रोते सर्व सुज्ञ । मी तों तुम्हांपुढें अल्पज्ञ । तथापि हा साईंचा वाग्यज्ञ । आदरा कृतज्ञबुद्धीनें ॥११॥
कल्याणप्रद हा वाग्यज्ञ । पुढें करूनि मजसम अज्ञ । पूर्ण करी निजकार्यज्ञ । श्रोते सर्वज्ञ जाणती ॥१२॥
करूनियां एकाग्र मन । अभिवंदूनि साईचरण । महामंगल परम पावन । करी जो श्रवण या कथा ॥१३॥
जो भक्त भक्तसमन्वित । निजस्वार्थ साधावया उद्यत । होऊनियां एकाग्रचित्त । कथामृत हें सेवील ॥१४॥
साई पुरवील तयाचे अर्थ । पुरवील स्वार्थ आणि परमार्थ । सेवा कधींही जाई न व्यर्थ । अंतीं तो कृतार्थ करील ॥१५॥
चव्वेचाळीस अध्याय पोथीं । साईनिर्याण परिसिलें अंतीं । तरीही या पोथीची प्रगती । ही काय चमत्कृति कळेना ॥१६॥
गताध्यायीं साईनिर्याण । यथानुक्रम जाहलें पूर्ण । तरी या साईलीलेची कातिण । विसंबेना क्षणभरी ॥१७॥
पाहूं जातां नवल नाहीं । निर्याण केवळ देहास पाहीं । जन्ममरणातीत हा साई ।  अव्यक्तीं राही पूर्ववत ॥१८॥
देह गेला आकार गेला । अव्यक्तीं जैसा तैसाचि ठेला  । देहनिर्याणामागूनि लीला । आहेत सकळांला अवगत ॥१९॥
वर्णूं जातां त्याही अपार । परी न व्हावा ग्रंथविस्तर । म्हणूनि त्यांतील घेऊं सार । करूं कीं सादर श्रोतयां ॥२०॥
धन्य आमुची भाग्यस्थिती । कीं जे कालीं साई अवतरती । तेच कालीं आम्हां हे सत्यंगती । सहजावृत्तीं लाधली ॥२१॥
ऐसे असतांही चित्तवृत्ति । जरी नपवे संसारनिवृत्ति । जरी न जडे भगवंतीं प्रीति । याहोनि दुर्गति ती काय ॥२२॥
सर्वेंद्रियीं साईंची भक्ति । तीच कीं खरी भजनस्थिति । ना तरी डोळां पाहतां मूर्ति । खिळी दातीं वाचेच्या ॥२३॥
कान ऐकतां साईकीर्तन । रसना मधुर आम्ररसीं निमग्न । करितां साईपादस्पर्शन । मृदूलीवर्जन खपेना ॥२४॥
साईंपासून क्षणही विभक्त । तो काय होईल साईभक्त । तो काय म्हणावा चरणासक्त । संसारीं विरक्त हों नेणें ॥२५॥
एका पतीवांचूनि कोणी । येतां तिचिया मार्गावरुनी । श्वशुर दीर भाऊ जाणूनी । होई वंदनीं सादर ॥२६॥
पतिव्रतेचें निश्चल अंतर । कदा न सांडी आपुलें घर । निजपतीचाच प्रेमा अपार । आजन्म आधार तो एक ॥२७॥
पतिव्रता साध्वी सती । अन्या भावोनियां निजपति । तयाचें दर्शन घ्यावयाप्रती । कधींही चित्तीं आणीना ॥२८॥
तीस आपुला पती तो पती । इतर केव्हांही तया न तुलती । तयाठायींच अनन्य प्रीति । शिष्यही ते रीती गुरुपायीं ॥२९॥
पतिव्रतेच्या पतिप्रेमा । गुरुप्रेमास देती उपमा । परी गुरुप्रेमास नाहीं सीमा । जाणे तो महिमा सच्छिष्य ॥३०॥
मग ना जयाचेनि संसारा साह्यता । तीं काय साह्या येतील परमार्था । असो व्याही जांवयी वा वनिता । भरंवसा कोणाचा धरिया नये ॥३१॥
माता पिता करितील ममता । सत्तेचा पुत्र लक्षील वित्ता । कुंकवालागीं रडेल कांता । कोणी न परमार्था सहकारी ॥३२॥
तरी आतां राहिलें कोण । जयाचेनि परमार्थापादन । करूं जातां विचारें निदान । आपुला आपण अंतीं उरे ॥३३॥
करोनि नित्यानित्यविवेक । त्यागोनि फळभोग ऐहिकामुष्मिक । साधोनियां शमदमादिषट्‌क । मोक्षैकसाधक तो धन्य ॥३४॥
तेणें सोडूनि दुजियाची आस । ठेवावा बळकट आत्मविश्वास । मारावी आपण आपुली कांस । साधेल तयासचि परमार्थ ॥३५॥
ब्रम्हा नित्य जग अनित्य । गुरुरेक ब्रम्हा सत्य । अनित्यत्यागें गुरु एक चिंत्य । भावनासातत्य साधन हें ॥३६॥
अनित्यत्यागें वैराग्यजनन । सद्नुरु ब्रम्हाचैतन्यघन । उपजे भूतीं भगवंतपण । अभेद - भजन या नांव ॥३७॥
भयें अथवा प्रेमें जाण । जया जयाचें नित्य ध्यान । ध्याता होई ध्येयचि आपण । कंस रावण कीटकी ॥३८॥
चिंतनीं व्हावें अनन्यपण । ध्यानासारिखें नाहीं साधन । करी जो अभ्यास आपुला आपण । तया निजोद्धरण रोकडें ॥३९॥
तेथें कैंचें जन्म - मरण । जीवभावासी पूर्ण विस्मरण । प्रपंचाचें मावळे भान । आत्मानुसंधानसुख लाहे ॥४०॥
म्हणोनि निजगुरुनामावर्तवन । तेणेनि परमानंदा जनन । भूतीं भगवंताचें दर्शन । नामाचें महिमान काय दुजें ॥४१॥
ऐसी जयाच्या मानाची महती । तया माझी सद्भावें प्रणती । कायावाचामनें मी त्याप्रती । अनन्यगती यें शरण ॥४२॥
ये अर्थींची द्योतक कथा । कथितों श्रोतयांकरितां आतां । तरी ती ऐकिजे निजहितार्था । एकाग्र चित्ता करूनियां ॥४३॥
कैलासवासी काका दीक्षित । साईसमर्थाआज्ञांकित । नित्यनेमें वाचीत भागवत । आहे कीं अवगत समस्तां ॥४४॥
एके दिवशीं दीक्षितांनीं । काका महाजनी यांचे सदनीं । चौपाटीवर भोजन सारुनी । पोथी नेमानें वाचिली ॥४५॥
एकादशाचा अद्वितीय । ऐसा तो सरस आणि द्वितीय । परिसतां अनुक्रमें अध्याय । श्रोत्यांचें धाय अंतरंग ॥४६॥
माधवराव बाबांचे भक्त । काका महाजनी तयांसमवेत । बैसले ऐकावया भागवत । एकाग्र चित्त करूनियां ॥४७॥
कथाही भाग्यें फारचि गोड । जेणें पुरेल श्रोत्यांचें कोड । जडेल भगवद्भक्तीची आवड । ऐसीच ती चोखड निघाली ॥४८॥
ऋषण - कुळींचे नऊ दीपक । कवि हरि अंतरिक्षादिक । निघालें यांचेंच गोड कथानक । आनंदजनक बोधप्रद ॥४९॥
नऊही ते भगवत्स्वरूप । पोटीं क्षमा शांति अमूप । वर्णितां भागवतधर्मप्रताप । जनक निष्कंप तटस्थ ॥५०॥
काय तें आत्यंतिक क्षेम । काय हरीची भक्ति परम । कैसेनि ही हरिमाया सुगम । नि:श्रेयस उत्तम गुरुचरण ॥५१॥
कर्म अकर्म आणि विकर्म । या सर्वांचें एकचि वर्म । गुरु हेंच रूप - परमात्म । भागवतधर्म गुरुभक्ति ॥५२॥
हरिचरित्र अवतार  गुण । द्रुमिलनाथें केलें निरूपण । पुरुषावताराची दावूनि खूण । रूपें नारायण वर्णिला ॥५३॥
पुढें अभक्तगतिविन्यास । विदेहा कथी नाथ चमस । वेदविहित कर्माची कांस । सोडिल्या हो नाश सर्वस्वीं ॥५४॥
सर्वांतरीं हरीचा वास । म्हणोनि न करावा कोणाचा द्वेष । पिंडीं पिंडी पहावा परेश । रिता न रेस त्यावीण ॥५५॥
अंतीं ननवे करभाजन । कृतत्रेतादि युगींचें पूजन । कैशा कैशा मूर्तींचें ध्यान । करिते निर्वचन जाहले ॥५६॥
कलियुगीं एकचि साधन । हरिगुरुचरणस्मरण । तेणेंच होय भवभयहरण । हें एक निजशरण शरणागता ॥५७॥
ऐसी पोथी जाहल्याअंतीं । काकासाहेब पृच्छा करिती । काय हो ही नवनाथकृति । अतर्क्य वृत्ति तयांची ॥५८॥
आवडीं माधवरावांस वदती । किती हो ही अवघड भक्ति । आम्हां मूढां कैंची हे शक्ति । जन्मजन्मांतीं न घडे हें ॥५९॥
कोठें हे नाथ महाप्रतापी । कोठें आपण ठायींचे पापी । आहे काय भक्ति हे सोपी । सच्चिद्रूपी ते धन्य ॥६०॥
आम्हां ही भक्ति घडेल काय । कैसेन होईल तरणोपाय । जाहलों हताश घळाले पाय । झाला कीं वायफळ जन्म हा ॥६१॥
काकासाहेब भक्त प्रेमळ । असावी जीवास कांहीं हळहळ । सुस्थिरवृत्ति व्हावी कां चंचळ । उडाली खळबळ शामाची ॥६२॥
शामानामें माधवराव । जयांचा काकांलागीं सद्भाव । तयांस काकांचा हा स्वभाव । दैन्याचा प्रभाव नावडला ॥६३॥
म्हणती बाबांसारिखें लेणें । भाग्य लाधलें जयासी तेणें । मुख करावें केविलवाणें । व्यर्थ कीं जिणें तयाचें ॥६४॥
साईचरणीं श्रद्धा अढळ । तरी ही कां मनाची तळमळ । नाथांची भक्ति असेना प्रबळ । आपुलीही प्रेमळ नव्हे का ? ॥६५॥
एकनाथी टीकेसहित । एकादशस्कंध भागवत । वाचावें भावार्थरामायण नित्य । आपणां निश्चित ही आज्ञा ॥६६॥
तैसेंच हरिगुरुनामस्मरण । ही बाबांची आज्ञा प्रमाण । यांतचि आपुलें भवभयतारण । चिंतेचें कारण काय तुम्हां ॥६७॥
परी त्या नवयोग्यांचें चरित । तयांचें तें असिधाराव्रत । साधेल काय आपणा यत्किंचित । चिंतन हें सतत काकांचें ॥६८॥
लागली जीवास मोठी चुटपुट । नवयोग्यांची भक्तिच उद्भट । कवण्या उपायें होईल प्रकट । तरीच मग निकट देव खरा ॥६९॥
असो ऐसी लागली हुरहुर । आसनीं शयनीं हाच विचार । दुसरे दिनीं घडला चमत्कार । श्रोतीं तो सविस्तर परिसावा ॥७०॥
अनुभवाचा पह अनवलाव । प्रात:काळींच आनंदराव । ‘पाखाडे’ हें जयां उपनांव । आले माधवरावा शोधावया ॥७१॥
तेही आले प्रात:काळीं । भागवत वाचावयाचे वेळीं । बैसले माधवरावांजवळी । स्वप्नाची नवाळी सांगत ॥७२॥
इकडे चालली आहे पोथी । तिकडे परस्पर दोघे फुसफुसती । तेणें श्रोत्यांवक्त्यांचे चित्तीं । अस्थैर्यस्थिति पातली ॥७३॥
आनंदराव चंचलवृत्तीं । माधवरावांस स्वप्न कथिती । वदतां परिसतां दोघे कुजबुजती । राहिली पोथी क्षणभर ॥७४॥
काकासाहेब तंव त्यां पुसती । काय ती ऐसी नवल स्थिति । दोघेच तुम्ही आनंद वृत्ति । सांगा न आम्हांप्रती काय कीं ॥७५॥
तंव ते माधवराव वदती । कालच कीं आपणा शंका होती । समाधान घ्या होतोहातीं । तारकभक्तिलक्षण ॥७६॥
परिसा पाखाडयांचें स्वप्न । दिधलें बाबांनीं कैसें दर्शन । होईल आपुल्या शंकेचें निरसन । गुरुपदवंदनभक्ति पुरे ॥७७॥
मग तें स्वप्न ऐकावयाची । प्रबळ जिज्ञासा त्यां सर्वांची । विशेषें काकासाहेब यांची । शंकाही तयांचीच आरंभीं ॥७८॥
पाहोनियां सर्वांचा भाव । स्वप्न सांगे आनंदराव । चित्तीं ठेवूनियां सद्भाव । श्रोत्यांसही नवलाव वाटला ॥७९॥
एका महासमुद्रांत । उभा मी कंबरभर उदकांत । तेथें माझिया द्दष्टिपथांत । आले श्रीसमर्थ अकल्पित ॥८०॥
रत्नखचित सिंहासन । वरी साई विराजमान । उदकांतर्गत जयांचे चरण । ऐसें तें ध्यान देखिलें ॥८१॥
पाहूनि ऐसें मनोहर ध्यान । जाहलें अत्यंत समाधान । तें स्वप्न हें कोणास भान । मन सुखसंपन्न दर्शनें ॥८२॥
काय त्या योगाचा नवलाव । तेथेंच उभे माधवराव । पायां पडा हो आनंदराव । वदले मज भावपुर:सर ॥८३॥
तंव मी तयां प्रत्युत्तर देत । इच्छा माझीही आहे बहुत । परी ते पाय उदकांतर्गत । कैसे मज हातांत येतील ॥८४॥
उदकामाजी पाय असतां । कैसा पायीं ठेवूं माथा । तरी मीं काय करावें आतां । नकळे मज तत्त्वतां कांहींही ॥८५॥
ऐसें परिसूनि माधवराव । परिसा बाबांस  वदले काय । देवा काढ रे वरती पाय । आहेत जे तोयप्रच्छन्न ॥८६॥
ऐसें वदतांच तत्क्षण । काढिले बाबांनीं बाहेर चरण । आनंदरावांनीं मग ते धरून । केलें अभिवंदन अविलंबें ॥८७॥
ऐसे धरितां द्दढ चरण । बाबांनीं दिधलें आशीर्वचन । “होईल जा रे तुझें कल्याण । कांहीं न कारण भीतीचें” ॥८८॥
आणिक बाबा वदले देख । “रेशीमकांठी धोतर एक । शाम्यास माझ्या देऊन टाक । तुज सुखदायक होईल” ॥८९॥
तरी ती वंदून आज्ञा शिरीं । धोतर म्यां आणिलें रेशीमधारी । काकासाहेब आपण तें स्वकरीं । माधवराव स्वीकारी ऐसें करा ॥९०॥
मान्य करा जी ही मम विनंती । माधवराव हें परिधान करिती । करा ऐसें सुखवा मजप्रती । होईन मी अती उपकारी ॥९१॥
आनंदरावाची ही मात । माधवराव स्वयें परिसत । काकासाहेब जंव तें देत । ते न स्वीकारित तें वस्त्र ॥९२॥
तयांचे मनीं हें तों स्वप्न । आम्हांस पटली पाहिजे खूण । द्दष्टान्त कांहीं जाहल्यावीण । घ्यावें न आपण हें वस्त्र ॥९३॥
काकासाहेब तेव्हां वदत । आतां बाबांची पाहूं प्रचीत । घेणें हें उचित अथवा अनुचित । होईल तें सूचित चिठ्ठयांनीं ॥९४॥
देतील बाबा चिठ्ठी जैसी । मानूं तयांची आज्ञा तैसी । चिठ्ठया बाबांचिया पायांपासीं । कृतसंकल्पेंसीं टाकिल्या ॥९५॥
काकासाहेब यांचा भार । होता सर्वस्वीं साईंचियावर । आधीं घ्यावा त्यांचा विचार । करावा तो व्यवहार पुढारा ॥९६॥
हें तों बाबांचे हयातींत । तोच कीं क्रम तयांचे पश्चात । चिठ्ठया टाकूनि आज्ञा घेत । तैसेच ते वर्तत निश्चयें ॥९७॥
कार्य मोठें अथवा सान । चिठ्ठीनें आज्ञा घेतल्यावीण । कांहीं न करणें गेलिया प्राण । अनुज्ञा प्रमाण सर्वथा ॥९८॥
देहचि जेथें नाहीं आपुला । एकदां वाबांच्या पायीं वाहिला । मग तयाच्या चलनवलनाला ।  काय आपुला अधिकार ॥९९॥
पहा या एका भावनेवर । लाखों रुपये कमाईवर । लाथ मारिली परी हा निर्धार । द्दढ आमरणान्त राखिला ॥१००॥
‘फळा येईल तुझें इमान । धाडीन मी तुजलागीं विमान । नेईन त्यांत बैसवून । निश्चिंतमन राहीं तूं’ ॥१०१॥
ही बाबांची प्रसादोक्ति । अक्षरें अक्षर आली प्रचीति । साई - लीलावाचकांप्रति । ठावी निर्गम स्थिति काकांची ॥१०२॥
होतां तया स्थितीचें स्मरण । आणीक तें काय विमानप्रयाण । काय तें आनंदाचें मरा । गुरुनामावर्तनसमवेत ॥१०३॥
ऐसे दीक्षित करारी आपण । चित्तीं निरंतर साईचरण । इष्टमित्रांही देऊनि शिकवण । जाहले विलीन गुरुपायीं ॥१०४॥
आतां पूर्वानुसंधानस्थिति । दोघांही मानली चिठ्ठयांची युक्ति । कारण दोघांची काकांवर प्रीति । चिठ्ठया मग लिहविती अविलंबें ॥१०५॥
एका चिठ्ठींत ‘घ्यावें धोतर’ । दुसरींत ‘त्याचा करावा अव्हेर’ । ऐसें लिहून साईच्या पायांवर । टाकिल्या छायाचित्रातळीं ॥१०६॥
तत्रस्थ एका अर्भकास । त्यांतील चिठ्ठी उचलावयास । लावितां धोतर घ्यावयास । माधवरावांस ये आज्ञा ॥१०७॥
जैसें स्वप्न तैसीच चिठ्ठी । आनंद झाला सकळां पोटीं । मग तें धोतर रेशीमकांठी । घातलें करसंपुटीं शामाचिया ॥१०८॥
त्यांचें स्वप्न यांची चिठ्ठी । परस्परांशीं पडतां मिठी । परमानंद न माय पोटीं । सुखसंतुष्टी उभयांतें ॥१०९॥
माधवराव अंतरीं खूष । आनंदरावासही संतोष । झाला साईभक्ति - परिपोष । आशंकानिरास काकांचा ॥११०॥
असो या सर्व कथेचें सार । ज्याचा त्यानें करावा विचार । ठेविया गुरुपायांवर शिर । गुरुवदनोद्नार लक्षावे ॥१११॥
आपणाहूनि आपुली स्थिति । आपुली भूमिका वा चित्तवृत्ति । गुरु जाणे नखशिखांतीं । उद्धारगतीही तोच ॥११२॥
जैसा रोग तैसें निदान । तैसेंच औषध वा अनुपान । सद्नुरु नेमी शिष्यालागून । भवरोगनिवारणकार्यार्थ ॥११३॥
स्वयें तो जी करितो करणी । आणूं नये आपुले अनुकरणीं । तुम्हांकारणें गुरुमुखांतुनी । निघेल ती वाणी आदरावी ॥११४॥
त्याच शब्दांवर ठेवावें मन । तयांचेंच नित्य करावें चिंतन । तेंच तुमच्या उद्धारा कारण । ठेवा हें स्मरण निरंतर ॥११५॥
गुरु सांगे तें पोथीपुराण । तें तों तद्वचन - स्पष्टीकरण । मुख्य उपदेशीं ठेवा ध्यान । तें निगमज्ञान आपुलें ॥११६॥
कोणाही संताचें वचन । त्याचा करूं नये अवमान । आपुली माय आपुली जतन । करील ती अन्य कोण करी ॥११७॥
खरा  मायेचा जिव्हाळा । लेंकुरालागीं तिचा कनवाळा । बाळ नेणे तो सुखसोहला । घेईल तो लळा ती पुरवी ॥११८॥
संत सृष्टीमाजीं उमाप । “आपुला बाप तो आपुला बाप” । साईमुखींचे हे करुणालाप । कोरा स्वह्रदयपटावरी ॥११९॥
म्हणोनि साईमुखींचें वचन । तेथेंच ठेवा अनुसंधान । अंतीं तोच कृपानिधान । तापत्रय शमन करील ॥१२०॥
तोच जाणे त्याची कळा । आपण पहावें कौतुक डोळां । काय अद्भुत तयाच्या लीला । सहज अवलीला घडती ज्या ॥१२१॥
दुसरा एक म्हणतो म्हणून । त्यांचें सर्व घ्यावें ऐकून । मोडूं न द्यावें निजानुसंधान । निजगुरुवचन विसरूं नये ॥१२२॥
यांतचि आहे परमकल्याण । यांतचि आहे भवभयतरण । यांतचि अवघें पोथीपुराण । जपतपानुष्ठानचि हें ॥१२३॥
सारांश प्रेम करा गुरुवर । अनन्यभावें नमस्कार । दिनकरापुढें कैंचा अंधार । तयांसी भवसागर नाहींच ॥१२४॥
असा ऐसें हें लिहितां । कथा एक आठवली चित्ता । एकाचें पाहूनि दुज्यानें करितां । कैसिया आपदा होत जीवा ॥१२६॥
एकदां बाबा मशिदींत । असतां म्हाळसापतींसमवेत । पूर्वील फळीची शेज अवचित । स्मरे सकल्पित तयांतें ॥१२७॥
रुंदी अवघी सव्वा वीत । दोनी टोंकांस चिंध्या बांधीत । मशिदीचिया आढयास टांगीत । झोंपाळा करीत तियेचा ॥१२८॥
निजूं नये अंधारांत । तदर्थ उशा - पायथ्यालगत । ठेवूनि रात्रौ पणत्या जळत । बाबा निजत फळीवर ॥१२९॥
या फळीचें समूळ वृत्त । पूर्वील एका अध्यायांत । आधींच वर्णिलें आहे येथ । परिसा कीं महत्त्व तियेचें ॥१३०॥
एकदां या फळीची महती । मनोभावें बाबा वर्णिती । काकासाहेब दीक्षितां चित्तीं । उदेली वृत्ती ती परिसा ॥१३१॥
म्हणती मग ते बाबांप्रती । फळीवरी शयनप्रीती । असेल तरी ती टांगतों प्रीतीं । मग  स्वस्थचित्तीं पहुडावें ॥१३२॥
बाबा तयांस प्रत्युत्तर देती । “खालीं टाकून म्हाळसापती । आपणचि वर निजावें केउती । बरा मी खालती आहें तो” ॥१३३॥
त्यावर काका अतिप्रीति । आणीक फळी टांगूं म्हणती । आपण निजावें एकीवरती । म्हाळसापती दुसरीवर ॥१३४॥
त्यावरी पहा बाबांचें उत्तर । तो का निजतो फळीवर । जयाअंगीं गुण - प्रकर । तोच फळीवर निजेल ॥१३५॥
नाहीं फळीवर शयन सोपें । कोण तियेवर मजवीण झोंपे । नयन उघडे निद्रालोपें । तयासचि झेपे हें शयन ॥१३६॥
मी जैं करूं लागें शयन । तैं मी करीं यासी आज्ञापन । ‘कर मद्‌ह्रदयावरी ठेवून । राहीं बैसून सन्निध’ ॥१३७॥
तेंही काम यास न होई । बसल्या जागीं डुलक्या घेई । तया न फळी ही कामाची कांहीं । फळी ही बिछाईत माझीच ॥१३८॥
‘नामस्मरण चाले ह्रदयांत । पाहें तेथें ठेवून हात । निजतां मी मज करीं जागृत’ । ऐसा अनुज्ञापित तो असतां ॥१३९॥
त्यासचि निद्रा लागतां जड । कर हो त्याचा जैसा दगड । “भगत” म्हणतां नेत्रांची झापड । उडूनि खडबड जो करी ॥१४०॥
बसवे न जया धरेवर । आसन जयाचें नाहीं स्थिर । जो नर निद्रातमकिंकर । निजेल उंचावर केवीं ॥१४१॥
म्हणोनि ‘आपुलें आपुल्यासंगें । दुजियाचें तें दुजियासंगें’ । हें तों बाबा वेळप्रसंगें । भक्तानुरागें अनुवदत ॥१४२॥
अगाध साईनाथांची करणी । म्हणूनि हेमाड लागला चरणीं । तयांनींही कृपाशीर्वचनीं । ठेविला निजस्मरणीं अखंड ॥१४३॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीगुरुचरणमहिमा नाम पंचचत्वारिंशोत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
ALSO READ: साईसच्चरित - अध्याय ४६

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साईसच्चरित - अध्याय ४४