Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Asian Games 2023: भारतीय महिला फुटबॉल संघाचा चायनीज तैपेई कडून 2-1 असा पराभव

football
, शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (07:28 IST)
हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाला चायनीज तैपेईकडून 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. भारताने उत्तरार्धात एका गोलच्या जोरावर चायनीज तैपेईवर 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, सामन्याच्या शेवटच्या क्षणी दोन गोल गमावल्याने टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. उत्तरार्धाच्या सुरुवातीला अंजू तमांगने भारताला आघाडी मिळवून दिली होती, मात्र चायनीज तैपेईने 69व्या आणि 87व्या मिनिटाला गोल नोंदवत विजयाची नोंद केली. चायनीज तैपेईकडून लाइ ली चिन आणि हसू यू सुआन यांनी गोल केले.
 
सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष फुटबॉल संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात चीनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता आशालता देवींच्या नेतृत्वाखालील महिला फुटबॉल संघालाही हाच निकाल पाहावा लागला. या सामन्यात भारतीय संघ पहिली 60 मिनिटे आघाडीवर होता.टीम इंडिया चायनीज तैपेईला चकित करेल आणि अपसेट खेचून आणेल असं वाटत होतं, पण तसं होऊ शकलं नाही. अखेरच्या काही क्षणांमध्ये भारतीय बचावपटूंच्या चुकांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. 
 
भारतीय महिला संघाला ब गटात चायनीज तैपेई आणि थायलंडसह स्थान देण्यात आले आहे. आता टीम इंडियाला 24 सप्टेंबरला थायलंडशी सामना करायचा आहे. भारतासाठी हा करा किंवा मरोचा सामना असेल. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी थायलंडविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे.

पाच गटांतील अव्वल संघ आणि प्रत्येक गटातील तीन सर्वोत्तम उपविजेत्या संघांना उपांत्यपूर्व फेरीसाठी म्हणजेच अंतिम आठसाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल. गेल्या वेळी 2018 आशियाई खेळांमध्ये टीम इंडिया 11 संघांमध्ये नवव्या स्थानावर होती. भारतीय संघाला यंदा आपली कामगिरी सुधारायची आहे. स्वीडनचे थॉमस डेनरबी हे भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांच्या देखरेखीखाली नायजेरियाचा महिला संघ फिफा विश्वचषकाच्या 16 च्या फेरीत पोहोचला होता.
 



Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यूएनएससी: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी व्लादिमीर पुतिनवर केले आरोप