Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बृजभूषण सिंह यांची तक्रार पंतप्रधानांकडे केली होती-विनेश फोगाट

बृजभूषण सिंह यांची तक्रार पंतप्रधानांकडे केली होती-विनेश फोगाट
, बुधवार, 3 मे 2023 (15:13 IST)
2021 मध्ये झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकनंतर भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती असा दावा जंतरमंतरवर आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी केला आहे.बीबीसीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत सांगितलं पण त्यावेळी लैंगिक छळाच्या तक्रारीसंदर्भात बोलणं झालं नाही.
 
पंतप्रधानांशी बोलणं झाल्यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी आणखी सविस्तर बोलणं झाल्याचं विनेश यांनी सांगितलं. पण हे सगळं बृजभूषण यांना समजलं.
 
आरोपांवर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, सरकारसाठी खेळाडू आणि खेळ हे प्रथम प्राधान्य आहे. याबाबत कोणतीही तडजोड होणार नाही.
 
अनुराग ठाकूर यांनी जंतरमंतरवर आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंशी तीन महिन्यांपूर्वी चर्चा केली होती. बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध कथित लैंगिक छळाच्या आरोपांवरुन कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत.
 
जीवाला धोका असल्याची भीती विनेश यांनी व्यक्त केली. ओव्हरसाईट समितीच्या सदस्यांशी संपर्क करणं कठीण झालं आहे. समितीचं अध्यक्षपद मेरी कोम यांना देण्यापूर्वी त्यांना त्या उपलब्ध आहेत की नाही हे विचारण्यात आलं नाही असं विनेश म्हणाल्या.
 
आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होत आहेत. पुढच्या वर्षी ऑलिम्पिक असल्यामुळे पात्रता फेरी स्पर्धाही सुरू आहेत. अशावेळी कुस्तीपटू आंदोलनात असतील तर कसं होईल यावर विनेश म्हणाल्या, "हे सगळं कोणाच्या कानावर पडतं आहे की नाही ठाऊक नाही. कोणाला उत्तरदायित्व आहे की नाही ठाऊक नाही. एखादा सर्वसामान्य माणूस इतका ताकदवान कसा होऊ शकतो"?
 
एकीकडे कुस्तीपटू बृजभूषण यांच्यावर आरोप करत आहेत दुसरीकडे कुस्तीपटूंवरही आरोप होत आहेत. लैंगिक छळासारखं गंभीर प्रकरण असूनही त्यांनी आधी पोलिसात तक्रार का दाखल केली नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
 
ब्रृजभूषण यांच्याबरोबर फोटोत कुस्तीपटू दिसत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर येत आहेत.
दिल्लीत जंतरमंतर इथे विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया आंदोलनाला बसले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात त्यांनी कथित लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मात्र सिंह यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
 
सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी दोन एफआयआर दाखल केले. पण कुस्तीपटूंचं आंदोलन सुरूच आहे. कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण यांच्या अटकेची मागणी केली आहे.
 
बीबीसी प्रतिनिधी अनंत झणाणे यांच्याशी बोलताना ब्रृजभूषण सिंह म्हणाले, "दिल्ली पोलिसांनी अद्याप तरी बोलावलेलं नाही. मी तपासात पूर्ण सहकार्य करेन".
 
याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री तसंच अन्य भाजप नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
विनेश फोगाट यांनी पंतप्रधानांशी झालेल्या भेटीबाबत सांगितलं, "टोक्यो ऑलिम्पिकनंतर आम्ही सगळे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. त्यावेळी मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. ते अशा पद्धतीने त्रास देत आहेत वगैरे. लैंगिक छळाच्या तक्रारींबाबत मी त्यांना जाहीरपणे सांगितलं नाही. पण मानसिक त्रास देत आहेत हे सांगितलं".
 
विनेश यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "तुम्ही चिंता करु नका. आम्ही इथे कार्यरत आहोत. कोणी तुम्हाला त्रास देईल असं होऊ देणार नाही. आम्ही इथे आहोत".
 
यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचीही भेट घेतली. त्यांना या सगळ्याबद्दल सांगितलं. पण या सगळया गोष्टी मंत्रालयातून बाहेर पसरल्या. त्यामुळे विश्वासाला तडा गेल्या असं विनेश यांनी सांगितलं.
 
जीवाला धोका
बीबीसीशी बोलताना विनेश यांनी जीवाला धोका असल्याचंही सांगितलं. "ब्रृजभूषण तुरुंगाबाहेर असतील तर आम्ही कुस्ती कशी करणार? असा सवाल विनेश यांनी केला. आमच्या घरचे अडचणीत आहेत. आम्ही याप्रकाराविरुद्ध आवाज उठवल्याने त्यांना त्रास होतो आहे. ब्रृजभूषण यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत ते पाहता त्यांना अटक व्हायला नको का? त्यांच्या जागी सर्वसामान्य माणूस असता तर केव्हाच अटक झाली असती".
 
जंतरमंतरवर अतिशय कडेकोट सुरक्षाव्यवस्था आहे. कुस्तीपटूंचं आंदोलनस्थळ पोलिसांच्या बॅरिकेड्सनी संरक्षित आहे. येणाऱ्याजाणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. बॅगांचीही तपासणी केली जात आहे.
 
रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या मंचावर गाद्या अंथरण्यात आल्या आहेत. पण कळत नकळत चप्पल घालून गादीवर बसणाऱ्यांची संख्याही बरीच आहे.
 
शामियानाच्या एका कोपऱ्यात विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया विश्रांती घेतात किंवा बोलत असतात किंवा कोणत्या तरी गडबडीत दिसतात.
 
गेले काही दिवस उन्हाळ्याचा तडाखा वाढला आहे. डासांची समस्याही आहे. आंदोलनाच्या ठिकाणी वीजपुरवठा नसल्याने अनेक लोक नाराज दिसले. आजूबाजूच्या काही खोल्यांमध्ये प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
ब्रृजभूषण राजीनामा देण्यास तयार नाहीत. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी कोणावरही अन्याय केलेला नाही, कोणाबरोबरही गैरवर्तन केलेलं नाही, कोणालाही त्रास दिलेला नाही. मी या कुस्तीपटूंना मुलासारखं वागवलं आहे. मी त्यांचा आदरच केला आहे. दुर्देव हे की त्याच आदरसन्मानाने माझ्या गळ्याभोवती फास रचण्यात आला आहे".
 
एफआयआरनुसार पॉक्सो अक्टअंतर्गत गुन्हा दाखल होऊनही अटक कशी झाली नाही? यावर ब्रृजभूषण म्हणाले याबाबत दिल्ली पोलीस उत्तर देऊ शकतात.
 
याप्रकरणाचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही. याप्रकरणामुळे माझ्या प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले.
 
आंदोलनात सहभागी होणारी माणसं
ब्रृजभूषण विचारतात, "या खेळाडूंनी इतका प्रदीर्घ काळ आरोप का केले नाहीत? तपास पूर्ण होण्याची वाट का पाहत नाहीत? कोणत्या मागणीसाठी जंतरमंतर इथे आंदोलनाला बसले आहेत. मी राजीनामा दिला तर दिल्ली पोलिसांचा तपास संपेल का? मी न्यायव्यवस्थेपेक्षा मोठा आहे का? अपराधी बनून मी राजीनामा देणार नाही".
 
आंदोलन पाहण्यासाठी अनेक नेते उपस्थित राहत आहेत. तुघलकाबादला राहणारी सानिया कबड्डी खेळते. भाऊ यासिरच्या बरोबरीने ती आंदोलनस्थळी आली आहे. 17वर्षीय सानिया तीन वर्ष कबड्डीचे बारकावे शिकते आहे.
"सुरुवातीला मला आवड होती, हळूहळू हेच करावं असं वाटू लागलं. कबड्डीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावं अशी इच्छा आहे".
 
सानिया सांगते, "या कुस्तीपटूंबरोबर जे झालं ते माझ्याबरोबरबी होऊ शकतं. त्यामुळे मुली घाबरून गेल्या आहेत. मला वाटतं सगळ्या मुलींनी यावं आणि कुस्तीपटूंच्या पाठिंबा द्यावा. आज मी एकटी आले आहे. उद्या अख्ख्या टीमला घेऊन येणार आहे".
 
राहुल भीलवाडा सहा वर्षांच्या मुलीसह करोल बागहून जंतरमंतर इथे आले आहेत.
 
"हे कुस्तीपटू आहेत. हे अन्यायाविरोधात आंदोलन करु शकतात. ज्या मुली अन्यायाविरोधात-त्रासाविरोधात बोलू शकत नाहीत त्यांचं काय होणार? आमच्या लेकी सुरक्षित असणं आवश्यक आहे".
 
इम्रान कलेर कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना गेल्या 15-20 वर्षांपासून ओळखतात. त्यांनी सांगितलं, "आम्ही त्यांना देवच मानतो. राज्यस्तरीय स्पर्धेत ज्याला पदक मिळतं तो मोठा कुस्तीपटू मानला जातो. बजरंग तर ऑलिम्पिक पदकविजेता आहेत. माझी सरकारला विनंती आहे की या कुस्तीपटूंचं ऐकावं. हे खूप मोठे खेळाडू आहेत. यांच्यापुढे शाहरुख खान, सलमान खान काहीच नाहीत. कधी सेलिब्रेटीच्या मुलाने देशासाठी पदक जिंकलं आहे का"?
 
दरम्यान आठवडाभरानंतरही कुस्तीपटूंचं आंदोलन सुरूच आहे. विनेश सांगतात, "राजकारण खेळावर भारी पडताना दिसत आहे. मला एकदम हताश वाटतं आहे".
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

The first cyclone of the year वर्षातील पहिल्या चक्रिवादळाची चाहूल