Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फिफा विश्‍वचषक स्पर्धा; पराभवामुळे विरला पहिल्या गोलचा आनंद

football under 17
कोलंबियासारख्या कसलेल्या संघाविरुद्ध किमान दोन वेळा भारताला विजयी गोल करण्याची संधी मिळाली होती. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या 46 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाने जीकसन सिंगच्या ऐतिहासिक गोलमुळे 1-1 अशी बरोबरीही साधली होती. परंतु युआन पेनॅलोझाने पुढच्याच मिनिटाला दुसरा गोल नोंदविताना कोलंबियाचा विजय निश्‍चित केला.
 
अर्थात 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील या पराभवानंतरही भारतीय संघाची मान ताठ होती. त्यातही जीकसन सिंगने फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील भारताचा पहिलावहिला गोल नोंदविल्यामुळे त्याच्यावर प्रकाशझोत होताच. परंतु भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे ऐतिहासिक गोल करण्याचा आनंद विरला, अशी कबुली जीकसनने सामन्यानंतर दिली.
 
आमची या सामन्यात विजय मिळविण्याची क्षमता होती आणि पात्रताही. परंतु नशिबाने साथ न दिल्यामुळे आमचा विजय हुकला, असे सांगून जीकसन म्हणाला की, भारताने विजय मिळविला असता, तरच माझ्या गोलला अर्थ होता. अर्थात या पराभवातून आम्हाला मोठा धडा मिळाला आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण करताना असे धडे आवश्‍यकच असतात. आम्ही यातून शिकून आमच्यात निश्‍चितच सुधारणा घडवून आणू.
 
मणिपूरमधील हावखा ममांग या खेड्यातील जीकसन हा रहिवासी. त्याच्या वडिलांना दोन वर्षांपूर्वी हृदयविकारामुळे मणिपूर पोलीस दलातील नोकरी सोडावी लागली. त्यानंतर आईने भाजीपाला विकून मिळविलेल्या तुटपुंज्या कमाईवर त्याच्या कुटुंबाची गुजराण होत होती. दरम्यान जीकसनला दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय निवड समितीने पसंती दिली नाही. परंतु या धक्‍क्‍यातून सावरून त्याने फिफा 17 वर्षांखालील भारतीय संघात स्थान मिळविण्यापर्यंत मजल मारलीच.
 
आता वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याचे जीकसनचे स्वप्न आहे. काही झाले तरी फिफा विश्‍वचषक स्पर्धेत भारताचा पहिलावहिला गोल नोंदविणारा खेळाडू म्हणून इतिहासात त्याचे नाव अजरामर झाले आहेच.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किरकोळ कारणावरुन थेरगावात तरुणावर कोयत्याने वार