पुणे शहर पोलीस महिला कॉन्स्टेबल हेमलता घोडके यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. पंच परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या घोडके महाराष्ट्रातील पहिल्या महिला कुस्तीगीर आहेत. कंबोडिया येथे झालेल्या साऊथ एशियन गेम्स मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या पंच परीक्षेचा निकाल नुकताच आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या वेबसाईट वर प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये हेमलता यांनी घवघवीत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकवला आहे.
घोडके पुणे शहर पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. महिला कुस्तीगीर म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके त्यांनी मिळवली आहेत. भारतीय कुस्ती महासंघाची राष्ट्रीय पंच म्हणून अनेक स्पर्धेत त्यांनी निःपक्षपाती पणे न्यायदानाचे काम केले आहे. त्यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, कुस्तीशौकीन, प्रशिक्षक मार्गदर्शक यांनी अभिनंदन केले आहे.