यावर्षी 30 ऑक्टोबर ते 27नोव्हेंबर या कालावधीत भारत बुद्धिबळ विश्वचषक आयोजित करेल आणि या स्पर्धेचे यजमान शहर योग्य वेळी जाहीर केले जाईल, अशी घोषणा जगातील सर्वोच्च बुद्धिबळ संघटना FIDE ने सोमवारी केली.
या स्पर्धेत 2026 च्या FIDE उमेदवार स्पर्धेसाठी प्रतिष्ठित विजेतेपद आणि पात्रता स्थानांसाठी 206 खेळाडू स्पर्धा करतील. भारताने शेवटची स्पर्धा 2002मध्ये हैदराबाद येथे आयोजित केली होती. त्यावेळी विश्वनाथन आनंदने विजेतेपद जिंकले होते.
आगामी स्पर्धेत, खेळाडू नॉकआउट स्वरूपात स्पर्धा करतील, जिथे प्रत्येक फेरीत पराभूत होणारा खेळाडू बाहेर पडेल. FIDE ने म्हटले आहे की, 'विश्वचषकातील अव्वल तीन क्रमांकाचे खेळाडू 2026 च्या उमेदवार स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील.'
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्टार खेळाडूंमध्ये विद्यमान विश्वविजेता डी गुकेश, 2023 विश्वचषक उपविजेता आर प्रज्ञानंद आणि सध्याचा जागतिक क्रमवारीत पाचवा क्रमांकाचा अर्जुन एरिगाईसी यांचा समावेश आहे.
“बुद्धिबळाची तीव्र आवड असलेल्या भारतात, 2025 चा FIDE विश्वचषक आयोजित करण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत,” असे FIDE चे सीईओ एमिल सुतोव्स्की यांनी एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.