Women's Hockey World Cup 2022 च्या विश्वचषक स्पर्धेतील भारतीय महिला हॉकी संघाचा प्रवास संपला आहे. या संघाला क्रॉसओव्हर सामन्यात यजमान स्पेनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. स्पेनने टीम इंडियाचा 1-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात विजय आवश्यक होता. या पराभवामुळे भारतीय महिला हॉकी संघाला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.
याआधी गट फेरीत भारताने इंग्लंड आणि चीनविरुद्ध1-1 अशी बरोबरी साधली होती. त्याचवेळी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 4-3 असा पराभव झाला. राणी रामपालशिवाय आणि सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक खेळायला गेलेल्या टीम इंडियाला आता नवव्या ते 16व्या स्थानापर्यंतच्या वर्गीकरणाच्या सामन्यात कॅनडाशी सामना करावा लागणार आहे. हा सामना 11 जुलै रोजी होणार आहे. यानंतर भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल स्पर्धेतही सहभागी व्हायचे आहे. त्याचवेळी पुढील फेरीत स्पेनचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
56 मिनिटापर्यंत दोन्ही संघांची स्कोअर 0-0 अशी होती. 57 व्या मिनिटाला तीन मिनिटे बाकी असताना स्पेनने गोल केला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर टीम इंडिया गोल करण्यात अपयशी ठरली.
स्पर्धेच्या स्वरूपानुसार, 16 संघांना प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक पूलमधील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेले संघ क्रॉसओव्हर होतील.
क्रॉसओव्हरमध्ये, पूल ए मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना डी पूलमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल, तर पूल अ मध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना डी पूलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल.
त्याचप्रमाणे ब गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना क गटातील तिसऱ्या स्थानावरील संघाशी होईल. तर पूल ब मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला संघ पूल सी मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल. या चार सामन्यांतील विजेते उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.