पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकापासून वंचित राहिलेला स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने डेन्मार्क ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली आणि पहिल्याच फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने महिला एकेरी प्रकारात शानदार सुरुवात केली आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.
पुरुष एकेरी गटात लक्ष्यला चीनच्या लू गुआंग जूविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागली. माजी वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता लक्ष्य सुरुवातीचा गेम सहज जिंकूनही त्याच्या संधीचे रुपांतर करू शकला नाही. चीनच्या खेळाडूने त्याला 70 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-12, 19-21, 14-21 असे पराभूत केले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या 22 वर्षीय खेळाडूला गेल्या आठवड्यात फिनलंडमध्ये आर्क्टिक ओपनच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने दुसरी फेरी गाठली आहे. पोने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सिंधू 21-8, 13-7 अशी आघाडीवर होती. मालविका बनसोडला महिला एकेरीच्या आणखी एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मालविकालाही सुरुवातीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. तिला व्हिएतनामच्या गुयेन थुई लिन्हने 21-13, 21-12 ने पराभूत केले.