कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे महाराष्ट्र केशर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नाही. मात्र यंदा 4 ते 9 एप्रिल दरम्यान केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला.
यावर्षीची 64 वी वरिष्ठ गट गादी व मातीवरील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होईल. ज्युनिअर व सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी 18 ते 20 एप्रिलदरम्यान भोसरी- पिंपरी चिंचवड येथील मारुती सावजी लांगडे कुस्ती हॉलमध्ये होईल.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक (कै.) मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात झाली. तेथे हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते होते. या वेळी उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, गणेश कोहळे, हनुमंत गावडे, संभाजी वरुटे, दयानंद भक्त, सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे, खजिनदार सुरेश पाटील, तांत्रिक सचिव बंकट यादव, विभागीय सचिव सुनील चौधरी, वामनराव गाते, भरत मेकाले, मुरलीधर टेकुलवार, संपत साळुंखे, शिवाजी धुमाळ, सुभाष घासे, सुभाष ढोणे, विनायक गाढवे, ललित लांडगे आदी उपस्थित होते.