Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सानिया मिर्झा टेनिसला अलविदा म्हणणार का?

सानिया मिर्झा टेनिसला अलविदा म्हणणार का?
, गुरूवार, 20 जानेवारी 2022 (10:59 IST)
-आदेश कुमार गुप्त
भारतात जेव्हाही टेनिसचा विषय निघतो आणि त्यातही महिला टेनिसची चर्चा झाली तर एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सानिया मिर्झा.
 
यशाच्या शिखरांपासून ते वादांच्या खाच खळग्यांपर्यंत तिनं सर्व काही अनुभवलं आहे. आता तिनं यंदाचा हंगाम तिचा अखेरचा हंगाम असेल अशी घोषणा केली आहे. एवढंच नाही तर हंगामही पूर्ण खेळू शकेल की नाही, हे माहिती नसल्याचं सानिया म्हणाली.
 
सानिया मिर्झा वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये यूक्रेनच्या नादिया विक्टोरिवना किचेनोक बरोबर महिला दुहेरीच्या सामन्यात उतरली होती.
 
सानिया-नादियाच्या जोडीला 12 वं मानांकनही मिळालं होतं. पण पहिल्याच फेरीत बिगर मानांकित जोडी स्लोव्हेनियाची काजा जुवान आणि तमेरा झिदानसेक यांच्याकडून त्यांना 6-4,7-6 नं पराभवाचा सामना करावा लागला.
 
हा सामना एक तास 37 मिनिटं चालला. या सामन्यात सानिया मिर्झाला आता टेनिस रॅकेट खाली ठेवण्याची वेळ आली असल्याची जाणीव करून झाली. कारण तिचं शरीर तिला साथ देत नाही.
 
"आज माझ्या गुडघ्यांमध्ये वेदना होत आहेत. आम्ही त्यामुळं हरलो असं नाही. पण आता दुखापतीतून सावरायला वेळ लागत आहे असं वाटत आहे. कारण वय वाढत आहे. माझ्यामध्ये प्रत्येक दिवसाचा तणाव सहन करण्यासाठी पूर्वीप्रमाणे ऊर्जा आणि प्रेरणा नाही," असं तिनं म्हटलं.
 
15 नोव्हेंबर 1986 ला हैदराबादमध्ये जन्मलेल्या सानिया मिर्झाचं वय 35 पेक्षा अधिक झालं आहे. सानियानं 2019 मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर टेनिसमध्ये पुनरागमन केलं.
 
मात्र, कोरोनाच्या संकटानं तिची वाट अडवली. सानियाचा मुलगा तीन वर्षांचा असून, त्याला सोबत घेऊन प्रवास केल्यानं त्याच्यासाठी धोका पत्करत असल्याचं तिला वाटत आहे.
 
सानिया मिर्झा भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू आहे. महिला दुहेरीच्या अत्यंत दर्जेदार खेळाडूंपैकी ती एक आहे. महिला एकेरीतही तिनं जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडुंमध्ये सहभागी असलेल्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हा, वेरा ज्वोनारेवा, मारियन बार्तोली आणि अव्वल मानांकित राहिलेल्या मार्टिना हिंगिस, दिनारा सफिना आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांना अनेकदा पराभूत केलं आहे.
 
साल 2007 मध्ये महिला एकेरीत तिला 27 वं मानांकन मिळालं होतं. त्यानंतर मनगटाच्या दुखापतीनं तिला ग्रासलं आणि केवळ दुहेरीचीच खेळाडू म्हणून तिचा खेळ मर्यादित झाला. दुहेरीमध्ये मात्र तिची कामगिरी चांगलीच यशस्वी ठरली.
 
टेनिस करिअरमध्ये तिनं 43 दुहेरी किताब जिंकले यावरूनच तिच्या यशस्वी कारकिर्दीचा अंदाज येऊ शकतो. 2015 मध्ये ती दुहेरीतील जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू होती.
webdunia
सहा ग्रँडस्लॅममध्ये दुहेरीचे विजेतेपद
कोणत्याही टेनिसपटूच्या यशाचं मूल्यमापन हे त्यानं कारकिर्दीत जिंकलेल्या टेनिस ग्रँडस्लॅमच्या आधारे केलं जातं. सानिया मिर्झासाठी 2015 हे वर्ष जीवनातील सर्वात आनंदाचं वर्ष ठरलं. तिनं आधी विम्बल्डन आणि नंतर यूएस ओपन ग्रँडस्लॅममध्ये महिला दुहेरीची विजेतेपदकं मिळवली.
 
दोन्ही स्पर्धांत तिची जोडीदार स्वित्झरलँडची मार्टिना हिंगिस होती. त्यानंतर मार्टना हिंगिसच्याच साथीनं तिनं 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचा किताबही जिंकला.
 
सानिया मिर्झानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं 2015 मध्ये डब्ल्यूटीए फायनल्सचा किताबही जिंकला. त्यापूर्वी तिंनं 2014 मध्येही झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकच्या साथीनं डब्ल्यूटीए फायनल्सचा किताब जिंकला होता.
 
मिश्र दुहेरीमध्ये सानियानं पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद 2009 मध्ये महेश भूपतीच्या साथीनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकलं होतं. त्यानंतर याच जोडीनं 2012 मध्ये फ्रेंच ओपनचं विजेतेपद मिळवलं. तर 2014 मध्ये ब्राझीलच्या ब्रुनो सोआरेसच्या साथीनं तिनं यूएस ओपनचा किताब जिंकला.
 
ऑलिम्पिकमधील अपयश आणि वाद
एकीकडं सानिया आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे नवे विक्रम करत असतानाच काही वाद आणि अपयशाच्या आठवणीही तिच्याबरोबर जोडल्या गेल्या.
 
तिनं चारवेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, पण तिला पदक मिळवता आलं नाही. त्यात 2008 मधील बीजिंग, 2012 मधील लंडन, 2016 मधील रिओ आणि 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकचा समावेश आहे.
 
2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वी सानिया मिर्झा आणि भारतीय टेनिस संघटना यांच्यात वाद झाला होता. त्याची खूप चर्चाही झाली होती. सानिया मिर्झाला लंडन ऑलिम्पिकमध्ये महेश भूपतीच्या साथीनं खेळायचं होतं. तिचा वापर कमोडिटीसारखा केल्याचा आरोप तिनं संघटनेवर केला होता.
 
सानिया मिर्झा टेनिस कोर्टवर अत्यंत दमदार अशा फोरहँडसाठी ओळखली जाते. प्रत्यक्ष जीवनातही तिनं प्रत्येक वादाचा सामना अत्यंत धाडसानं केला. अनेकदा तिच्याशी याबाबत बोलण्याची संधी आम्हाला मिळाली. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे खळखळत्या स्माईलसह देणं हाच तिचा स्वभाव आहे.
webdunia
भारत-पाकिस्तानशी संबंधित वाद
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर विवाहानंतर ती अनेकदा भारत पाकिस्तानच्या मुद्दयावर थेटपणे बोलली आहे.
 
सानिया मिर्झा गेल्यावर्षी यूएई मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानच्या सामन्यात झळकली होती. त्यावेळी त्याची प्रचंड चर्चा झाली होती. सानियाला लेटेस्ट फॅशनची आवड असून ती विविध टेलिव्हिजन शोमध्येही कायम दिसत असते.
 
सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक यांच्यातही एकदा वाद झाला होता. त्यावेळी सानिया मुलाबरोबर रेस्तराँमध्ये गेली होती. त्यावेळी वीणा मलिकनं तिच्या खाण्या-पिण्याबाबत ट्वीट केलं होतं. नंतर सानियाचा पती शोएब मलिक आणि पाकिस्तानी नागरिकांनीही या वादात उडी घेतली होती.
 
सानियाच्या कपड्यांवरूनही अनेकदा वाद झाला आहे. अगदी जेव्हा तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाही वाद झाला होता.
 
सानिया मिर्झा आजवर कधीही कोणत्याही वादावर शांत राहिलेली नाही, मात्र तिनं कधीही बेजबाबदार वक्तव्यंही केलेली नाही.
 
सानिया मिर्झाचं वैशिष्ट्य
 
सानिया केवळ सहा वर्षांची असताना तिचे वडील इम्रान मिर्झा यांनी मोठा निर्णय घेतला होता. तो म्हणजे त्यांच्या मुलीला टेनिसपटू बनवण्याचा. त्यांनी महेश भूपती यांच्या वडिलांच्या टेनिस अकॅडमीमध्ये सानिया मिर्झाला टेनिसचं प्राथमिक प्रशिक्षण दिलं. त्यानंतर अनेक प्रशिक्षकांकडून तिनं टेनिसचे धडे गिरवले. त्यात डेवीस कप टीमचे माजी खेळाडू आणि विद्यमान प्रशिक्षक झीशान अली याचे वडील दिवंगत अख्तर अली यांचाही समावेश होता.
 
अख्तर अली स्वतःदेखील भारताचे डेवीस कपमधील खेळाडू आणि कोचही होते. सानियाला लहानपणापासून खेळताना पाहिल्याचं झीशान अली सांगतात. त्यांच्या मते, सानिया ही अत्यंत परिश्रम घेणारी खेळाडू आहे.
 
"भारतात टॅलेंटची कमतरता नाही. पण एखाद्या खेळाडूमध्ये आग असायला हवी, त्याग आणि बलिदान देण्यासाठी त्यानं सज्ज राहायला हवं. कठिण परिस्थितीत सहन करण्याची क्षमता असावी तीही तारुण्याच्या काळात. ते सर्वकाही सानियामध्ये आहे,'' असं झीशान अली म्हणाले होते.
 
एकदा अख्तर अली यांनी आम्हाला सांगितलं होतं की, इतर खेळाडूंप्रमाणे सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झाही त्यांच्याकडे यायचे. पण त्यांनी मुलीला साधारण टेनिसपटू नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू बनवायचं आहे असं सांगितलं होतं. तर इतरांना केवळ मुलांना टेनिस बऱ्यापैकी खेळता यावं असं वाटत होतं. परिणाम सर्वांसमोर आहे, इतरांच्या तुलनेत सानिया कुठच्या कुठे निघून गेली.
 
सानिया मिर्झानं भारतानं एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, आफ्रो एशियन गेम्स यातही अनेक पदकं मिळवून दिली.
 
सुरुवातीला महेश भूपती आणि नंतर लिएंडर पेस आंतरराष्ट्रीय टेनिसच्या पटलावरून हटल्यानंतर सानिया मिर्झाच भारताची टेनिसची ओळख आहे. तिचं योगदान विसरता येऊ शकत नाही, तसंच कदाचित तिची कमतरताही भरून काढता येणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशात कोरोनाने 8 महिन्यांचा विक्रम मोडला, गेल्या 24 तासात 3 लाख 17 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद