देशभरात 1 ऑक्टोबरपासून जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा- 2023 लागू होणार आहे.
यामुळे जन्म दाखला या एकमेव कागदपत्राचा वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, मतदार यादी तयार करण्यासाठी, आधार क्रमांक नोंदणीसाठी, विवाह नोंदणीसाठी, सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी या व अशा कामांचा यात समावेश आहे.
त्यामुळे जन्म दाखल्याला विशेष महत्त्व आहे.
पण बऱ्याचदा जन्म दाखल्यावरील नावात चूक असल्याचं समोर येतं. नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाल्याचेही प्रकार आढळतात.
अशावेळी पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक कामांसंदर्भात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जन्म दाखल्यावरील नावातील चूक दुरुस्त करणं अपरिहार्य ठरतं.
याशिवाय, शहरी भागात बाळाचा जन्म झाला की, दवाखान्यातून जन्म प्रमाणपत्र मिळतं. त्यानंतर आवश्यक असलेला जन्म दाखला संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घ्यायचा असतो. कधीकधी पालकांकडून तो घेतला जात नाही.
त्यामुळे जन्माची नोंद तर आहे, पण त्यात नाव समाविष्ट नाही, अशी स्थिती निर्माण होते.
अशावेळी, जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करणं आवश्यक ठरतं.
या बातमीत आपण जन्म दाखल्यात नाव कसं समाविष्ट करायचं आणि जन्म दाखल्यातील नावात दुरुस्ती कशी करायची? याची माहिती जाणून घेणार आहोत.
नाव कसं समाविष्ट करायचं?
नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेले नागरिक जन्म दाखल्यात त्यांचं नाव समाविष्ट करू शकतात.
राज्यातील ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आहे आणि त्याला 15 वर्षे उलटून गेली आहेत, असे नागरिक जन्म दाखल्यामध्ये नाव समाविष्ट करून घेऊ शकतात.
1969 पूर्वीच्या जन्म नोंदणींमध्ये नावाचा उल्लेख नसलेले, असे नागरिकही यासाठी अर्ज करू शकतात.
जन्म दाखल्यात 27 एप्रिल 2036 पर्यंत नावाची नोंदणी करता येणार आहे.
त्यानंतर जन्म दाखल्यामध्ये बाळाच्या नावाची नोंदणी करता येणार नाही, असं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
नाव नोंदणीसाठी कुठं जायचं?
नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेशी नागरिकांनी संपर्क साधायचा आहे.
म्हणजे ग्रामीण भागात ग्रामसेवक, शहरी भागात नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.
जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करायचं असेल तर आधी अर्जदाराच्या नावाच्या खात्रीसाठी त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, दहावी-बारावीचं शैक्षणिक प्रमाणपत्र, आधारकार्ड ही कागदपत्रं लागणार आहेत.
त्यानंतर नागरिकांना नावासहित जन्म दाखले दिले जातात.
जन्म दाखल्यात दुरुस्ती कशी करायची?
जन्म दाखल्यात नावाची दुरुस्ती करायची असल्यास त्यासाठी एक अफेडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) तयार करुन घ्यायचं आहे.
100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हे शपथपत्र तयार करुन घ्यायचं आहे. नावात बदल किंवा दुरुस्ती करणेबाबत, अशा आशयाचं ते शपथपत्र असावं.
यात अर्जदाराची संपूर्ण माहिती, जुनं चुकलेलं नाव, त्यामागचं कारण जसं की नजरचुकीनं नाव टाकण्यात आलं, पण खरं नाव अमुक आहे, अशी सविस्तर माहिती नमूद करावी.
सेतू कार्यालय किंवा नोटरीच्या वकिलांकडून तुम्ही हे शपथपत्र तयार करुन घेऊ शकता.
या शपथपत्रासोबत पालकांचं आधार कार्ड तसंच बाळाचं आधारकार्ड असेल तर त्याची झेरॉक्स प्रत द्यावी लागते.
ही कागदपत्रं जमा केली की आठवड्याभरात तुम्हाला दुरुस्तीसहितचा जन्म दाखला मिळणं अपेक्षित असतं.
जन्म नोंद कशी करतात?
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना द्यावी लागते.
बाळाचा जन्म ग्रामीण भागात किंवा शहरी भागात कुठेही झाला, तरी जन्म झाल्यापासून 21 दिवसांच्या आत माहिती दिली पाहिजे.
21 दिवसांच्या आत जन्माची नोंद आणि माहिती वेळेवर देणं कायद्यानं बंधनकारक आहे. या मुदतीत नोंद करून दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो.
पण, मुदतीत दाखला न घेतल्यास तो मिळवण्याकरिता शासनाच्या नियमाप्रमाणे विलंब शुल्क आकारलं जातं.
बाळाच्या आई-वडिलांचं आधार कार्ड, प्रसतीनंतर दवाखान्यातून मिळालेलं जन्म प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था जन्म दाखला देत असतात.
हाच दाखला आता बहुतेक सरकारी कामांसाठी एकमेव पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.