Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? आयकर परतावा कसा भरायचा?

Webdunia
मंगळवार, 20 जून 2023 (14:14 IST)
जून-जुलै महिना आला की पावसासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजे आयकर परतावा भरण्याची मुदत. दरवर्षी 31 जुलैपर्यंत हा आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं. पण जेवढं लवकर ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, तेवढं बरंच नाही का?
 
तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ते का भरायला हवं आणि त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊयात.
 
सर्वात आधी ITR भरणं आणि इन्कम टॅक्स भरणं यातला फरक समजून घ्यायला हवा.
 
सोप्या शब्दांत सांगायचं, तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR हा एक फॉर्म आहे. या फॉर्मद्वारा तुम्ही भारतात केंद्र सरकारच्या आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाविषयी माहिती देता.
 
याऊलट इन्कम टॅक्स भरणं म्हणजे त्या उत्पन्नावर काही कर असेल तर तो भरणं.
 
ITR भरण्याआधी तुम्ही कुठल्या उत्पन्न गटात येता, याची माहिती असणं आवश्यक आहे. त्याविषयी इथे सविस्तर वाचा.
 
इन्कम टॅक्स रिटर्न कुणी फाईल करायला हवा?
ज्या व्यक्तीचं उत्पन्न सरकारनं घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे बेसिक एक्झेम्पशन लिमिटपेक्षा जास्त आहे, त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरायला हवा. सध्याच्या नियमांनुसार तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही आयकर परतावा भरायला हवा.
 
तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर आयटीआर भरणं गरजेचं असतं. तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल म्हणजे तुमचं उत्पन्न करपात्र नसेल, तरीही रिटर्न भरलेला चांगला.
 
कारण आयटीआर भरला असेल तर परदेश प्रवासासाठी लागणारा व्हिसा, क्रेडिट कार्ड, एखादी सरकारी योजना, गृहकर्ज अशा गोष्टींसाठी अर्ज करताना तसंच घर किंवा जमिनीची नोंदणी करताना तुमची विश्वासार्हता वाढते. त्यामुळे रिटर्न वेळेत भरायला हवा.
 
शिवाय तुमचं एकूण उत्पन्न करपात्र नसेल, पण तुमचा TDS कापला गेला असेल तर रिटर्न फाईल करून तुम्हाला टॅक्स रिफंड - कर परतावा मिळवता येईल.
 
किंवा मग Tax Saving गुंतवणूक केलेली असेल आणि जास्त टॅक्स कापला गेला असेल, तरही तुम्ही रिटर्न फाईल करून पैसे परत मिळवू शकता.
 
कुठला ITR फॉर्म भरायचा?
इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्मचेही काही प्रकार आहेत. आयकर विभागाच्या वेबसाईटवर त्याची संपूर्ण माहिती दिली असते.
 
ITR - 1 : तुम्ही नोकरदार असाल, एकच घर असेल आणि उत्पन्नाचे इतर काही स्रोत असतील आणि कुटुंबाचं एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR-1 सहज हा फॉर्म थेट ऑनलाईन भरता येईल.
ITR - 2 : तुमचं उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असेल, तुम्ही एखाद्या कंपनीचे डायरेक्टर असाल, शेअरविक्रीतून तुम्हाला फायदा-तोटा झाला असेल, तुमची एकापेक्षा जास्त घरं असतील, परदेशात काही मालमत्ता किंवा उत्पन्न असेल, शेतीतून पाच हजारांवर उत्पन्न मिळत असेल तर ITR -2 हा फॉर्म भरायला हवा.
ITR-3 : तुम्हाला धंदा किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळत असेल तर ITR-3 भरायला हवा.
ITR-4 : तुम्ही संभाव्य उत्पन्नावर कर भरणार असाल तर ITR-4 वापरला जातो. खासगी सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींचाही यात समावेश होतो.
ITR भरण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?
हा कर परतावा दाखल करताना तुम्हाला कोणतीही कागदपत्रं द्यावी लागत नाहीत. पण फॉर्ममध्ये नेमका तपशील भरण्यासाठी किंवा आधी भरलेला तपशील तपासून पाहण्यासाठी या डॉक्युमेंट्स सोबत ठेवणं ITR भरताना मदत करतं.
 
तसंच जर आयकर विभागानं मागणी केली, तर तुम्हाला ही कागदपत्रं सादर करावी लागू शकतात.
 
तुम्ही पगारदार असाल तर कंपनीकडून मिळणारा फॉर्म 16 (ए आणि बी), टीडीएस सर्टिफिकेट्स म्हणजे तुमच्या पगारातून दरमहा कापला गेलेल्या कराची माहिती आणि फॉर्म 26 (ए) तसंच तुमच्या गुंतवणुकीची माहिती तुम्हाला ITR भरताना सोबत ठेवावी लागेल.
 
फॉर्म 26 (ए) हा तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.
 
तुमच्या वेगवेगळ्या गुंतवणुकांचा तपशील म्हणजे पीपीएफ, विमा, वैद्यकीय खर्चाच्या पावत्या, भाडेकरार, देणगी, बँकेतील मुदत ठेवींवर मिळालेल्या व्याजाचा तपशील, मालमत्ता किंवा शेअर्सच्या विक्रीतून झालेल्या नफ्यातोट्याचा तपशील. तसंच तुम्ही गृहकर्ज काढलं असेल, तर त्याचे स्टेटमेंट्सही सोबत ठेवा.
 
तुम्ही पगारदार असाल, आणि कंपनीला गुंतवणूक तपशील दिला असेल, तर यातल्या अनेक गोष्टी तुमच्या फॉर्म 16 मध्ये असतीलच.
 
तुम्ही व्यावसायिक असाल तर वार्षिक ताळेबंद, जमाखर्चाच्या वह्या, टीडीएस आणि टीसीएस सर्टिफिकेट्स, गुंतवणुकींचा तपशील, गृहकर्जाचे स्टेटमेंट्सही सोबत ठेवा.
 
तुमचं आधारकार्ड आणि पॅनकार्डही जवळ ठेवायला विसरू नका.
 
ITR कसा भरायचा?
ITR भरताना तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाऊंटंटची मदत घेऊ शकता. ही सेवा ऑनलाईन देणाऱ्या वेबसाईट्सची मदत घेऊ शकता किंवा स्वतःपण भरू शकता.
 
ऑनलाईन ITR भरण्याची पद्धतही सोपी आहे. आयकर विभागाच्या वेबसाईटवर त्याची पूर्ण माहिती दिली आहे.
 
ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी हे करा
 
सर्वात आधी ई-फायलिंग पोर्टलवर तुमचं प्रोफाईल असायला हवं. त्यासाठी या वेबसाईटच्या होमपेजवर आधी उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या टॅबवर जाऊन रजिस्टर करा. तिथे तुम्हाला तुमची प्राथमिक माहित, पॅन डिटेल्स वगैरे भरावं लागेल आणि पासवर्ड जनरेट करावा लागेल.हे डिटेल्स वापरून इन्कम टॅक्स रिटर्न भरताना लॉग इन करा.
लॉग इन केल्यावर डॅशबोर्डवर जाऊन ई फाईलवर क्लिक करा आणि इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये जा. त्यात फाईल इन्कम टॅक्स रिटर्न हा पर्याय आणि कुठल्या वर्षासाठी कर भरत आहात ते वर्ष निवडा. तसंच ऑनलाईन पर्यायही निवडा.
यानंतर तुम्हाला आणखी काही पर्याय निवडायचे आहेत. इंडिव्हिज्युअल म्हणजे एक व्यक्तीसाठी कर भरला जातो असल्याचा पर्याय तसंच योग्य तो टॅक्स रिटर्न फॉर्म निवडावा लागेल.
तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या डॉक्युमेंट्सची माहिती खाली पडताळून पाहा आणि मग लेट्स गेट स्टार्टेडवर क्लिक करा.
कुठल्या कारणासाठी टॅक्स भरत आहात, तो पर्याय तुम्हाला निवडावा लागेल.तुम्ही नव्या किंवा जुन्या करप्रणालीनुसार कर भरणार आहात ते यानंतर निवडावं लागेल.
तुमचा Form 16 असेल, तर मग तुमची काही माहिती इथे आधीच भरून येईल. ती तपासून पाहा. त्यात काही बदल करायचे असतील किंवा अधिक माहिती टाकायची असेल तर ती टाका.
प्रत्येक सेक्शन नीट भरल्यावर रिटर्न सबमिट करा. यानंतर तुम्हाला टॅक्स रिटर्न ई व्हॅलिडेट करावा लागेल.
तुमच्या अकाऊंटला जोडलेलं बँक अकाऊंटही तपासून पाहा. तुम्हाला काही कर भरावा लागणार असेल, तर त्याचं पेमेंट यानंतर करता येईल.
तुम्ही आता पेमेंटसाठी युपीआयचा वापर करू शकता. क्यूआर कोड स्कॅन करून अगदी लगेच पेमेंट करणं शक्य होतं.
मग तुम्हाला पुन्हा ईफायलिंग प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
तुम्हाला लगेच किंवा तीस दिवसांच्या आता तुमचे टॅक्स रिटर्न ई व्हेरिफाय करावे लागतील. ई व्हेरिफाय केल्यावर तुम्हाला ट्रँझॅक्शन आयडी आणि अ‍ॅटक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. तसंच मोबाईलवर एसएमएसद्वारा आणि रजिस्टर्ड ईमेल आयडीवरही कन्फर्मेशन येईल.
 
तुमचा जास्तीचा कर कापला गेला असेल, तर ITR भरल्याशिवाय तुम्हाला टॅक्स रिफंड मिळणार नाही.
 

Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीर : किश्तवाडमध्ये चकमकीत एक जवान शहीद

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, जपान-कोरिया यांच्यात पहिला सामना

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments