फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठल तू वेडा कुंभार … || धृ ||
माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळाच मग ये आकारा
तुझ्या घाटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार … || १ ||
घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाच्या दैव वेगळेतुझ्या विना हे कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार … || २ ||
तूच घडविशी तूच फोडीशी कुरवाळसी तू तूच जोडीशी
न कळे यातून काय सांधीशी
देसी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार … || ३ ||