संयुक्त अरब अमिरात येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या माध्यमातून विश्वचषक टी-20 स्पर्धेची तयारी करत असलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे.
याचं कारण म्हणजे, दुखापतीमुळे आशिया चषकाबाहेर पडलेला रवींद्र जाडेजा आता विश्वचषक टी-20 स्पर्धेतूनही बाहेर पडला आहे.
उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे रवींद्र जाडेजावर विश्वचषक स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ आली आहे. लवकरच रवींद्र जाडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती PTI वृत्तसंस्थेने दिली आहे.
जखमी रवींद्र जाडेजाऐवजी उर्वरित सामन्यांकरिता बदली खेळाडू म्हणून डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याला पाचारण करण्यात आलं आहे.
भारताने आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर हाँगकाँगविरुद्ध झालेल्या सामन्यातही भारतीय संघाने विजय मिळवला.
आता सुपर-4 गटातील लढतींकडे सर्वांचं लक्ष असेल. या गटात भारत पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार असून 4 सप्टेंबर रोजी हा सामना होईल.
भारत-पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने?
दुरावलेल्या संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत. पण आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामन्याची मेजवानी तीनवेळा मिळू शकते.
27 ऑगस्टपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धा दुबईत सुरू होत आहे. भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आहेत.
पात्रता फेरी जिंकणारा संघ हा या गटातला तिसरा संघ असेल. दुसरीकडे श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश असे तीन संघ आहेत.
रविवारी 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर आले होते. या सामन्यात भारताना अतिशय रोमहर्षक विजय प्राप्त केला होता.
गेल्या वर्षी झालेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ या निमित्ताने समोर आल्याचं दिसून आलं.
गटातील अव्वल दोन संघ सुपर-4 फेरीसाठी पात्र ठरतील. प्राथमिक फेरीचा अडथळा पार केल्यास भारत आणि पाकिस्तानचे संघ सुपर-4 गटात एकमेकांविरुद्ध येऊ शकतात.
या गटात चांगली कामगिरी करून अंतिम फेरी गाठल्यास अंतिम लढत भारत-पाकिस्तान होऊ शकते.
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 14 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. भारताने 8 तर पाकिस्तानने 5 मुकाबले जिंकले आहेत. एका सामन्यात निकाल लागू शकला नाही.
यंदाची आशिया चषकाची कितवी आवृत्ती?
आशिया चषकाची ही 15वी आवृत्ती आहे. 1984 मध्ये पहिल्यांदा आशिया चषक स्पर्धा खेळवण्यात आली. भारत त्यात अजिंक्य ठरला होता. तेव्हापासून साधारणत: दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते
1986 मध्ये श्रीलंकेबरोबरचे संबंध दुरावल्याने भारताने आशिया चषकावर बहिष्कार घातला होता. पाकिस्तानने भारताशी असलेल्या संबंधात बाधा आल्याने 1990-91 मध्ये झालेल्या आशिया चषकातून माघार घेतली होती.
1993 मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यानच्या संवेदनशील परिस्थितीमुळे आशिया चषक स्पर्धा रद्द करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय कॅलेंडरनुसार आशिया चषक स्पर्धा वनडे प्रकारात खेळवायची का ट्वेन्टी20 प्रकारात याचा निर्णय घेण्यात येतो.
यंदा ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर यंदाची स्पर्धा ट्वनेटी20 प्रकारात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणी किती वेळा जिंकली स्पर्धा?
भारताने सातवेळा आशिया स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. श्रीलंका 5 जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानने दोनवेळा जेतेपदावर कब्जा करता आला आहे. बांगलादेशचा संघ अजूनही पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. बांगलादेशला अजूनही पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे.
पात्रता फेरीत कोणते संघ?
संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, हाँगकाँग, कुवेत या चार संघांपैकी एक संघ मुख्य फेरीसाठी पात्र होईल. पात्रता फेरीचे सामने सुरू झाले आहेत.
सामने कुठे होणार?
आशिया चषकाचे सामने शारजा आणि दुबई इथे खेळवण्यात येतील.
भारतीय संघ
रोहित शर्माच्या नेतृत्वात 15 सदस्यीय भारतीय संघ रवाना झाला आहे. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत.
आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचा भाग असलेल्या इशान किशन आणि संजू सॅमसन यांना आशिया चषक संघात स्थान मिळू शकलेलं नाही.
रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांच्यावर सलामीची जबाबदारी असेल. यंदाच्या वर्षी प्रदीर्घ काळ विश्रांती देण्यात आलेला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
कोहलीने शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक 2019 मध्ये झळकावलं आहे. कोहलीचा शतकांचा दुष्काळ तीन वर्ष सुरू राहिल्याने कोहलीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे
* अनुभवी दिनेश कार्तिक फिनिशरच्या भूमिकेत असणार आहे. सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा आणि हार्दिक पंड्या मधल्या फळीचा भाग असतील.
* दीपक, हार्दिक आणि रवींद्र जडेजा यांच्यामुळे संघाला संतुलन प्राप्त झालं आहे.
* अवेश खान, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार हे त्रिकुट वेगवान गोलंदाजांची आघाडी सांभाळतील.
* युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई या लेगस्पिनर्सकडून भारतीय संघाला धावा रोखणं आणि विकेट्स अशा दोन्ही अपेक्षा आहेत.
* मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाल्यामुळे ते दुबईला रवाना होऊ शकलेले नाहीत. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीकडे देखरेख ठेऊन आहे.
* कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर द्रविड दुबईला रवाना होतील. तूर्तास गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा हंगामी कार्यभार सोपवण्यात आला आहे.
* आयर्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात आलं होतं.
* द्रविड वेळेत बरे न झाल्यास लक्ष्मण यांना प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.