- राखी शर्मा
एखाद्या स्प्रिन्टरचा उल्लेख होतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर वेगाने धावणाऱ्या, उंच देहयष्टी असलेल्या धावपटूचं चित्र उभं राहातं.
त्यामुळे चार फूट अकरा इंच उंचीची भारतीय स्प्रिन्टर दुती चंदकडे पाहिल्यावर ती आशियातील सध्याची सर्वांत वेगवान महिला धावपटू आहे, यावर कोणाचा पटकन विश्वास बसणार नाही. सहखेळाडू आपल्याला प्रेमाने 'स्प्रिन्ट क्वीन' असं संबोधत असल्याचं दुती हसत सांगते.
'2012 साली मी एक छोटी कार जिंकले होते, त्यानंतर मित्रमैत्रिणींनी मला नॅनो अशी हाक मारायला सुरुवात केली. पण आता मी वयाने मोठी झाल्यामुळे सगळे जण मला दीदी अशी हाक मारतात.'
धावपटू होण्याचा विचार मनात कसा आला?
दुती ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील आहे. तिच्या कुटुंबात सहा बहिणी व एक भाऊ यांसह एकूण मिळून नऊ लोक आहेत. वडील कपडे शिवायचं काम करतात. स्वाभाविकपणे धावपटू होण्यासाठी दुतीला खूप संघर्ष करावा लागला.
तिची मोठी बहीण सरस्वती चंदसुद्धा राज्यस्तरीय स्प्रिन्टर राहिलेली आहे. धावणाऱ्या बहिणीकडे पाहून दुतीनेही धावपटू होण्याचा निर्धार केला.
ती सांगते, "माझ्या बहिणीने मला धावण्याची प्रेरणा दिली. आमच्याकडे शिक्षणासाठीही पैसे नव्हते. त्या वेळी बहीण म्हणाली, स्पोर्ट्समध्ये गेली, तर शाळेत चॅम्पिअन होशील. मग तुझ्या शिक्षणाचा खर्च शाळा करेल. पुढे जाऊन स्पोर्ट्स कोट्यातून नोकरीही मिळेल. या विचारानेच मी धावायला सुरुवात केली."
समोर अडचणींचा डोंगर उभा होता
दुतीच्या वाटेतील आव्हानं नुकतीच कुठे सुरू झाली होती. धावताना तिच्याकडे बूट नव्हते, ट्रॅक नव्हता आणि युक्तीच्या चार गोष्टी सांगण्यासाठी कोणी प्रशिक्षकही नव्हता. दर आठवड्याला दोन-तीन दिवसांसाठी तिला गावावरून भुवनेश्वरला यावं लागायचं. त्यासाठी आवश्यक साधनसामग्री जमवणं जवळपास अशक्य होतं. दुतीने अनेक रात्री रेल्वे प्लॅटफॉर्मवर घालवली आहेत.
"सुरुवातीला मी एकटीच धावायचे. कधी रस्त्यावर, तर कधी गावाजवळ नदीकिनाऱ्यापाशी अनवाणी धावायचे. मग २००५ साली सरकारी क्षेत्रातून माझी निवड स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये झाली. तिथे मला पहिल्यांदा प्रशिक्षक चित्तरंजन महापात्रा भेटले. सुरुवातीच्या काळात त्यांनी माझी तयारी करून घेतली."
पहिल्यांदा पदक जिंकल्यानंतरचा आनंद
दुतीला लवकरच कष्टाचं फळ मिळालं. 2007 साली तिने पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदकासाठी मात्र तिला सहा वर्षं वाट पाहावी लागली.
2013 साली झालेल्या एशियन चॅम्पिअनशिप स्पर्धेमध्ये कनिष्ठ गटातील खेळाडू असतानाही तिने वरिष्ठ गटामध्ये सहभागी होऊन कांस्य पदक जिंकलं होतं.
ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या निमित्ताने तिने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. त्यासाठी ती तुर्कस्थानात गेली.
त्या अनुभवाला उजाळा देताना दुती म्हणते, "मी खूप खूश होते. तोवर मी गावात कारसुद्धा पाहिलेली नव्हती. पण स्पोर्ट्समुळे मला विमानातून परदेशवारी करायची संधी मिळाली. हे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यासारखंच होतं."
पदक मिळाल्यावर लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला. आधी तिच्यावर टीका करणारे लोक आता तिला प्रोत्साहन द्यायला लागले.
हार्मोन्सवरून वाद
परंतु दुतीची खरी कसोटी तोवर लागायची होती. 2014 साली राष्ट्रकुल स्पर्धांसाठीच्या भारतीय संघातून तिचं नाव अचानक वगळण्यात आलं.
भारतीय एथलेटिक्स फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, दुतीच्या शरीरात पुरुषांची संप्रेरकं (हार्मोन्स) जास्त प्रमाणात असल्यामुळे महिला खेळाडू म्हणून तिला स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आलं. दुती सांगते, "त्या काळात मला खूप मानसिक त्रास देण्यात आला. माध्यमांमध्ये माझ्याबद्दल खूप वाईटसाईट बोललं जात होतं. इच्छा असूनही मला ट्रेनिंगला जाता येत नव्हतं."
2015 साली तिने 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स' म्हणजे 'कॅस'कडे याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.
निकाल दुतीच्या बाजूने लागला आणि ती हा खटला जिंकली. पण तोवर 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकच्या तयारीला फारसा वेळ उरला नव्हता.
"रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी माझ्या हातात फक्त एक वर्ष उरलं होतं. मी खूप कष्ट घेतले आणि रिओसाठी पात्र ठरले," दुती सांगते. "यासाठी मला भुवनेश्वरहून हैदराबादला येऊन राहावं लागलं, कारण 2014 साली बंदी लागू झाल्यावर मला कॅम्पसमधून काढून टाकण्यात आलं होतं. तेव्हा पुलेला गोपीचंद सरांनी मला त्यांच्या अकॅडमीत येऊन ट्रेनिंग घ्यायला सांगितलं."
रिओमधील अपयशानंतरही निर्धार ढळला नाही
2016 च्या रिओ ऑलिम्पिकच्या निमित्ताने दुती, ऑलिम्पिकमधील 100 मीटर इव्हेन्टमध्ये भाग घेणारी तिसरी भारतीय महिला खेळाडू ठरली.
पण या स्पर्धेतील तिचा प्रवास हिट्सपलीकडे जाऊ शकला नाही. त्या वेळी तिने 11.69 सेकंदांच्या वेळेत निर्धारित अंतर कापलं.
त्यानंतर मात्र दुतीच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत गेली. 2017 सालच्या एशियन अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत तिने 100 मीटर आणि चार वेळा 100 मीटर रिले प्रकारांमध्ये दोन रौप्य पदकं पटकावली.
त्याव्यतिरिक्त २०० मीटर प्रकारातही तिने रौप्य पदकाची कमाई केली. 1986 साली आशियाई क्रीडास्पर्धांमधील पी.टी. उषा यांच्या कामगिरीनंतर हे भारतीय धावपटू महिलेने कमावलेलं दुसरंच रौप्य पदक होतं.
समलैंगिक संबंधांबाबत खुलासा
मैदानावर स्वतःला सिद्ध करून दाखवल्यावर दुतीला वैयक्तिक आयुष्यातही एका लढाईला सामोरं जावं लागलं. आपण समलैंगिक नात्यामध्ये असल्याचं तिने २०१९ साली पहिल्यांदाच जाहीर केलं.
त्यानंतर तिला गावाचा आणि कुटुंबियांचा विरोध सहन करावा लागला, पण तिने माघार घेतली नाही. आता ती स्वतःच्या जोडीदाराबरोबर राहाते. पण बीबीसी सोबतच्या विशेष मुलाखतीत या नात्याविषयी काहीही बोलायला तिने नकार दिला.
आता लक्ष्य, टोकियो ऑलिम्पिक
सध्या दुती चंद नागपुरा रमेश यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेते आहे. २०१२ साली रमेश यांच्याशी तिची भेट झाली, तेव्हा १०० मीटरसाठीची तिची वेळ १२.५० सेकंद इतकी होती. आता ती हेच अंतर ११.२२ सेकंदांमध्ये पूर्ण करते.
दुतीने दहा वेळा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडलेला आहे. आजघडीला 100 मीटर धावप्रकारात ती आशियातील पहिल्या क्रमांकाची महिला स्प्रिन्टर आहे. सध्या, या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवर तिचं लक्ष केंद्रित झालेलं आहे.
दुती म्हणते, "टोकियोला जमैका, अमेरिका, ब्राझील इथल्या धावपटूंचं कडवं आव्हान माझ्या समोर असणार आहे. तिथले अॅथलीट ताकदीच्या बाबतीत आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. तरीही मी जीवापाड प्रयत्न करेन. आशियाई स्पर्धांमध्ये मी पदक जिंकलंय. आता राष्ट्रकुलमध्ये आणि ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकं जिंकणं, हे माझं लक्ष्य आहे.
खेळानंतरचा टप्पा राजकारण
देशासाठी पदक जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दुतीला निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करायचा आहे. दुती म्हणते, "सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही ट्रॅकवर धावत असतो. करियर संपल्यावर आमची इच्छा असली तरीही आम्ही कुठल्या ऑफिसात बसून काम करू शकणार नाही. म्हणून मला मुलामुलींसाठी अॅकेडमी उघडायची आहे. त्याचसोबत राजकारणात जाऊन मला देशाची सेवा करायची आहे." आपापल्या क्षेत्रामध्ये भावी पिढीला प्रेरणादायी ठरणाऱ्या १०० तारकांची यादी जगद्विख्यात टाइम मॅगझिनने २०१९ साली प्रसिद्ध केली होती, त्यात दुतीचा समावेश केला होता.