Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

CAA: दिल्लीतील जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शनं, अनेक ठिकाणी संचारबंदी

CAA: दिल्लीतील जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शनं, अनेक ठिकाणी संचारबंदी
, शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (15:49 IST)
CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन पेटलं आहे. सुरुवातीला आसाम आणि दिल्ली या ठिकाणी झालेल्या आंदोलनाचं लोण देशभर पसरलं आहे.
 
आज शुक्रवारीही दिल्लीमध्ये या कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलनाच्या शक्यतेमुळे दिल्लीत सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.
 
दिल्लीतील जामा मशीदबाहेर हजारोंच्या संख्येने निदर्शक जमा झाले आहेत. भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांनी सर्व आंदोलकांना जंतर मंतर येथे जमण्याचं आवाहन केलं आहे.
 
दिल्लीत अनेक ठिकाणी संचारबंदी
नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीत ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. दिल्लीतल्या 12 पोलीस स्टेशनच्या हद्दींमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
 
'मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांची संपत्ती जप्त करू'
आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी बस जाळण्यात आल्या तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं.
 
जे लोक अशा कृत्यात सामील होत आहेत ते देशद्रोही आहेत असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.
 
जे लोक सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतील त्यांची संपत्ती जप्त करून त्या संपत्तीचा लिलाव करून त्यातून सरकारचं नुकसान भरून काढलं जाईल असं आदित्यनाथ म्हणाले.
 
दिल्लीत मेट्रो स्टेशन्स बंद
आज जामिया मिलिया इस्लामिया आणि जसोला विहार शाहीन बाग ही मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली होती. काही काळानंतर ती सुरू करण्यात आली.
 
या आंदोलनादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तसेच दिल्लीत शेकडो जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. देशातल्या काही भागात इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.
 
नव्या कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तानातील बिगर मुस्लीम निर्वासितांना भारतात नागरिकत्व देण्यात येण्याची तरतूद आहे.
 
दिल्लीत अनेक ठिकाणी मेट्रो स्टेशन बंद होते. या कायद्याच्या विरोधकांचं म्हणणं आहे की या कायद्यामुळे भारताची धर्मनिरपेक्ष प्रतिमा डागाळली जाईल. त्यांचं म्हणणं आहे की धर्माला नागरिकत्वाचा आधार मानता येणार नाही.
 
पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणतात हे आरोप बिनबुडाचे आहेत. या कायद्याबाबत लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम विरोधी पक्षातले नेते करत आहेत.
 
अनेक ठिकाणी निदर्शनं आणि तीन जणांचा मृत्यू
गुरुवारी देशभरात अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार कर्नाटकातील मंगळुरू येथे निदर्शनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. असं म्हटलं जात आहे की आंदोलकांनी पोलीस स्टेशनला आग लावण्याचा प्रयत्न केला.
 
पोलीस आयुक्त पी. एस. हर्षा यांनी सांगितलं की शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि मृतांच्या पोस्टमार्टम रिपोर्टची पोलीस वाट पाहत आहेत.
 
बंगळुरू येथील बीबीसी हिंदीचे सहकारी पत्रकार इम्रान कुरेशी यांनी सांगितलं की मंगळुरू येथे 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.
 
लखनौदेखील पेटलं
दोन जणांचा मृत्यू कर्नाटकात झाला तर तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे झाला आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. दुपारच्या वेळी आंदोलकांनी अनेक ठिकाणी राज्य परिवहनाच्या बसेस जाळल्या.
webdunia
हिंसक आंदोलकांविरोधात कठोर पावलं उचलली जातील असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशातही पुढील 45 तासांसाठी इंटरनेट बंद ठेवण्यात आलं आहे. दिल्लीत किमान 1200 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर CAA विरोधात
या कायद्याच्या विरोधात देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले आहेत. राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपटसृष्टीतील कलावंत या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
 
काल बंगळुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या इतिहासकार रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्वराज्य अभियान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष योगेंद्र यादव यांना ताब्यात घेतलं.
 
बीबीसीच्या एका कार्यक्रमादरम्यान रामचंद्र गुहा यांनी सांगितलं की हे स्पष्ट दिसत आहे की लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या या कायद्याचा विरोध संपूर्ण देश करत आहे.
 
मुंबईतही शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. चित्रपटसृष्टीतील कलावंत रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर अनेक जण या कायद्याविरोधात प्रदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
 
यावेळी उपस्थित असलेले दिग्दर्शक आणि अभिनेते फरहान अख्तर यांनी म्हटलं की या कायद्याचा शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा आम्हाला अधिकार आहे. या कायद्यामुळे लोकांमध्ये फूट पडण्याची भीती असल्याचं त्यांनी म्हटलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Forbes India: भारतातील फोर्ब्स 100 सेलिब्रिटींच्या यादीत अजय-अतुल यांचा समावेश