"मराठी माणूस राष्ट्रपती झाला तर आम्हाला आनंदच होईल. मात्र, केंद्र पातळीवर राष्ट्रपती निवडीबाबत काही प्रक्रिया सुरू आहे की नाही याची कल्पना नाही," हे उद्गार आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे.
गेले अनेक दिवस किंबहुना प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यापासून नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतल्या अनेक मुद्द्यांवर बोट ठेवले आहे.
एखाद्या सकाळी नाना पटोले यांनी आपली नाराजी दाखवल्याप्रमाण वक्तव्यं करायचं, दुपारनंतर माध्यमांमध्ये त्यावर चर्चा, संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी शिवसेना नेते संजय राऊत, शरद पवार यांच्या भेटी झाल्यावर आघाडीत कोणतीच बिघाडी नाही असं सांगून त्यावर पडदा टाकायचा अशी वेळ अनेकदा येऊन गेली आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये प्रशांत किशोर यांनीही प्रवेश केला आहे. आधी मुंबईत येऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.
या सर्व गोष्टींचा, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार का? शरद पवार हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होतील का असे प्रश्न त्यामुळे उपस्थित होऊ लागले.
त्याचवेळेस महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांच्या कुरबुरींचाही विचार केला पाहिजे.
कुरकुरणारी खाट
ही कुरबूर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात होते तेव्हाही होती असं दिसतं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आलं होतं.
'काँग्रेस ही जुनी खाट आहे, त्यामुळे अधूनमधून जास्त कुरकुरते,' असा टोला काँग्रेसला लगावण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
भेटीनंतर 'सामान्यांना मदत करण्यासाठी आमची भूमिका आहे. ज्यासाठी आमची महाविकास आघाडी एकत्र आली आहे त्यासाठी काही प्रशासकीय गोष्टी होत्या त्याची चर्चा आमची झाली. यामध्ये नाराजी कुठेही नव्हती' असे मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते.
महाविकास आघाडीतील अशा प्रकारचे वाद त्यातही काँग्रेसच्या नाराजीचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो आणि थोड्या काळाने काहीच वाद नव्हता असे जाहीर करण्यात येते.
विधानसभा अध्यक्ष
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून ते पद रिक्त आहे. काँग्रेसला हे पद आपल्यालाच मिळावे असे वाटत असले तरी ते सहजासहजी होत नसल्याचे दिसत आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याबद्दल अनेक उलटसुलट विधाने केली आहेत.
खुद्द शरद पवार यांनीच "विधानसभा अध्यक्षपद हे सरकारमधील तिन्ही पक्षांचं होतं. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे या पदाची व्हेकन्सी तयार झाली आहे. हे पद आता खुलं झालं आहे. या पदाबाबत आता पुन्हा चर्चा होईल" असं विधान केलं होतं.
"विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला द्यायचं आमच्यात ठरलं होतं. पण. हे नव्हतं ठरलं की काँग्रेसचे नेते हे पद वर्षभरानंतर सोडतील. त्यामुळे हे पद आता चर्चेसाठी खुलं झालं आहे," असंही ते म्हणाले होते.
काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव अध्यक्षपदासाठी शिवसेनेने आपले वन मंत्रालय सोडू नये असं विधान यांनी केलं होतं.
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी अनेक प्रशासकीय कारणं दिली जात असली तरी तिन्ही पक्षांचे याबाबत अद्याप एकमत होत नसल्याचं दिसतं.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक
शरद पवार यांच्याबाबतीत जशी पंतप्रधानपदाची चर्चा होते त्याचप्रमाणे राष्ट्रपतीपदाचीही चर्चा होते. त्यांना राष्ट्रपती व्हायचं आहे अशी चर्चा अधूनमधून तोंड वर काढत असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासंदर्भातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती, तसेच त्यांचं कौतुकही केलं होतं. यामुळेच या स्नेहपूर्ण संबंधांचा उपयोग शरद पवार यांना राष्ट्रपती होण्यासाठी होईल असे तर्क लावले जात होते.
आता प्रशांत किशोर यांच्या हालचालींवरुनही राष्ट्रपतीपदासाठी तयारी सुरू असल्याची चर्चा केली जात आहे.
स्वतः शरद पवार यांनी याबाबत कोणतंही वक्तव्यं केलं नाहीये. किंबहुना प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेली भेट ही राजकीय नव्हती, असं पवारांनी स्पष्ट केल्याचंही वृत्त आहे.
पण तरीही पवारांच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या चर्चा सुरू असतानाच नाना पटोले यांनी "मराठी माणूस राष्ट्रपती झाला तर आम्हाला आनंदच होईल मात्र केंद्र पातळीवर राष्ट्रपती निवडीबाबत काही प्रक्रिया सुरू आहे की नाही याची कल्पना नाही," अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळेस शिवसेनेने अशीच भूमिका घेतली होती.
मराठी व्यक्ती त्या पदावर बसत आहे या कारणासाठी भाजपा-सेना युती असूनही सेनेने प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. अर्थात शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांनाही राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाबरोबर युतीमध्ये असताना पाठिंबा दिला होता.
राष्ट्रमंचची बैठक
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या घरी भाजपाविरोधी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यात कोणती चर्चा झाली हेच स्पष्ट झाले नाही.
या बैठकीत तिसऱ्या आघाडीची चर्चा झाली की शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवारीची चर्चा हे स्पष्ट झाले नव्हते.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी या बैठकीत राष्ट्रपतीपदाची चर्चा झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली होती.
ते म्हणाले होते, "सध्या शरद पवारांच्या डोळ्यासमोर 2022ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक सगळ्यांत आधी असेल असा माझा होरा आहे. या निवडणुकीत परस्पर सहमतीतून विरोधी उमेदवार उभा करता आला किंवा अगदी स्वत:लाही उभं राहता आलं तर त्याची चाचपणी पवार करत असावेत. त्यानंतर पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात भाजपविरोधी आघाडी उभी राहते का यावरही पवार आणि सगळ्यांचंच लक्ष असेल. त्यानंतर नव्या राष्ट्रीय आघाडीची वाटचाल ठरवता येईल."
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते, "प्रशांत किशोर यांच्या भेटी तसेच शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकी हा एकप्रकारे भाजपाविरोधी स्पेस तयार करण्याचा प्रयत्न करणं आहे. त्यामध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक हा सुद्धा एक अजेंडा असू शकतो.
ही स्पेस तयार करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून राष्ट्रपतीपदाचा मुद्दा पुढे येऊ शकतो. जर असं झालंच तर काँग्रेसचे सध्याचे संख्याबळ पाहाता ते याला विरोध करतील असं वाटत नाही. फक्त ही आघाडी आता शरद पवार यांच्यासारख्या राजकीय व्यक्तीला किंवा कोणा अराजकीय व्यक्तीला आपला उमेदवार बनवते हे पाहावं लागेल."
भाजपला निवडणूक कठीण आहे का?
सध्याची देशातील विधानसभांमधील आणि संसदेतील स्थिती पाहाता भारतीय जनता पार्टीसाठी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक फारशी कठीण नाही. या स्थितीवर उत्तर प्रदेश विधानसभांच्या निकालाचा फरक पडू शकतो.
भारतीय जनता पार्टीचे आज फारसे मित्र पक्ष नसले तरी अनेकवेळेस विविध राजकीय पक्ष भाजपच्या मदतीला आलेले दिसून येतात. अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी भाजपाला मदत केल्याचं दिसून येतं.
कलम 370 हटवण्याच्या प्रस्तावाला मायावती यांच्या बहुजन समाज पक्षानेही पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संख्याबळ जमवणे भाजपाला फारसे कठीण वाटत नाही.
राजकीय विश्लेषक आणि पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनीही असेच मत बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "सध्याची स्थिती पाहाता भाजपाला ही निवडणूक अशक्य नाही. परंतु भाजपाविरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न विविध पक्ष करू शकतात. काँग्रेसेतर पक्षातून उमेदवार उभा करावा असं या आघाडीत ठरलं तर शरद पवार यांच्यासारखा दुसरा पर्याय असू शकत नाही. या आघाडीत इतर पक्षांपैकी एक होणं काँग्रेसने स्वीकारलं तर हे अवघड नाही."