राज्यात गुरुवारी (18 मार्च) कोरोनाची लागण झालेले 25,833 नवीन रुग्ण आढळलेत. ही गेल्या एक वर्षातली सर्वांत मोठी वाढ आहे. तर 12,174 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात 18 मार्च रोजी 58 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
गुरुवारी राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार केली. सप्टेंबर 2020 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 24 हजार 896 रुग्ण एका दिवसात सापडले होते. गुरुवारी 25 हजार 833 नवीन रुग्ण सापडले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 23 लाख 29 हजार 464 एवढी झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झालीये. गेल्या 30 दिवसांत रोज सरासरी पंधरा हजार नवीन रुग्णांची नोंद संपूर्ण भारतात होतेय. आणि यातले तब्बल 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत.
17 ते 18 मार्चच्या 24 तासांमध्ये भारतामधली एकूण नवीन रुग्णसंख्या होती 35,871. यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 18 मार्चला 23,179 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
भारतामध्ये सुरू असलेली कोव्हिड 19 साठीची लसीकरण मोहीम ही जगातली सर्वांत मोठी लसीकरण मोहीम आहे. महाराष्ट्रातही वेगाने लसीकरण केलं जातंय. 17 मार्चपर्यंत महाराष्ट्रात 36,39,989 जणांना लशीचा डोस देण्यात आलाय.मग लसीकरण सुरू असूनही महाराष्ट्रात कोव्हिड-19चे रुग्ण का वाढतायत?
राज्यात लसीचा पुरेसा पुरवठा आहे का?
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी 16 मार्चला केंद्र सरकारला पत्र लिहून राज्यासाठी अधिकचे डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
प्राधान्यक्रमाच्या गटातल्या सुमारे 1 कोटी 77 लाख लोकांच्या लसीकरणासाठी 2 कोटी 20 लाख डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे टोपेंनी केली.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ पुरेशा लसींचा पुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्राने केंद्राकडे केली, पण महाराष्ट्राकडे लशीचा पुरेसा साठा असल्याचा दावा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलाय.
त्यांनी ट्वीट करत केंद्र सरकारची भूमिका मांडली. "महाराष्ट्राला केंद्र सरकारनं 12 मार्चपर्यंत 54 लाख लशी दिल्या होत्या. पण आत्तापर्यंत त्यातील फक्त 23 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. म्हणजे 56% लशींचा वापर अजूनही केला गेलेला नाही."
तर लशीच्या पुरवठ्यावरून आणखी एक मुद्दा चिघळलाय. केंद्र सरकारला पाकिस्तानला आणि जगाला द्यायला लशी आहेत पण आपल्याच देशातील लोकांना द्यायला नाहीत अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे. पण केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मात्र हे दावे फेटाळून लावलेत. भारतीयांच्या वाट्याची लस परदेशात पाठवत नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलंय. 16 मार्चला सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे बैठक पार पडली. यात देशातील कोरोनाच्या चढत्या आलेखाचा आढावा तर घेतला गेलाच पण त्याचबरोबरच अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून आहेत, याबाबत नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली.
लसीकरण सुरू असूनही रुग्णसंख्या का वाढतेय?
2021 साल उजाडलं तेव्हा देशभरातल्या दिवसाला वाढणाऱ्या केसेस 5 ते 7 हजारांच्या घरात होत्या. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी लसीकरण मोहीम अजून सुरू झालेली नव्हती.
पण, कोरोना पुन्हा डोकं वर काढू पाहात असताना आपली लसीकरण मोहीम नेमकी कुठवर आलीय? देशात 14 मार्च म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत एकूण 2 कोटी 90 लाख लशी दिल्या गेल्यात. यात 18 टक्के लोकांचे दोन डोसही पूर्ण झालेत. पण, ही आकडेवारी आणखी खोलात जाऊन बघितली म्हणजे राज्या राज्यांतले लसीकरणाचे आकडे बघितले तर मेख लक्षात येईल. सिक्किम, त्रिपुरा, मिझोरम यासारख्या छोट्या राज्यांमध्ये लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे. पण, यात महाराष्ट्राचा क्रमांक 23 वा आहे.
राज्यात 14 मार्चपर्यंत 35 लाख 73 हजार 489 लसी दिल्या गेल्या आणि यात 7 टक्के लोकांचे दोन डोस पूर्ण झालेत. आणखी खोलात सांगायचं झालं तर 14 मार्चपर्यंत देशभरात जेवढं लसीकरण झालंय यातलं 12 टक्के लसीकरण महाराष्ट्रात झालंय. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देशभरात रुग्णसंख्या वाढलीय. यामध्ये पंजाब आणि महाराष्ट्रात फेब्रुवारीनंतर कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ झाल्याचं स्पष्ट दिसतंय.
वाढलेल्या या रुग्णसंख्येविषयी बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "हे आमच्यासाठीसुद्धा आश्चर्य आहे की खरोखर एवढे आकडे वाढण्याचं काही कारण नाहीये. कोरोनाला लगाम लावण्यासाठी जे जे करणं अपेक्षित आहे ते सर्व आम्ही करत आहोत. आयसीएमआरच्या गाईडलाईन्स आणि केंद्रीय पथकानं वेळोवेळी दिलेल्या ज्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या सूचना आम्ही निश्चितप्रकारे पाळत आलेलो आहोत."
याउलट निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी गेल्याच आठवड्यात घेतलेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, "महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल आम्हाला काळजी वाटते. तिथली कोरोना स्थिती सध्या गंभीर आहे. ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, अशा राज्यांना आमचा सल्ला असेल की, त्यांनी लसीकरण गांभीर्याने घ्यावं आणि प्राधान्यक्रमाने लसीकरणाचा प्रश्न हाती घ्यावा." राज्यातली रुग्णसंख्या आटोक्यात आणणं हे लोकांच्या वागण्यावरही अवलंबून असल्याचं टोपे सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "एक नक्की की आता आपण संपूर्ण ओपन केलं आहे त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्त पाळणं सर्वांत महत्त्वाचं आहे. पण ती न पाळता लग्नांची गर्दी राजकीय सभांची गर्दी किंवा इतर ठिकाणी लोक एकत्र येतात तिथली गर्दी, या गर्दीला आपल्याला पूर्णपणे थांबवलंच पाहिजे."