ओंकार करंबेळकर
तुझं दुखणं 'मानसिक' आहे, असं एखाद्यानं लेबल लावलं की आपल्याला धक्का बसतो. किंवा 'मानसिक' हा शब्द विचित्र पद्धतीने आणि सहजरित्या वापरला गेल्यामुळे त्यामागे एकप्रकारची भीती चिकटली आहे.
आपल्याकडे प्रत्येक शहरांमध्ये मनोविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञांची रुग्णालयं पूर्वीपासून आहेत. त्यांना थेट वेड्यांचा दवाखाना आणि तिथल्या डॉक्टरांना वेड्यांचे डॉक्टर असं म्हटलं जायचं.
तसंच सिनेमामध्येही एक साधा दवाखाना आणि दुसरा थेट 'वेड्यांचा' दवाखाना असे दोन भाग केलेले दाखवतात. तिथं चित्रविचित्र हावभाव करणारे लोक दाखवल्यामुळे त्याबद्दल एक प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. किंवा मानसिक आधार म्हणजे थेट शॉक दिले जातात असे समज करून दिलेले असतात.
परंतु 'वेड' लागण्याशिवाय इतर अनेक मानसिक समस्या असतात हे आपल्या गावीही नसतं. त्यामुळे मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागृती होणं अत्यंत आवश्यक आहे.
स्वतःला स्वीकारा
आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न असतातच परंतु ते एका मर्यादेच्या पलिकडे जात असतील त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या मनात सुरू असलेली खदखद मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांना सांगण्यात कोणताच कमीपणा नसतो.
प्रत्येकवेळेस डॉक्टर आपल्याला औषधेच देतात असे नाही. अनेक समस्या सुरुवातीच्या पातळीवर असतील तर समुपदेशन आणि वर्तनदोष सुधारून त्यांच्यावर मात करता येते.
सर्व बाह्य उपाय वापरूनही माझ्या स्वभावात, नकारात्मक भावनेत, खिन्न विचारांत बदल झालेला नाही हे स्वीकारून लवकरात लवकर मानसिक आधार शोधणे गरजेचं आहे.
चिंता आणि ताणाबद्दल गैरसमज
आजकालचं आयुष्य हे चिंता करण्याचं, भरपूर ताणाचं आहे त्यामुळे ताण हा जीवनाचा भाग आहे असं समजून अनेक लोक जगत असतात. सतत ताण, स्पर्धा, तुलना, असमाधान, चिंता, मानसिक अशांतता हेच जीवन समजलं जातं. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिक गुंतागुंतीचे होत जातात.
अनेक जण स्वतःच्या समस्यांचं स्वतःच निदान करतात. बोलताबोलता सरळ मला डिप्रेशन आलं आहे असं म्हणून मोकळं होतात. पण नैराश्य किंवा कोणत्याही मानसिक आजाराच्या संज्ञा सहज वापराव्यात इतक्या साध्या नाहीत. आपला ताण, आपल्या मानसिक आजाराच्या समस्या अनेक पातळ्यांवर असतात. त्यांचं निदान आणि उपचार करण्याचं काम आपण डॉक्टरांवरच सोपवलं पाहिजे.
डॉक्टरांकडे कधी जायचं? स्वतःचं निरीक्षण कसं करायचं?
आपल्याला भेडसवणारी समस्या सोडवण्यासाठी डॉक्टरांकडे कधी जायचं हा मोठा प्रश्न असतो. यासाठी स्वतःचं निरीक्षण करण्याचा उपाय मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर सुचवतात.
त्या म्हणतात, "थोड्याफार प्रमाणात आपण सर्वजण ताणाच्या मानसिक अवस्थेतून दररोज जात असतो. पण आपण त्यावर मातही करत असतो. आपला मूडही बऱ्याचदा थोडा जात असतो परंतु काहीवेळाने आपण ठीकही होत असतो. पण यापेक्षा काही गंभीर समस्या असेल तर त्या बिघडलेल्या मानसिक अवस्थेत आपण बराच काळ राहातो. त्यातून बाहेर पडणं आपल्याला नैसर्गिकरित्या जमत नाही.
एरव्ही आपल्या प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकतेवर फरक पडत नसतो पण एखादी मानसिक समस्या असेल तर आपल्या उत्पादकतेवर, एकाग्रतेवर परिणाम होतो."
डॉ. पारकर अशावेळेस आपल्या जुन्या अनुभवांना आठवून पाहाण्यास सांगतात. आपण अशा समस्यांवर कशी मात केली होती हे आठवून पाहावं जर यावेळेस तसं स्वतःचं स्वतःला त्यातून बाहेर पडणं शक्य होत नसेल तर ही स्थिती थोडी वेगळी आहे हे आपणं ओळखायचं असं त्या सांगतात.
आपल्या मानसिक आधारासाठी पहिलं पाऊल कसं टाकायचं असं विचारल्यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. केतकी गद्रे सांगतात, "आधी स्वतःला स्वीकारणं फार आवश्यक आहे. आपल्याला होत असलेला त्रास गंभीर आहे की साधा आहे हे डॉक्टरला ठरवू द्यावं.
मला काहीतरी त्रास होत आहे याची जाणिव वाईट नाही. कोणीही मनाबद्दल सल्ला देऊ शकतो असा समज अनेक माध्यमांतून केला गेला आहे. मात्र ते चूक आहे. मानसिक आरोग्याबद्दल आपण डॉक्टरकडूनच सल्ला घेतला पाहिजे."
काउन्सिलिंगमध्ये काय होतं?
डॉक्टर किंवा क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे फक्त 'वेडे' लोक जातात असा सार्वत्रिक समज असतो. आपल्याला रोजच थोड्याफार प्रमाणात मदतीची गरज असते. अशावेळेस आपल्याला कोणाशी तरी बोलून बरं वाटत असतं.
अनेकदा आपण आपले मित्र-मैत्रिणी, पालक, शिक्षक यांच्याशी बोलून समस्यांवर उपाय शोधत असतो. मात्र अशी व्यवस्था नसेल आणि त्यांना सांगता येत नाहीत असे प्रश्न आपण काउन्सिलर आणि मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाऊ शकतो.
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मुक्ता पुणतांबेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. "काउन्सिलिंगमध्ये कोणताही उपदेश केला जात नाही. तर तिथं व्यक्तीचं बोलणं ऐकून घेतलं जातं. त्यातील नकारात्मक विचार शोधून ते व्यक्तीला सांगितले जातात. त्या नकारात्मक भावना कमी कशा करायच्या यासाठी उपाय सुचवले जातात. काही वर्तनात बदल सुचवले जातात. त्यासाठी मदत केली जाते."
मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर तुमच्या एखाद्या समस्येसाठी वर्तन बदलासह औषधांचीही गरज असेल तर औषधं देतात. डॉक्टरांकडे गेलो म्हणजे आपल्याला औषधे घ्यावीच लागतील असा समज करून घेऊ नये.
तुम्हाला नक्की कोणत्या तीव्रतेचा त्रास आहे, त्रास नक्की कोणता आहे हे डॉक्टरच ठरवू शकतात. तेच औषध द्यायचं की नाही हे ठरवतात. त्यामुळे गुगलवर, युट्यूबवर आपली उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं घातक आहे. आपल्या मानसिक अवस्थेचं निदान डॉक्टरांनाच करू द्यावं.
आनंद आणि मानसिक आरोग्य चांगलं असणं या वेगळ्या संकल्पना
बहुतांशवेळा आनंद मिळत राहाणं, खुश राहाणं म्हणजे चांगलं मानसिक आरोग्य अशी कल्पना केली जाते. हा भ्रम असल्याचं डॉ. केतकी गद्रे सांगतात.
त्या म्हणाल्या, "केवळ खुश राहाणं किंवा खुश वाटत राहाणं म्हणजे आपलं मानसिक आरोग्य चांगलं आहे अशी कल्पना केली जाते. आनंदी अवस्था आणि चांगली मनस्थिती यात सामाईक गुण असू शकतात. पण फक्त आनंद म्हणजे चांगली मानसिक अवस्था होत नाही.
कारण एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याला त्रास देऊन आनंद मिळत असेल तर ती चांगली मानसिक अवस्था नाही. ती नकारात्मक भावना आहे. आनंद मिळवणं हे एकमेव मानसिक आरोग्याचं ध्येय नाही. तर मी ठरवलेल्या ध्येयाकडे जाण्यासाठी माझे सकारात्मक आणि नकारात्मक गुण यांची सांगड घालून केलेला समतोल प्रवास म्हणजे मानसिक आरोग्य होय."