Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिन्यात कसे बनले काँग्रेसच्या प्राधान्यक्रमातील क्रमांक 1 चे नेते

Webdunia
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (14:19 IST)
हर्षल आकुडे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर घेतली. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतल्या सहा अन्य नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
यात शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विदर्भ काँग्रेसचे मोठे नेते नितीन राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश होता.
 
एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज चेहरे मंत्रिपदाची शपथ घेताना दिसले. मात्र पण काँग्रेसने त्यांच्या गोटात पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री असूनही थोरात आणि नितीन राऊत यांचं नाव पुढे केलं आहे.
 
विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मंत्रिपदाच्या यादीतील पहिल्या क्रमांकावरील उपस्थिती ही महाराष्ट्र काँग्रेसच्या बदललेल्या राजकीय धोरणाचा भाग असल्याचं जाणकारांचं मत आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष अत्यंत बिकट परिस्थितीतून जात होता. अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन महिन्यांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. निवडणुकीतील प्रचारादरम्यान पक्षाची धुरासुद्धा पूर्णपणे त्यांच्याच हातात असल्याचं दिसून आलं.
 
अनेक मोठे नेते पक्ष सोडून जात असताना त्यांनी डॅमेज कंट्रोलचं काम बऱ्यापैकी योग्य पार पाडलं. परिणामी मागच्या वेळच्या आकड्यामध्ये दोनची भर पडून एकूण 44 जागा निवडून आल्या. अशा प्रकारे गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्र काँग्रेसच्या प्राधान्यक्रमातील पहिल्या क्रमांकाचे नेते बनलेल्या बाळासाहेब थोरात यांचा राजकीय प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
 
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली
प्रदेशाध्यक्ष पदावर केलेल्या कामाची पावती थोरात यांना मंत्रिपदाच्या स्वरुपात मिळाल्याचं ज्येष्ठ राजकीय अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार अभिजित ब्रह्मनाथकर यांनी सांगितलं.
 
ब्रह्मनाथकर सांगतात, "अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर थोरात यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी फक्त तीन महिन्यांचा कालावधी मिळाला. असं असूनही त्यांनी चांगलं काम केलं. राज्यात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना 42 जागा निवडून आणता आल्या होत्या. थोरात यांनी प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेसच्या दोन जागा वाढवल्या. त्यामुळेच त्यांची मंत्रिपदावर सर्वात प्रथम वर्णी लागली आहे."
 
राहुल गांधींचे विश्वासू
सहा महिन्यांपूर्वीची ही गोष्ट. देशभरात लोकसभा निवडणुका सुरू होत्या. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात संगमनेरमध्ये प्रचारसभा घेतली. काही कारणामुळे त्यांनी अचानक संगमनेरमध्येच मुक्काम करणं पसंत केलं. यावेळी त्यांनी संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासोबत वेळ घालवला.
 
राहुल गांधींच्या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन थोरात यांनी यशस्वीपणे केलं. मराठमोळ्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा पाहूणचार केला. नंतर नाशिकला हेलिकॉप्टरमधून जाताना राहुल गांधी यांनी थोरातांना सोबत नेलं. यावेळी राहुल गांधी यांनी थोरात यांच्यासोबत एक फोटो घेत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तो शेअर केला.
 
या सगळ्या घडामोडींतून बाळासाहेब थोरात आणि राहुल गांधी यांची जवळीक वाढल्याचं दिसून आलं.
 
राहुल गांधींनीही विखे पाटलांना शह देण्यासाठी थोरात यांना बळ देणार असल्याचं दाखवून दिलं. त्याआधीही, गुजरात विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी पक्षाचे प्रभारी म्हणून काम केलं. ही जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या बजावली.
 
त्यानंतर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्येही छाननी समितीमध्ये चांगलं काम केलं. त्यानंतर त्यांना राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केलं होतं. त्यावेळीच त्यांचं पक्षातलं वजन वाढत असल्याचा स्पष्ट संदेश गेला होता.
मवाळ नेते
बाळासाहेब थोरात हे एक मवाळ नेते असल्याचं मत अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे नोंदवतात. त्यांच्या मते, "बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसने वेळोवेळी मोठी जबाबदारी दिली होती. पण या काळात त्यांनी पक्षांतर्गत गटबाजी कधीच केली नाही.
 
"प्रत्येकाशी जुळवून घेऊन राजकारण करण्याला बाळासाहेब प्राधान्य देतात. त्यामुळेच पक्षाने त्यांना बळ दिलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी थोरात यांना खंबीर साथ दिली. यामुळेच त्यांची दिल्लीत चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. दरम्यान सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांसोबतही थोरात यांनी काम केलं. पण पक्षादेश पाळून मिळेल ती जबाबदारी त्यांनी पार पाडली."
 
तुपे सांगतात, "अहमदनगर तसंच राज्याच्या राजकारणात विखे पाटील यांचं प्रस्थ वाढू लागलं असल्याचं कळाल्यामुळे पक्षाने थोरात यांना त्यांच्या विरोधात बळ दिलं. गुजरात निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या छाननी समितीत काम करताना त्यांचा राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याशी चांगला संपर्क आला. एकूणच पक्षाला हवे असणारे नेते म्हणून काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली."
 
पण बाळासाहेब थोरात यांचं मवाळ असणं त्यांच्या अंगलट येऊ शकतं, असं ब्रह्मनाथकर यांना वाटतं. ते सांगतात, "विरोधकांना आक्रमकपणे शिंगावर घेणं बाळासाहेब थोरात यांना जमत नाही. जिल्ह्याचं राजकारणही ते स्थानिक नेत्यांवर सोडून देतात, मंत्रिपदाच्या कारकिर्दीत हाच मवाळ स्वभाव त्यांच्यासाठी नकारात्मक ठरू शकतो."
गटबाजीच्या राजकारणापासून दूर
बाळासाहेब थोरात हे सुरूवातीपासूनच गटबाजीच्या राजकारणापासून दूर असल्याचं मत अशोक तुपे आणि अभिजित ब्रह्मनाथकर या दोघांनीही व्यक्त केलं. थोरात यांच्या राजकारणाची पद्धत गटबाजीची नाही, त्यामुळे पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून थोरात यांच्यावर हायकमांडचा दृढ विश्वास असल्याचं दोघांनीही एकमुखाने सांगितलं.
 
जिल्ह्याचे नेते म्हणून टीका
बाळासाहेब थोरात यांच्यावर विरोधक फक्त मतदारसंघ आणि जिल्ह्यापुरते मर्यादित नेते म्हणून टीका करायचे पण मुळात तसं नव्हतं असं ब्रह्मनाथकर यांचं निरीक्षण आहे. ब्रह्मनाथकरांच्या मते, "महसूल मंत्रीपदाच्या कार्यकाळात थोरात यांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील सत्तासमीकरण सांभाळण्याचंही काम केलं. त्याचाच फायदा त्यांना प्रदेशाध्यक्ष पदादरम्यान झाला. आपल्या पूर्वीच्या संपर्काचा त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला."
 
आघाडीतील संवादाचा सेतू
अशोक तुपे पुढे सांगतात, "काँग्रेसचे अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांचा शरद पवार यांच्याशी आघाडी असूनसुद्धा फारसा संवाद होत नसतो. दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशीची चांगले संबंध असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आघाडी करताना त्यांच्या स्वभावाचा आघाडीला फायदा झाला. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत एखादी गोष्ट बोलण्यास कोणत्याच पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांना अडचण वाटत नाही."
 
आघाडीतील पक्षांसोबत बोलणी किंवा जागावाटप तसंच शिवसेनेसोबत बोलणी करताना त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात थोरात यांच्या नातेवाईकांचा गोतावळा मोठा आहे. त्यामुळे या सगळ्या बाबींचा थोरात यांना फायदा झाल्याचंही तुपे सांगतात.
 
बाळासाहेब थोरात यांचा परिचय
1953 - 7 फेब्रुवारी रोजी जन्म
शिक्षण - सर डी. एम. पेटीट हायस्कूल, संगमनेर महाविद्यालय व पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए. व ILS लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण
1978 - कायद्याची पदवी घेतली
1979 - शेती तसंच वकिली व्यवसायास सुरूवात, सहकार क्षेत्रात प्रवेश
1980 - विडी कामगार, शेतकरी प्रश्नांवर चळवळीत सहभाग, 9 दिवस कारावास
1985 - संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी
1990 ते 2019 - काँग्रेसच्या तिकीटावर संगमनेरमधून सातत्याने विजय
1999 - विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री
2009-10 - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये महसूल, कृषी तसंच खार जमीन खात्याचे मंत्री
2019 - काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
2019 - काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून निवड

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments