Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इम्रान खान: 'बलात्काराला अश्लीलता, बॉलिवुड आणि पाश्चिमात्य संस्कृती जबाबदार'

Imran Khan
, गुरूवार, 8 एप्रिल 2021 (15:49 IST)
अमृता शर्मा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्काराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. इम्रान खान यांनी बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीला, अश्लीलता जबाबदार असल्याचं वक्तव्य केलंय.
 
पाकिस्तानमधील मीडियाने इम्रान खान यांचं वक्तव्य अत्यंत धोकादायक आणि महिलाविरोधी असल्याचं म्हटलं आहे.
 
पंतप्रधान इम्रान खान यांनी 4 एप्रिलला एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं. एका सामान्य नागरिकाने देशात वाढणाऱ्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांबाबत सरकारची योजना काय? असा प्रश्न 'टेलीथॉन' नावाच्या कार्यक्रमात इम्रान यांना विचारला. त्यावेळी समाजाला 'अश्लीलतेपासून' स्वत:चं रक्षण करावं लागेल असं इम्रान खान म्हणाले होते.
इम्रान खान पुढे म्हणाले, "ही पर्दा कन्सेप्ट काय आहे? जेणेकरून आपल्याला मोह होऊ नये. प्रत्येक व्यक्तीमध्ये इच्छाशक्ती नसते. याच कारणामुळे आपल्या धर्मात शरीर झाकण्यावर जोर दिला जातो. जेणेकरून लाज कायम ठेवली जाईल. समाज प्रलोभन नियंत्रित ठेवता येईल. प्रत्येक व्यक्तीकडे स्वनियंत्रणाची ताकद नसते."
 
धोकादायक उदाहरण
ज्येष्ठ पत्रकार फैज फरीद द ट्रिब्यून एक्सप्रेसमध्ये लिहितात, "पंतप्रधानांचं वक्तव्य एक धोकादायक उदाहरण आहे. महिलांच्या बाबतीत चुकीचं, पूर्वग्रहदूषित आणि पक्षपाती मत निर्माण होण्यास यामुळे प्रोत्साहन मिळेल."
 
मंगळवारी डॉन वृत्तपत्रामुध्ये छापलेल्या संपादकीयामध्ये इम्रान खान यांच्या विचारांना 'आश्चर्यकारक, असंवेदनशील आणि देशातील महिलांच्या आंदोलनासाठी हानिकारक' असं संबोधण्यात आलं.
ते म्हणतात, "महिलांच्या कपड्यांमुळे त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं, हा गैरसमज कधीच संपलाय. मात्र, असं वाटतंय की पंतप्रधान अजूनही अशा विचारांचं समर्थन करतात."
पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याचा पाकिस्तानातील सामान्यांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनांनी विरोध केलाय. यात पाकिस्तानातील मानवाधिकार संघटना, वॉर अगेन्स्ट रेप आणि पाकिस्तान बार काउंसिलची जर्नलिस्ट डिफेंस कमिटी सहभागी आहे.
 
पाकिस्तानात महिलांच्या सुरक्षेवर चर्चा
बलात्कार आणि महिला सुरक्षेचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात चर्चेचा विषय आहे.
 
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे राज्यपाल चौधरी सरवर यांनी 2016 मध्ये "बलात्काराच्या घटनांमध्ये पाकिस्तान जगभरातील 10 खराब देशांपैकी एक आहे," असं वक्तव्य केलं होतं.
 
गेल्यावर्षी लाहौरमध्ये महामार्गावर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड आक्रोश पहायला मिळाला. 9 सप्टेंबर 2020 ला, एका महिलेवर तिच्या मुलांसमोरच बलात्कार करण्यात आला होता. या घटनेनंतर पाकिस्तानात महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेचा विषय बनला.
बलात्कार आणि विरोध प्रदर्शनांनंतर पाकिस्तानात गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये, बलात्काराबाबत एक कायदा मंजूर करण्यात आला. ज्यात फास्ट-ट्रॅक कोर्टात सुनावणी आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली.
 
बलात्काराच्या वाढत्या घटना आणि त्यातच पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेलं वक्तव्य, यामुळे सरकारच्या बलात्कार रोखण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
 
"इम्रान खान यांच्या वक्तव्यामुळे देशात महिलांची परिस्थिती अधिक धोकादायक झाली आहे," असं या संघटनांचं म्हणणं आहे.
 
'बॉलिवुड आणि पाश्चिमात्य समाजाचा वाढता प्रभाव'
 
पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्काराबद्दल वक्तव्य करताना 'बॉलीवूड संस्कृती' आणि 'यूरोपमध्ये दिसणारी अश्लीलता' याचा संदर्भ दिलाय. या शब्दांचा उपयोग केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.
 
डॉनने इम्रान खान यांच्या वतीने त्यांचा खुलासा छापला आहे. "दिल्लीला रेप कॅपिटल म्हणतात, यूरोपमध्ये अश्लीलतेमुळे कुटुंबव्यवस्था संपुष्टात आली. त्यामुळे, पाकिस्तानी लोकांनी अश्लीलता बंद करण्यासाठी सरकारची मदत केली पाहिजे."
 
प्रसिद्ध पत्रकार जाहिद हुसैन म्हणतात, "बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटना वाढण्यामागे बॉलिवुड आणि पाश्चिमात्य देशातील प्रभाव कारणीभूत आहे, हे इम्रान खान यांचं वक्तव्य माफीच्या लायकीचं नाही. या वक्तव्यामुळे त्यांचे बुरसटलेले विचार दिसून येतात."
 
ट्विटरवर राग
पाकिस्तानातील अनेक सामान्यांनी ट्विटरवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली आहे.
 
ब्रॉडकास्ट जर्नलिस्ट साइमा मोहसीन यांनी इम्रान खान यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करत आपली नाराजी दर्शवली आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यात कायदा-सुव्यवस्थेची कोणतीच चर्चा करण्यात आली नाही, असं त्या म्हणतात.
प्रसिद्ध पत्रकार मेहर तरार म्हणतात, "लैंगिक शोषणाच्या घटनांबाबत समजून घेण्यासाठी त्यांनी शिकलं पाहिजे. सत्तेचा हा विकृत अमानवीय पैलू आहे."
 
मानवाधिकार कार्यकर्ते आणि नेते जिबरान नासिर ट्विटरवर लिहितात, "बलात्कारासाठी प्रलोभन नाही, तर, शक्ती अनियंत्रित होणं कारणीभूत आहे. बलात्कार करणाऱ्याला शिक्षा आणि कायद्याचं भय नसेल कर लहान मुलांवरही बलात्कार केला जातो."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला करोनावरील लसीचा दुसरा डोस