कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात 14 जण ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या विमानामध्ये 95 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते.
अपघातग्रस्त विमान हे Bek Air कंपनीचं होतं. शुक्रवारी (27 डिसेंबर) सकाळी अलमाटी विमानतळावरून या विमानानं उड्डाण केलं होतं.
'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेचा वार्ताहर घटनास्थळाजवळच उपस्थित होता. या भागामध्ये प्रचंड धुकं असल्याची माहिती या वार्ताहराने दिली. या अपघातातून अनेक प्रवासी सुखरुप बचावल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कझाकिस्तानमधील सर्वात मोठं शहर असलेल्या अलमटीवरून हे विमान नूर-सल्तन शहराकडे निघालं होतं.
विमानाला नेमका अपघात कशामुळे झाला, हे अद्याप समजलेलं नाहीये. स्थानिक वेळेनुसार 7 वाजून 22 मिनिटांनी या विमानाचा ताबा सुटला आणि ते एका दुमजली इमारतीला जाऊन धडकलं. विमान इमारतीला धडकल्यानंतर सुदैवानं आग लागली नाही.
अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे.
अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे. कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं.