Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मुख्तार अन्सारी : बाहुबली नेता, चार वेळा आमदार आणि आता कठोर कारावास

मुख्तार अन्सारी : बाहुबली नेता, चार वेळा आमदार आणि आता कठोर कारावास
उत्तरप्रदेशचे बाहुबली नेते मुख्तार अन्सारी आणि त्यांचा मोठा भाऊ, गाझीपूरचे बसपा खासदार अफजल अन्सारी यांना भाजप आमदार कृष्णानंद राय खून प्रकरणात उत्तरप्रदेशातील एका न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
 
गाझीपूरच्या विशेष खासदार-आमदार न्यायालयाने अपहरण आणि हत्येप्रकरणी मुख्तार अन्सारी यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोबतच त्यांना पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय.
 
मुख्तार यांचे बंधू आणि गाझीपूरचे बसपा खासदार अफजल अन्सारी यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
आता अफझल अन्सारी यांची खासदारकी जाण्याची शक्यता आहे, कारण दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास संसदेचं सदस्यत्व आपोआप रद्द होण्याची तरतूद कायद्यात आहे.
 
या खटल्याची सुनावणी उत्तरप्रदेश गँगस्टर आणि अँटी-सोशल अॅक्टिव्हिटी प्रिव्हेंशन ॲक्ट अंतर्गत पार पडली.
 
मुख्तार अन्सारी यांच्यावर 1996 मध्ये विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि कोळसा व्यापारी नंदकिशोर रुंगटा यांचं अपहरण केल्याप्रकरणी आणि भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
2005 साली कृष्णानंद राय यांची हत्या झाली होती. त्यावेळी अटकेत असताना देखील मुख्तार अन्सारींचा या खून प्रकरणात सहभाग असल्याचं सिद्ध झालं होतं.
 
कृष्णानंद राय यांच्या कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे?
कृष्णानंद राय यांच्या पत्नी अलका राय म्हणाल्या की, त्यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून "येणाऱ्या काळात गुंड आणि माफियाराज संपून जाईल. एकतर ते तुरुंगात असतील किंवा ते जिवंत नसतील."
 
कृष्णानंद राय यांचा मुलगा पीयूष राय यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "या प्रकरणात 2007 मध्ये अफझल अन्सारी, मुख्तार अन्सारी आणि त्यांचा मेहुणा इजाजुल हक यांच्याविरुद्ध गँगस्टर ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता."
 
या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीवर आणि शिक्षेवर पीयूष राय म्हणतात की, "पूर्वी जी सरकारं सत्तेवर होती, एकतर त्यांचे मनसुबे चांगले नव्हते, ना त्यांचा हेतू चांगला होता. त्यांनी गुन्हेगारीकरण वाढवलं, गुन्हेगारांना मोठं करणं त्यांचा धंदाच होता. पण भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून साक्षीदाराला किमान आपली साक्ष न घाबरता देता येऊ लागलीय."
 
"भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून गुन्हेगारांना मिळणारं संरक्षण बंद झालंय. सरकारचं झिरो टॉलरंस धोरण प्रत्यक्षात आल्यामुळे आम्हाला आमची साक्ष देणं शक्य झालंय."
 
न्यायालयाने सुनावली शिक्षा
मुख्तार अन्सारीला 10 वर्ष तर अफजल अन्सारीला चार वर्षांची शिक्षा
बसपा खासदार अफजल अन्सारी यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता
मुख्तार अन्सारीला इतर दोन प्रकरणांमध्ये सात आणि पाच वर्षांची शिक्षा
मुख्तार अन्सारी उत्तरप्रदेशातील मऊ मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेत
2005 मध्ये भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्या प्रकरणात आरोपी
1996 मध्ये कोळसा व्यापारी नंदकिशोर रुंगटा यांचं अपहरण
यूपी गँगस्टर आणि अँटी सोशल अॅक्टिव्हिटी प्रिव्हेंशन ॲक्ट अंतर्गत गुन्हा
कृष्णानंद राय हत्या प्रकरण
उत्तरप्रदेशातील गाझीपूर मोहम्मदाबाद मतदारसंघ 1985 पासून म्हणजेच सलग 17 वर्ष अन्सारी कुटुंबाकडे होता. 2002 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कृष्णानंद राय या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. पण त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. कारण आमदार झाल्यानंतर अवघ्या तीनच वर्षांत (2005) त्यांची हत्या करण्यात आली.एका कार्यक्रमाचं उद्घाटन करून परत येत असताना कृष्णानंद राय यांच्या बुलेट प्रूफ टाटा सुमोला घेराव घालून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. गाडीला डाव्या किंवा उजव्या बाजूला वळता येणार नाही अशाच ठिकाणी हा हल्ला करण्यात आला.
 
त्या गाडीत कृष्णानंद राय यांच्यासह एकूण सहा जण होते. या हल्ल्यात एके-47 वापरण्यात आली असून गोळ्यांच्या जवळपास 500 फैरी झाडण्यात आल्या. या हल्ल्यात एकूण सात जण ठार झाले.
 
जाणकारांच्या मते गाझीपूरची जागा गमावल्यामुळे मुख्तार अन्सारी संतापले होते.
 
कोणकोणत्या प्रकरणात झाली शिक्षा?
मागच्या काही वर्षांपासून अन्सारी कुटुंबीयांभोवती कायद्याचा फास आवळला जातोय.
 
2022 च्या सप्टेंबरमध्ये, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने मुख्तार अन्सारी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांनी 2003 साली एका जेलरला धमकावलं होतं.
 
मुख्तार अन्सारी यांनी जेलरवर पिस्तूल रोखून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता.
 
त्यानंतर काही दिवसांतच म्हणजे 1999 च्या एका प्रकरणात त्यांना गँगस्टर ॲक्ट अंतर्गत पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सोबतच 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.
 
मुख्तार अन्सारी यांची एक गँग असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यांनी यामार्फत खून, दरोडे, अपहरण असे गुन्हे केले असल्याचं म्हटलं गेलं.
 
जुलै 2022 मध्ये मुख्तार अन्सारी यांच्या पत्नी अफसा अन्सारी आणि मुलगा अब्बास अन्सारी यांना फरार घोषित करण्यात आलं.
 
2020 च्या ऑगस्ट महिन्यात लखनौ विकास प्राधिकरणाने अफजल अन्सारी यांचं घर पाडलं. हे घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचा आरोप होता.
 
मुख्तार अन्सारी यांना 2019 मध्ये खंडणीप्रकरणी अटक करून पंजाबमधील रुपनगर तुरुंगात ठेवण्यात आलं. आता ते उत्तरप्रदेशातील बांदा येथील तुरुंगात आहे.
 
बाहुबली ते राजकारणी होण्यापर्यंतचा प्रवास
मुख्तार अन्सारी पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. यातल्या चार टर्म ते मऊचे आमदार राहिलेत. एकदा बसपच्या तिकिटावर, दोनदा अपक्ष आणि एकदा स्वतःच स्थापन केलेल्या कौमी एकता दल पक्षाच्या तिकिटावर.
 
मुख्तार अन्सारी यांनी विद्यार्थीदशेतच राजकारणाला सुरुवात केली. पण नेता होण्यापूर्वी ते दबंग माफिया म्हणून ओळखले जायचे. 1988 मध्ये एका खून खटल्यात पहिल्यांदाच त्यांचं नाव समोर आलं. या प्रकरणात पोलिसांना त्याच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे गोळा करता आले नसले तरी या घटनेमुळे मुख्तार अन्सारी चर्चेत आले.
 
त्यांच्यावर गाझीपूर आणि पूर्व उत्तरप्रदेशातील अनेक जिल्ह्यांमधील शेकडो कोटी रुपयांच्या सरकारी कंत्राटांवर नियंत्रण ठेवल्याचा आरोप करण्यात आला.
 
1995 मध्ये मुख्तार अन्सारी यांनी राजकारणाला सुरुवात केली. 1996 मध्ये ते मऊ मतदारसंघातून आमदार झाले. दरम्यानच्या काळात पूर्वांचलमधील माफिया गटाचा नेता ब्रजेश सिंग आणि अन्सारी गटात धुसफूस सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
 
अन्सारी यांचा राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी ब्रजेश सिंहने भाजप नेते कृष्णानंद राय यांना पाठिंबा दिला होता. राय यांनी 2002 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्तार अन्सारी यांचे भाऊ अफजल अन्सारींचा मोहम्मदाबादमधून पराभव केला होता,असं म्हटलं जातं.
 
पण पुढे जाऊन कृष्णानंद राय यांची हत्या करण्यात आली आणि मुख्तार अन्सारी आरोपी झाले. कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी 2005 मध्ये मुख्तार अन्सारींना अटक करण्यात आली. आणि तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. त्यांच्या विरोधात खून, अपहरण, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
 
अफजल अन्सारी यांचा राजकीय प्रवास
अफजल अन्सारी यांनी 2019 मध्ये बसपाच्या तिकीटावर गाझीपूरमधून खासदारकीची निवडणूक लढवली आणि ते निवडून आले.
 
त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात कम्युनिस्ट पक्षातून केली. नंतर त्यांनी समाजवादी पक्षात (सपा) प्रवेश केला. त्यानंतर 'कौमी एकता दल' नावाचा पक्ष स्थापन केला आणि 2017 मध्ये बसपमध्ये प्रवेश केला.
 
तर, मुख्तार अन्सारी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बसपमधून केली. नंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पुढे 2012 मध्ये 'कौमी एकता दल' या घरच्याच पक्षातून आमदार झाले आणि 2017 मध्ये या पक्षाचं बसपमध्ये विलीनीकरण केलं आणि बसपमध्ये सामील झाले.
 
बसपच्या प्रमुख मायावती यांनी मुख्तार अन्सारी यांना 'गरिबांचा मसिहा' म्हटलं होतं. पण याच मायावतींनी एप्रिल 2010 मध्ये अन्सारी बंधूंची गुन्हेगार म्हणत बसपमधून हकालपट्टी केली होती.
 
पण न्यायालयात त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झाला नसल्याचं म्हणत 2017 च्या निवडणुकीपूर्वी अन्सारी बंधूंचा 'कौमी एकता दल' बसपामध्ये विलीन करून घेतला.
 
असं म्हटलं जातं की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अन्सारी बंधूंनी गाझीपूर, बलिया, बनारस आणि जौनपूर पट्ट्यांमध्ये बसपाला बळ दिलं होतं. त्यावेळी बसपा आणि सपाने युती केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अफझल अन्सारी यांनी मनोज सिन्हा यांचा पराभव केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sant Tukdoji Maharaj Jayanti राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती