ब्रिटिशकालीन बजेट ब्रीफकेसला डच्चू देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेमध्ये बजेट सादर करण्यासाठी हिशोब लिहिण्याची पारंपरिक चोपडी घेऊन आल्या.
बजेट सादर करण्यासाठी संसदेत दाखल होणारे अर्थमंत्री दरवर्षी बजेट असलेली बॅग उंचावून दाखवतात. मात्र यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये लाल रंगाची पारंपरिक चोपडी घेऊन दाखल झाल्या.
त्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी हे 'पाश्चिमात्य विचारांच्या गुलामगिरीतून बाहेर पडणं' असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मचं हे पहिलं बजेट आहे.
सीतारामन या पूर्वी भारताच्या संरक्षण मंत्री होत्या. परवडणाऱ्या घरांची योजना, स्टार्ट-अपना प्रोत्साहन देणाऱ्या योजना आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणा त्यांनी आज जाहीर केल्या.
1070-71मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी अर्थखातं सांभाळलं होतं. त्यानंतर निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.
पण अर्थसंकल्प संसदेत आणण्यासाठी सीतारामन यांनी निवडलेल्या पर्यायामुळे सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुरू झालेली आहे.
भारतीय परंपरा पाळल्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे, तर इतरांनी खिल्ली उडवली आहे. संसदेमध्ये कारने येण्याऐवजी त्या बैलगाडीने का नाही आल्या किंवा त्यांनी त्यांचं भाषण झाडांच्या पानावर छापलं होतं का, असे प्रश्नही गंमतीने विचारले जात आहेत.
पण ब्रीफकेस न घेता येणाऱ्या सीतारामन या पहिल्या अर्थमंत्री नाहीत.
भारताचे पहिले अर्थमंत्री आर. के. शण्मुगम शेट्टी हे देखील चामडी बॅगमध्ये अर्थसंकल्पीय भाषण घेऊन आले होते. पण ही बॅग पुष्कळशी ब्रीफकेससारखीच दिसत होती.
ब्रिटनच्या बजेटच्या ब्रीफकेसचा इतिहास
ब्रिटिश मंत्र्यांच्या ब्रीफकेसेस, ज्यांना अधिकृतरित्या बॉक्स असंही म्हणतात, त्या अनेक शतकांपासून वापरल्या जात आहेत. सरकारी कागदपत्रांची ने-आण करण्यासाठी या ब्रीफकेसेसचा वापर केला जातो.
या ब्रीफकेस अत्यंत गुप्तपणे लंडनमधल्या बॉरो अॅण्ड गेल्स या कंपनीव्दारे बनवल्या जातात. या कंपनीच्या रेकॉर्डनुसार ब्रिटिश मंत्र्यांच्या लाल ब्रीफकेसेस पहिल्यांदा 19 शतकात संसदेत आणल्या गेल्या होत्या.
तेव्हापासून बॉक्सच्या डिझाईनमध्ये फारसा बदल झालेला नाही. थंड वातावरणात उगवणाऱ्या पाईनच्या लाकडापासून हाताने बॉक्सची निर्मिती केली जाते. बॉक्स प्रदीर्घ काळ टिकावेत यासाठी असं केलं जातं. बॉक्सला लेदरचं आवरण दिलं जातं. काही प्रसंगी, शिसाचं आवरण बॉक्सला दिलं जातं.
प्रत्येक बॉक्स तयार होण्यासाठी तीन दिवस लागतात. बॉक्सचं वजन 2 ते 3 किलो असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉक्सच्या तळाशी असलेली लॉक सिस्टम. मंत्री ही केस लॉक करायला विसरत नाहीत.