- मयांक भागवत
मुंबईत 'NO SMOKING', 'NO PARKING' किंवा 'NO SPITTING' असे फलक तुम्ही रस्त्यावर, गार्डनमध्ये किंवा सरकारी कार्यालयात पाहिले असतील. पण बोरीवली परिसरातील एका सोसायटीने चक्क इमारतीसमोरच्या रस्त्यावर 'NO KISSING ZONE' असं लिहिलंय.
रस्त्यावर बसून प्रेमी युगलांकडून केल्या जाणाऱ्या अश्लील चाळ्यांना कंटाळून, सत्यम-शिवम सुंदरम सोसायटीने 'नो किसिंग झोन' असं लिहिण्याचा निर्णय घेतला. प्रेमी युगलांसाठी एक सूचना म्हणून असं लिहिण्यात आल्याचं सोसायटीचं म्हणणं आहे.
मुंबईत कोव्हिड-19 चे निर्बंध लागू असल्याने मरीन ड्राइव्ह, वरळी सी-फेसवर लोकांना बसण्याची परवानगी नाही. तर, चौपाट्या बंद असल्याने प्रेमी युगलांना बसण्याची जागा मिळत नाही.
'NO KISSING ZONE'- का करावा लागला?
सत्यम-शिवम सुंदरम सोसायटीने दोन महिन्यांपूर्वी समोरच्या रस्त्यावर 'नो किसिंग झोन'' असं लिहिलं. पण याची खरी सुरूवात झाली दुसऱ्या लॉकडाऊनपासून.
सोसायटीतील रहिवासी सांगतात की, लॉकडाऊनमध्ये या रस्त्यावर गाड्या पार्क होणं सुरू झालं. त्यानंतर, मुलं-मुली रस्त्यावर येऊन बसू लागले. पण, हळूहळू बाईकवर, गाडीत या प्रेमी युगलांचे चाळे सुरू झाले. त्यानंतर याचं रूपांतर अश्लील चाळ्यांमध्ये झालं.
प्रेमी युगलांचे हे अश्लील चाळे सर्वात पहिल्यांदा पाहिले, इमारतीमध्ये रहाणाऱ्या रुची पारेख यांनी. बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, "दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये एक कपल सकाळी आणि संध्याकाळी येत होतं. पण, ते किसिंगपेक्षा जास्त अश्लील चाळे करायचे. आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीच फायदा झाला नाही."
त्यानंतर, रस्त्यावर बसून अश्लील चाळे करणाऱ्या या प्रेमी युगलांचे रहिवाशांनी फोटो आणि व्हिडीओ काढले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं.
सोसायटीचे अध्यक्ष विनय अणसूणकर सांगतात, "पोलीस यायचे आणि या प्रेमी युगलांना हटकायचे. पण पोलीस गेल्यानंतर ही मुलं परत येत होती."
त्यामुळे, प्रेमी युगलांसाठी इशारा म्हणून 'NO KISSING ZONE' ही सूचना सोसायटीने मे महिन्यात रस्त्यावर लिहिली.
NO KISSING ZONE' ची कल्पना कशी सुचली?
NO KISSING ZONE' ची कल्पना सूचली सोसायटीचे अध्यक्ष विनय अणसूणकर यांना. ते म्हणतात, "आपण मुंबईत अनेक बोर्ड पहातो. यातूनच मला NO KISSING ZONE ची कल्पना सूचली. सोसायटीमधील अनेक लोक मुलांच्या या अश्लील चाळ्यांबद्दल विचारत होते. मग, ही शक्कल लढवून पाहिली."
सोसायटीमधील रहिवासी म्हणतात, मुला-मुलींनी याठिकाणी उभं राहून गप्पा मारण्याबद्दल काहीच हरकत नाही. पण, अश्लील चाळे बंद झाले पाहिजेत.
रूची पुढे सांगतात, "मुद्दा किसिंगचा नाही. मुद्दा आहे अश्लील चाळे करण्याचा. या मुला-मुलींचे अश्लील चाळे शब्दात सांगता येणार नाहीत."
'आम्ही खिडक्या बंद करायचो'
सोसायटीतील रहिवासी सांगतात, ही जोडपी संध्याकाळी 5 वाजल्याच्या सुमारास इथे येऊन बसत होते.
रुची पारेख पुढे म्हणतात, "संध्याकाळी आम्ही घरातले चहा पिण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी एकत्र खिडकीजवळ जमा होत होतो. पण, या मुलांच्या अश्लील चाळ्यांमुळे आम्हाला खिडकी बंद ठेवावी लागत होती. घरात लहान मुलं, वयस्कर व्यक्ती असतात. त्यांनाही हे पाहणं अशक्य आहे."
रहिवासी सांगतात, या मुला-मुलींना अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. कधी स्वत: जाऊन तर कधी वॉचमनला पाठवून त्यांना समजावण्यात आलं.
'NO KISSING ZONE' लिहिल्याचा फायदा झाला?
रुची सांगतात, 'NO KISSING ZONE' असं लिहिल्यानंतर आता मुलं-मुली येणं बंद झालंय. काहीवेळा मुलं-मुली येतात, पण आता आमच्या सोसायटीसमोर हे अश्लील चाळे बंद झालेत.
"माझा किसिंगला विरोध नाही. पण या अश्लील चाळ्यांचा लोकांना खूप त्रास होतो," विनय अणसूणकर पुढे सांगतात. पण प्रेम काय आहे. हे मुलांना समजलं पाहिजे, ते पुढे म्हणतात.
कोव्हिडचा परिणाम काय झाला?
मरिन ड्राइव्ह, वांद्रे परिसरातील बॅन्ड स्टॅडचा समुद्र, वरळी सी-फेस ही मुंबईतील प्रेमी युगलांची हमखास भेटण्याची ठिकाणं. सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक मुलं-मुली या ठिकाणी दिवसरात्र फिरताना पहायला मिळायचे.
पण, कोरोनासंसर्गामुळे मुंबईतील सर्व सार्वजनिक ठिकाणं लोकांसाठी बंद करण्यात आली आहेत. मरिन ड्राइव्ह, वांद्रे परिसरातील बॅन्डस्टॅड आणि वरळी सी-फेसवर फक्त सकाळी चार तास आणि संध्याकाळी तीन तास फिरण्याची परवानगी आहे.
सरकारच्या नियमावलीनुसार दुपारी किंवा रात्री उशिरा या ठिकाणी फिरणाऱ्यांवर मुंबई पोलीस कारवाई करतात.
एकीकडे, सी-फेस बंद झाले तर दुसरीकडे गिरगाव आणि जूहूसारख्या चौपाट्यादेखील कोरोनासंसर्ग पसरण्याची भीती असल्यामुळे बंद करण्यात आल्यात आहेत. त्यामुळे बाहेर फिरण्यासाठी जायचं कुठे हा प्रश्न आहे.
प्रेमी युगलांचं मत काय?
मुंबईत प्रेमी युगलांसाठी जागेच्या मुद्द्यावर अनेक वर्षांपासून सतत चर्चा केली जात आहे. कोरोनामुळे मुंबईतील मोकळ्या जागा बंद झाल्यात. त्यामुळे जायचं कुठे हा प्रश्न प्रेमी युगलांसमोर आहे.
नाव न घेण्याच्या अटीवर कॉलेजच्या फर्स्ट इयरचा मुलगा म्हणाला, "लॉकडाऊनमध्ये भेट होत नव्हती. त्यानंतर समुद्रकिनारे, बीच आणि गार्डन बंद आहेत. मग भेटणार कुठे? रस्त्यावर बसण्याशिवाय पर्याय नाहीये. बरं आम्ही कोणाला त्रास देत नाही."