भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांना गुरुवारी रात्री उशिरा बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणी अटक करण्यात आली. जर्मनीहून बेंगळुरूला पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली.
प्रज्वल रेवन्ना बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एक्झिट गेटमधून बाहेर आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काहीही तणाव नव्हता. त्यानंतर लगेचच पोलीस, सीआरपीएफ आणि एसआयटीच्या पथकानं त्यांना घेरलं.
महिलांच्या लैंगिक छळाचे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. कर्नाटकातील हासन येथील जागेसाठी मतदान झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी ते जर्मनीला गेले होते.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी प्रज्वल रेवन्नाला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.
बेपत्ता झाल्यानंतर प्रज्वल यांना एक व्हिडिओ मेसेज समोर आला होता. त्यात ते 31 मे रोजी तपास करणाऱ्या एसआयटीसमोर हजर होणार असल्याचं सांगितलं होतं.
2960 व्हिडिओ क्लिप असलेले पेनड्राईव्ह बसस्थानकं, उद्यानं आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पेनड्राईव्ह मिळाल्यानंतर या प्रकरणी राजकीय आरोप झाले होते.
त्यानंतर अनेक पीडित महिलांनीही पोलिसांकडं तक्रार केली होती.
एका पीडितेनं रेवन्ना यांनी धमकावल्याचा आरोपही केला. 1 जानेवारी 2021 ते 25 एप्रिल 2024 दरम्यान त्यांच्या अधिकृत सरकारी बंगल्यावर बलात्कार केल्याचा आरोपही या पीडितेनं केला होता.
पीडितेनं न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाबही नोंदवला होता.
निवडणुकीदरम्यान हा मुद्दा समोर आल्यानंतर जेडीएस बचावात्मक पवित्र्यात आहे.
जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनीही प्रज्वलला तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी यांनीही याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. कर्नाटकमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएस आणि भाजपमध्ये युती होती आणि युतीच्या वतीनं प्रज्वल यांना हासन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Published By- Dhanashri Naik