कृषी विधेयकावर शिवसेनेने लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
"शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात. आमच्यासोबत सुद्धा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या. त्यांना आधी भूमिका घ्यावी लागेल. शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही," अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
अशाच प्रकारची प्रतिक्रिया माजी खासदार निलेश राणे, प्रकाश आंबेडकर यांनीही दिली. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदेतील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.