Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरे: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेले शिवसेना पक्षप्रमुख राजकीय आकलनाची उणीव असलेले नेते?

Uddhav Thackeray: Shiv Sena leader who is in the fray for Maharashtra's chief minister lacks party
, शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (11:17 IST)
श्रीकांत बंगाळे
1996-1997ची गोष्ट. राज ठाकरेंनी बॅडमिंटन शिकायचं ठरवलं. त्यासाठी ते दादरला सरावासाठी जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी 'दादू'ला म्हणजेच उद्धव ठाकरेंना खेळायला बोलावलं. पण एकदा खेळताखेळता उद्धव ठाकरे पडले. तेव्हा राज आणि त्यांचे काही मित्र उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून हसू लागले. त्यानंतर उद्धव यांनी सराव बंद केला, असा सगळ्यांचा समज झाला.
 
पण, उद्धव ठाकरेंनी सरावासाठी दुसरा कोर्ट बुक केला होता. बॅडमिंटन शिकण्यासाठी राज यांचा जो कोच होता, तोच उद्धव यांनी पळवला होता. त्यानंतर एकदा त्या कोचनं सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे आता इतकं उत्तम बॅडमिंटन खेळतात की ते आम्हालाही 'टफ फाईट' देतील.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा पोत समजून घेण्यासाठी हे उदाहरण फारसं बोलकं आहे.
 
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे आघाडी करून महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याची तयारी करत आहेत. या आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी करावं, अशी इच्छा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जाहीर बोलून दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही "यात कुठलंही दुमत नाही" म्हणत उद्धव ठाकरे यांच्या नावाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.
 
त्यामुळे सध्या तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी सर्वाधिक चर्चा आहे. पण उद्धव ठाकरेंचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे?
 
उद्धव ठाकरेंच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीविषयी 'द कझिन्स ठाकरे' या पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी सांगतात, "नव्वदच्या दशकात उद्धव ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला. 1985ला शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर ताबा मिळवला. या निवडणुकीत शिवसेनेच्या निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. असं असलं तरी, त्यांनी जाहीररीत्या राजकीय जीवनात प्रवेश केला नव्हता."
 
"1991ला शिशिर शिंदे यांनी शिवसेनेच्या मुलूंड शाखेवर एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम म्हणजे उद्धव ठाकरेंचा राजकीय जीवनातील अधिकृत प्रवेश, असं समजलं जातं," कुलकर्णी पुढे सांगतात.
 
भावांमधील धुसफूस
पण राज आणि उद्धव यांच्यातील स्पर्धा ही बॅडमिंटन कोर्टपुरती मर्यादित राहणार नव्हती. धवल कुलकर्णी आणखी एक किस्सा सांगतात -
 
"डिसेंबर 1991ला राज ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यावर एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. "या मोर्चाचं सगळं नियोजन झालं होतं. पण आदल्या रात्री 'मातोश्री'वरून राज यांना फोन गेला आणि उद्याच्या मोर्चात तुमच्यासोबत 'दादू'सुद्धा (उद्धव ठाकरे) भाषण करतील, असं सांगण्यात आलं. यामुळे राज ठाकरे चिडले आणि या दोन भावांमधील दरी वाढीस लागली."
 
या काळात राज ठाकरे शिवसेनेत लोकप्रिय होते. पण त्यांच्या आक्रमक शैलीमुळे काहीवेळा लोक दुखावले जात आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुढे केलं पाहिजे, असं शिवसेनेतल्या जुण्या-जाणत्या नेत्यांनी बाळासाहेंबाना सुचवलं.
 
त्याचदरम्यान रमेश केणी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांच नाव आलं आणि राज ठाकरे राजकारणातून थोडेसे साईडट्रॅक झाले.
 
याविषयी पत्रकार दिनेश दुखंडे सांगतात, "रमेश केणी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांची CBI चौकशी झाली. त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा आढळला नाही. या प्रकरणात ते निर्दोष सुटले, पण शिवसेनेची मात्र त्या काळात मोठी कोंडी झाली होती. राज ठाकरे यांनाही मोठी किंमत मोजावी लागली. ते केणी प्रकरणामुळे सक्रिय राजकारणात 5 वर्षं मागे फेकले गेले."
 
याच काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली. 1997च्या मुंबई महापालिका निवडणुकांपासून त्यांनी राजकारणात उघडपणे सहभाग घ्यायला सुरुवात केली. 2002च्या मुंबई महापालिका निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली. त्यावेळी राज यांच्या समर्थकांना तिकिटं नाकारण्यात आल्याच्या तक्रारी राज यांच्याकडे आल्या.
 
पुढच्या काळात राज ठाकरेंच्या जवळच्या लोकांना डावलणं, त्यांना तिकीट नाकारणं हे सुरूच होतं आणि जानेवारी 2003 मध्ये शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचीच चलती असणार आहे, हे स्पष्ट झालं होतं.
 
उद्धव ठाकरेंचं पर्व सुरू
2003च्या जानेवारी महिन्यात महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन भरलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या अनुपस्थितीत राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव कार्याध्यक्षपदासाठी मांडला आणि बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण हे सगळ्यांना समजलं.
 
"महाबळेश्वरमधील शिवसेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. उद्धव ठाकरे आपल्याला वाढू देणार नाही, हे नारायण राणे यांच्या लक्षात आलं आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले, तर 2006मध्ये राज ठाकरेंनी वेगळं होत 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' स्थापन केली.
 
"या दोन नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी आणि आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना खूप कष्ट घ्यावे लागले. पण, त्यात ते यशस्वी झाले. या सगळ्यांना मी एकत्र ठेवू शकतो, असं त्यांनी दाखवून दिलं," कुलकर्णी सांगतात.
 
उत्कृष्ट संघटक, पण...
"उद्धव ठाकरे यांची पक्षावरील पकड मजबूत आहे. ते उत्कृष्ट संघटक आहेत. त्यामुळेच 2014च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोदी लाट असतानाही त्यांनी शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणले होते," असं कुलकर्णी यांचं मत आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना वाटतं की "पक्षावरील पकड मजबूत असली तरी उद्धव ठाकरेंच्या राजकीय-सामाजिक आकलनात सखोलपणाची (depth) उणीव दिसते. एखाद्या विषयाचं खोलात जाऊन विश्लेषण करताना ते दिसत नाहीत. त्यांच्या वर्तनात खुलेपणा दिसत नाही. एखाद्या गोष्टीवर मत मांडताना ते माध्यमांना हेडलाईन जरूर देतात, पण त्यात आत डोकावल्यास तपशील सापडत नाहीत."
 
काँग्रेस नेत्यासारखी प्रतिमा
उद्धव ठाकरे यांची प्रतिमा काँग्रेस नेत्यासारखी असल्याचं राजकीय अभ्यासकांना वाटतं. "उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्त्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी मिळतंजुळतं आहे. याला अनुसरूनच त्यांनी राज्यात 'शिवशक्ती-भीमशक्ती' आणि 'मी मुंबईकर' असे प्रयोग केले आहेत. राज ठाकरे यांच्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्त्व आक्रमक नसलं, तरी उद्धव ठाकरेंनी कर्जमुक्ती, कष्टकऱ्यांचे प्रश्न, असे विषय जे शिवसेना अथवा मनसेनं उचलले नाहीत, ते उचलून धरले आहेत," असं धवल कुलकर्णी उद्धव यांच्या नेतृत्वाविषयी सांगतात.
 
विजय चोरमारे हाच मुद्दे पुढे नेत सांगतात, "उद्धव ठाकरे नेता म्हणून सामान्य लोकांसाठी सहजपणे उपलब्ध राहत नाहीत. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी या काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे त्यांना भेटण्यासाठी काही ठरावीक लोकांमार्फतच त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं."
 
मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाबद्दल अजून तरी काही अधिकृत किंवा जाहीर भूमिका स्पष्ट केली नाही. "ही लाखो शिवसैनिकांची भावना आहे आणि मला विश्वास आहे की उद्धव जी त्याचा आदर करतील," असं संजय राऊत म्हणाले. ती घोषणा आणि स्वतः उद्धव ठाकरे यांची भूमिका आज स्पष्ट होते का, हे पाहण औत्सुक्याचं ठरेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुष्काळी लातूर शहराला पाच अधिग्रहीत विहीरीतून प्रतिदिन 3 लाख 33 हजार लिटर पाणी मिळणार