Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार

Kunal Kohli
, गुरूवार, 5 मार्च 2020 (16:00 IST)
अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांच्या ‘जीसिम्स’ स्टुडीओने हिंदी निर्मितीमध्ये पाऊल टाकले असून प्रख्यात बॉलीवूड दिग्दर्शक कुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ या नवीन शोची निर्मिती ते करत आहेत. ही वेब मालिका ‘झी5’वर दाखल होत असून राजीव खंडेलवाल त्यात प्रमुख भूमिकेत आहे. 
 
भारतातील एक आघाडीचा स्टुडीओ म्हणून ख्याती असलेल्या ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)ने चित्रपट, टेलीव्हीजन आणि वेबसिरीज या क्षेत्रांमध्ये निर्मिती केली आहे. मराठीमध्ये कंपनीने अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रदर्शित केले आहेत. अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांच्या नेतृत्वाखालील या स्टुडीओने मोगरा फुलला, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांची निर्मिती केली असून भिकारी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. त्या चित्रपटांच्या माध्यमातून कंपनीने या क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले आहेत. स्थापनेपासून केवळ सात वर्षांमध्ये मनोरंजन विश्वातील दर्जेदार निर्मितीच्या माध्यमातून आपला खास असा ठसा कंपनीने उमटवला असून आता ती हिंदी मालिका निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे.  
 
दर्जेदार निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘जीसिम्स’ने ‘नक्सल’च्या माध्यमातून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. या मालिकेची संकल्पना अर्जुन आणि कार्तिक यांनी ‘झी5’च्या सहकार्यातून आखली आहे. ही मालिका भारतातील नक्षलवादी चळवळीवर बेतली आहे. या मालिकेसाठी तब्बल दिड वर्षांचे संशोधन केले गेले आहे आणि त्यासाठी या क्षेत्राशी संबंधित पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे सहाय्य घेतले गेले आहे. या मालिकेमध्ये वेब जगतातील अनेक आघाडीचे चेहरे नक्षलवाद्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 
 
कुणाल कोहली हे बॉलीवूडमधील एक आघाडीचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी फना, हम तुम, मुझसे शादी करोगी यांसारखे अत्यंत गाजलेले चित्रपट दिले आहेत. ‘नक्सल’ ही त्यांची पहिलीच वेबसिरीज असून ती त्यांच्या चित्रपटाएवढीच लोकप्रिय ठरेल, असा पूर्ण विश्वास आहे.
 
“नक्सल’मधील अत्यंत आव्हानात्मक अशा विषयाच्या माध्यमातून वेबसिरीज या अत्यंत लोकप्रिय अशा माध्यमामध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याची संधी मिळत असल्याचा मला आनंद आहे. या मालिकेची संकल्पना अर्जुन आणि कार्तिक यांची आहे. मी त्यांच्याबरोबर या विषयावर गेले सात महिने विचारविनिमय करतो आहे. या मालिकेचा नायक राजीव खंडेलवाल आहे, हीसुद्धा महत्वाची गोष्ट आहे. कारण यांसारख्या विषयाला पूर्ण न्याय देण्याची त्याची क्षमता आहे. ‘झी5’च्या संपूर्ण चमूचा मी मनापासून आभारी आहे. त्यातही ‘झी5’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तरुण कटियाल यांचा मी खूपच आभारी आहे कारण त्यांनी या मालिकेच्या प्रत्येक बाबीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे,” असे उद्गार कुणाल कोहली याने काढले. 
 
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांनी म्हटले की, या मालिकेच्या माध्यमातून हिंदी वेबसिरीज क्षेत्रात पदार्पण करत असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. “हिंदीमध्ये पहिल्या वेबसिरीजची निर्मिती करत असल्याचा आम्हांला खूप आनंद आहे. बॉलीवूडमधील एक सर्वात यशस्वी दिग्दर्शक म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या कुणाल कोहली यांच्या दिग्दर्शनाखाली ही मालिका आकाराला येत आहे आणि त्यात प्रमुख भूमिकेत आम्हाला राजीव खंडेलवाल लाभला आहे, हे आम्ही आमचे भाग्य मानतो. ‘झी5’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तरुण कटियाल यांनी या निर्मितीसाठी आम्हाला मोलाचे असे सहकार्य केले आहे. त्यामुळे वेबसिरीजच्या क्षेत्रात ही मालिका स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण करेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय म्हणता, सईच्या पायाला फ्रॅक्चर झाले