राजस्थानातील मेवाड प्रांतात चित्तोड आणि सिसोदे ही एकाच वंशाची दोन नावे असून त्यांच्या वंशांना रावळ आणि राणा अशा संज्ञा होत्या. सन १३०३ साली दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी करून ते राज्य हस्तगत केले. या वेळी चित्तोडचा रावळ रत्नसिंह व सिसोद्याचा राणा लक्ष्मणसिंह मारले गेले. राणा लक्ष्मणसिंहांच्या वंशातच पुढे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.
राणा लक्ष्मणसिंहांचे वारस सुजाणसिंह आणि क्षेमासिंह नशीब अजमावण्यासाठी दक्षिणेत आले. बहामनी साम्राज्यात सुजाणसिंहांनी आपली तलवार गाजविली. पुढे सुजाणसिंह यांचे वारस कर्णसिंह आणि शुभकृष्ण यांनी आपल्या पराक्रमाने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले.
दक्षिणेत आल्यानंतर बहामनी साम्राज्यात चाकरी करीत असताना बहामनीचा सेनापती महंमद गावाणसोबत सन १४६९ साली खेळणा किल्ला घेण्याकरिता कर्णसिंहाने मोठा पराक्रम केला. किल्ल्यावर चढण्यासाठी कर्णसिंहाने घोरपडीचा वापर केला आणि खेळणा हस्तगत केला. तेव्हापासून कर्णसिंहाच्या घराण्याला राजे घोरपडे बहाद्दरहा किताब प्राप्त झाला. तेव्हापासून कर्णसिंहांचे घराणे घोरपडे आडनावाने नांदू लागले. कर्नाटकातील मुधोळ या ठिकाणी घोरपडे घराण्याची जहागीर शेवटपर्यंत कायम होती.
कर्णसिंहाचा लहान भाऊ शुभकृष्णसिंहाने वेरूळ भागात आपली वस्ती निर्माण करून भोसले हे नाव धारण केले. भोसले नावावरून इतिहासकारांत मतभेद असून काहींच्या मते भोसा नावाच्या गावावरून तर काहींच्या मते भोसाजी नावाच्या व्यक्तीवरून या घराण्याला भोसले आडनाव पडले आहे. काही जण भोसल, भृशवल, भवशाल यांपासून भोसले आडनाव आल्याचे सांगतात तर काहींनी होयसल शब्दाचा अपभृंश होऊन भोसले नाव आल्याचे म्हटले आहे.
आधुनिक इतिहासकारांनी भोसले नावाची उत्पत्ती सांगताना म्हटले आहे की, रणांगणावर भूशिलेप्रमाणे पाय घट्ट रोवून राहणारा तो भोसला. याप्रमाणे कर्णसिंहाच्या वारसदारांनी पुढे भोसले हे आडनाव धारण केले. याच घराण्यात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील या भोसले घराण्याचा इतिहास मात्र बाबाजी भोसले यांच्यापासून प्राप्त होतो. बाबाजींचा जन्मकाळ १५४९ धरल्यास १७ व्या शतकातील शिवरायांच्या जन्मापर्यंत भोसलेंच्या एकूण बारा पिढ्या होतात.
भोसले घराण्यात अनेक पराक्रमी वीर जन्माला आले. बाबाजींची दोन्ही मुले मालोजी आणि विठोजी तर आपल्या कर्तृत्वाने नावारूपाला आले. बहामनी साम्राज्याचे तुकडे पडल्यानंतर अहमदनगरच्या निजामशाहीत मालोजीराजे बरेच नावारूपाला आले. मेवाडच्या भवानीप्रमाणे तुळजापूरच्या तुळजाभवानीला त्यांनी आपली कुलदेवता मानल्याने शिखर शिंगणापूर आणि तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलस्थाने बनली.
वेरूळ या ठिकाणी राहात असताना मालोजी राजेंनी आपल्या वतनदारीत मोठी वाढ केली. त्यामुळे बाबाजींपासून ते पुढे शेवटपर्यंत भोसले घराण्याचा आलेख वर-वर गेल्याचे दिसून येते. वतने आणि पाटीलकी मिळाल्याने भोसल्यांचा साम्राज्य विस्तार वेरूळपासून पुण्यापर्यंत पसरला. दौंडजवळील हिंगणी, बेरडी, देऊळगाव, खानवट, पेडगाव आणि करमाळा तालुक्यातील जिंती, इंदापूर तालुक्यातील कळस, सिन्नर तालुक्यातील बावी, नगरजवळील मुंगी पैठण आणि वेरूळ येथे भोसल्यांचे वतन कायम झाले. त्यामुळे शिवरायांचे भोसले घराणे हे पूर्वीपासूनच वतनदार आणि नावारूपाला आलेले घराणे होते हे स्पष्ट होते. विठोजीराजांची शाखा खानवट आणि मुंगी पैठणला स्थायिक झाली. मालोजींचे वारसदार पुढे बरेच नावारूपाला आले. याच भोसले कुळात शिवरायांचा जन्म झाला. साहजिकच सिसोदे वंशातील राणा दक्षिणेत राजे झाले. त्यामुळे मेवाडच्या राणाच्या घोरपडे आणि भोसले या दोन शाखा तयार झाल्या असल्या तरी या दोघांचे मूळ एकच आहे हे स्पष्ट होते. अशा रीतीने मेवाड ते रायगड असा भोसले घराण्याचा इतिहास यशोशिखरावर पोहोचला.