देशभरात करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २९ झाली आहे. करोनाचे २३ नवे रुग्ण आढळल्यामुळे दिल्लीत उपाययोजनांसाठी बैठक घेण्यात आली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपायांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. करोना नियंत्रणासाठी दिल्ली सरकारने कृतिगट स्थापन केला असून विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कठोर चाचणी केली जात आहे. या चाचणीत कुणी संशयित आढळला तर त्याला दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले जाईल, अशी माहिती केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिल्लीत आत्तापर्यंत १ लाख १६ हजार लोकांची थर्मल चाचणी करण्यात आली असून यापैकी ५ हजार प्रवासी करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांतून आलेले होते. राम मनोहर लोहिया रुग्णालयाशिवाय अन्य १८ सरकारी व ६ खासगी रुग्णालयेही करोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी सज्ज करण्यात आली आहे. एन -९५ मुखवटय़ांची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही केजरीवाल यांनी सांगितले. १५ जानेवारीनंतर परदेशात जाऊन आलेल्या नोएडातील ३७३ संशयितांच्या लक्षणांवर नजर ठेवली जात आहे. ५५ जणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून ४९ संशयितांना बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली राजधानी परिसरातील ३ शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.