‘कोरोना’ हा शब्द जरी ऐकला तरी आता कान पटकन टवकारतात आणि मनात धडकी भरते. या जीवघेण्या विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. म्हत्त्वाचं म्हणजे सर्दी, खोकला होऊ नये म्हणून आपण मास्क लावतोय खरं पण हा आजार हवेतून नाही तर स्पर्शातून पसरतोय हे जास्त जीवघेणं आहे. त्यामुळे एकमेकांना हात मिळविणे किंवा गळाभेट घेणे तर सोडाच पण आपला स्वत:चा मोबाईलदेखील हातात घेताना आपल्याला दहा वेळा विचार करावा लागतोय. आपल्या मोबाईलवर कोरोना तर चिकटला नसेल ना, अशी भीती मनात येते. पण मुख्य म्हणजे असं घाबरून न जाता जास्तीत जास्त काळजी कशी घेता येईल आणि स्वच्छता कशी बाळगता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं. स्वत:च्या शरीरासोबत आपल्या दररोज वापरातील वस्तूंची निगा राखायला हवी. आज आम्ही तुम्हाला आपला मोबाईल स्वच्छ कसा ठेवावा याबाबत सांगणार आहोत. अनेकजण मोबाईल पाण्याने धुवतात किंवा कोणत्याही कापडाने पुसतात. मात्र ही पद्धत अतिशय चुकीची असून यामुळे तुमचा मोबाईल बिघडण्याची शक्यता आहे.
मोबाईल स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत
१. तुमच्या मोबाईलला लावलेले इअर फोन्स किंवा कोणतीही डेटा केबल काढा आणि फोन बंद करा.
२. फोन कव्हरमध्ये असेल तर कव्हर काढून ठेवा.
३. मायक्रोफायबर कपड्याने हळूवारपणे मोबाइलचा सर्व पृष्ठभाग स्वच्छ करा. चुकूनही इतर कापड किंवा कागदाने मोबाईल पुसणे टाळा. ते गुळगुळीत नसल्यामुळे फोनच्या स्क्रिनवर ओरखडे निर्माण होऊ शकतात. (मायक्रोफायबर क्लॉथ म्हणजे स्वच्छतेसाठी तयार करण्यात आलेले (विशेष पोत असणारे) कापड.)
४. लायझोल, क्लोरोक्स किंवा कोणतंही साबण अथवा पाण्याचे काही थेंब मायक्रोफायबर कापडावर टाका. त्यानंतर मोबाईलची स्क्रिन आणि इतर भाग पुसण्यास सुरुवात करा. साबण किंवा पाणी थेट मोबाईलवर टाकू नका.
५. ओल्या मायक्रोफायबर कपड्याने पुसल्यानंतर आता दुसऱ्या स्वच्छ मायक्रोफायबर कपड्याचा वापर करा. या कपड्याने मोबाईलवरील पूर्ण ओलसरपणा पुसून टाका.
६. त्यानंतर पाच ते दहा मिनिटे मोबाईल सुकवा.
७. मोबाईल पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर तो तुम्ही चालू करुन वापरू शकता.
८. तुमचा फोन कधी पाण्यात पडला, तरी तुम्ही अशा पद्धतीने तो स्वच्छ करू शकता.
मोबाईल नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी…
१. वर दिलेल्या पद्धतीनुसार दिवसातून किमान २ वेळा फोन स्वच्छ करा.
२. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वापरणे टाळा. त्यामुळे मोबाईलवर विषाणू बसणार नाहीत.
३. बाथरूम आणि टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे कटाक्षाने टाळा.
४. जिममध्ये किंवा इतर कसरतीच्या ठिकाणीही मोबाईल वापरणे टाळा.