Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

वर्ल्ड कपची मॅच रिकाम्या खुर्च्यांनी पाहिली, पण ही मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर का झाली नाही?

modi stadium
, गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (22:55 IST)
जान्हवी मुळे
वन डे वर्ल्ड कपला सुरुवात झाली, पण गर्दी कुठे गेली?
 
सोशल मीडियावर आणि क्रिकेट चाहत्यांच्या मनात हाच प्रश्न रुंजी घालतो आहे.
 
यंदा विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड हे गतवेळचे विजेता आणि उपविजेता असलेले दोन तगडे संघ एकमेकांना भिडले.
 
पण अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीला म्हणावी तशी गर्दी जमा झालेली दिसली नाही.
 
त्यामुळे जितकी चर्चा मैदानावरच्या खेळाची झाली, त्यापेक्षाही जास्त रिकाम्या खुर्च्यांविषयी लोक बोलत आहेत.
 
1,32,000 आसनक्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये नेमक्या किती जागा भरल्या गेल्या आहेत, त्याची आकडेवारी अजून मिळालेली नाही. पण सामन्याची दृष्यं आणि फोटोंमध्ये रिकामे स्टँड्स स्पष्ट दिसतात.
 
आता आठवड्याचा मधला दिवस आहे. त्यात दुपारची वेळ आणि भारत खेळत नसल्यानं सामन्यासाठी कमी लोक जमा झाले असावेत अशी चर्चा आहे.
 
तर काहींच्या मते अहमदाबादऐवजी हा सामना मुंबईत वानखेडेवर भरला असता तर अशी परिस्थिती ओढवली नसती पण हे खरं आहे का आणि अहमदाबादच्या स्टेडियममधल्या रिकाम्या खुर्च्या नेमकं काय सांगत असाव्यात?
 
मोदी स्टेडियममध्ये गर्दी का जमली नाही?
बीबीसी गुजराथीचे प्रतिनिधी तेजस वैद्य या सामन्याआधी मोदी स्टेडियमबाहेर गेले होते आणि तिथे त्यांनी चाहत्यांशी संवादही साधला.
 
तेजस सांगतात, “दोन वाजता हा सामना सुरू झाला आणि चार-साडेचार वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो, तेव्हा लोक येतच होते. पण जितकं स्टेडियम भरायला हवं होतं, तेवढं भरलं नाही.”
 
अहमदाबादमधलं 33-34 अंश सेल्सियस तापमान आणि रणरणतं ऊन यांमुळे काहीजण स्टेडियमबाहेरच थांबले होते आणि ऊन कमी झाल्यावर आत जाणार होते.
 
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार भाजपच्या एका राजकीय नेत्यानं चाळीस हजार महिलांना या सामन्याचे पासेस दिले होते.
 
तेजस सांगतात की पण ज्यांना असे पासेस मिळाले होते, त्यांना सकाळी 11-11.30 वाजताच जमा केलं होतं. एवढा वेळ ताटकळत राहावं लागल्यानं लोकांचा उत्साह कमी होणंही स्वाभाविक आहे.
 
“दुसरं म्हणजे तुम्हाला मोबाईल आणि वॉलेट सोडून दुसरं काही स्टेडियममध्ये नेता येत नाही. भाजपनं पासेससोबत चहा आणि जेवणाचे कूपन्स दिल्याचं आम्हाला काहींनी दाखवलं. पण तिकीट फुकट मिळालं तरी आतमध्ये एखादी पाण्याची बाटली घेणंही महाग पडतं. त्यामुळेही अनेकजण येत नाही.”
 
या स्टेडियमपर्यंत जाणंही अनेकांसाठी थोडं अडचणीचं असल्याचं काही चाहत्यांनी तेजस यांना सांगितलं.
 
“गाडीनं गेलात तर ती दूर पार्क करावी लागते. सकाळपासून जाणार, रात्री उशीरा परत येणार. मुख्य म्हणजे भारताचा सामना नाही, तर आम्ही का जायचं?”
 
काही चाहत्यांना अपेक्षा होती की या सामन्यासोबत ओपनिंग सेरिमनीही पाहायला मिळेल. पण असा कुठला उदघाटन सोहळा होत नसल्यानं त्यांनी सामन्याकडे पाठ फिरवली असावी.
 
तेजस माहिती देतात की या सामन्यासाठी अगदी पुण्याहून, कोल्हापूरहूनही आलेले काही प्रेक्षक त्यांना भेटले. न्यूझीलंड आणि इंग्लंडहूनही कुणी आलं होतं. पण स्थानिकांनी जसा प्रतिसाद द्यायला हवा होता, तसा दिलेला दिसला नाही.
 
अर्थात 14 ऑक्टोबरला इथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात मात्र अख्खं स्टेडियम भरलेलं दिसेल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
 
जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम म्हणून नरेंद्र मोदी स्टेडिमयचं 2020 साली मोठ्या गाजावाजात उदघाटन झालं होतं. 63 एकरवर पसरलेल्या या स्टेडियमची आसनक्षमता 1,32,000 एवढी आहे.
 
त्यामुळे अगदी 20 हजार प्रेक्षक जमले तरी हे स्टेडियम तुलनेनं रिकामं वाटतं आणि हे काही चांगलं दृष्य नाही असंही मत काहीजण मांडत आहेत.
 
मग विश्वचषकाचा हा सलामीचा सामना इथे भरवण्याऐवजी दुसरीकडे भरवता आला असता का? तो अहमदाबादमध्येच का भरवला जातो आहे?
 
सामना वानखेडेवर का झाला नाही?
मुंबईचं वानखेडे, कोलकात्याचं ईडन गार्डन्स, चेन्नईचं एमए चिदंबरम स्टेडियम ही भारतीय क्रिकेटमधली ऐतिहासिक आणि आयकॉनिक स्टेडियम्स आहेत.
 
पण विश्वचषकाचा सलामीचा सामना, फायनल आणि महत्त्वाचं म्हणजे भारत पाकिस्तान सामना अहमदाबादमध्ये भरवला जातो आहे.
 
खरंतर ही गोष्ट भारतीय क्रिकेटचं आणि बीसीसीआयचं सत्ताकेंद्र बदललं असल्याचंच अधोरेखित करते.
 
2019 साली गुजरात क्रिकेट असोसिएशनचे तेव्हाचे संयुक्त सचिव जय शाह यांनी बीसीसीआयमध्ये पाऊल टाकलं, तेव्हापासूनच हा बदल घडू लागला.
 
जय शाह आता एशियन क्रिकेट कौंसिलचे अध्यक्ष आणि आयसीसीच्या फायनान्शियल कमिटीचेही प्रमुख आहेत. त्याचा प्रभाव पाहता मुंबई किंवा कोलकात्याऐजी अहमदाबादच्या स्टेडियमला प्राधान्य मिळणं ही नवी गोष्ट नाही.
 
याआधीही दालमियांच्या काळात ईडन गार्डन्सला तर शरद पवार यांच्या काळात वानखेडे स्टेडियला महत्त्वाच्या सामन्यांचं यजमानपद मिळायचं.
 
‘वानखेडेवरही हीच स्थिती येईल’
मुंबईच्या काही क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट केली आहे की हा सामना अहमदाबादऐवजी खेळवायला हवा होता, म्हणजे स्टेडियम एवढं रिकामं दिसलं नसतं.
 
कारण वानखेडेची आसनक्षमता 32,000 आहे आणि मुळात मुंबईमध्ये क्रिकेट चाहते भरपूर आहेत जे इतर देशांच्या सामन्यांनाही हजर लावतील.
 
काही अंशी ते खरंही आहे. 2011 सालच्या वन डे विश्वचषकादरम्यान श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या संघांमधल्या सामन्याचा हा फोटो पाहा.
 
पण वानखेडेवरही हीच परिस्थिती ओढवली तर आश्चर्य वाटू नये, असं ज्येष्ठ क्रीडापत्रकार आणि ‘स्पोर्टस्टार’चे संपादकीय सल्लागार विजय लोकपल्ली सांगतात.
 
ज्या शहरांमध्ये क्रिकेटची परंपरा आहे, खेळ रुजला आहे, तिथे परिस्थिती यापेक्षा थोडी बरी असली तरी अगदीच वेगळी नसेल असं त्यांना वाटतं.
 
“ज्या ज्या सामन्यांत भारत खेळत नाहीये, तिथे असंच चित्र दिसू शकतं. बीसीसीआय किंवा स्थानिक सरकार काही पावलं उचलत नाही, तोवर यात बदल होणार नाही. झिम्बाब्वेमध्ये भाड्यानं गर्दी जमा करण्याची पद्धत आहे तसं किंवा शाळेतल्या मुलांना सामना दाखवणं असं काही केलं नाही तर रिकाम्या खुर्च्याच दिसत राहतील.”
 
माजी कसोटीवीर विरेंद्र सहवागनं सोशल मीडियावर पोस्ट केलंय की, “आशा आहे की ऑफिसच्या वेळा संपल्या की आणखी लोक स्टेडियममध्ये येतील. पण भारतीय संघ खेळत नसेल त्या सामन्यांची मोफत तिकिटं शाळा आणि कॉलेजच्या मुलांमध्ये वाटता येतील.
 
"50 षटकांच्या खेळात लोकांचा घटता रस पाहता, युवा पिढीला वर्ल्ड कप पाहण्याचा अनुभव देणं फायद्याचं ठरेल आणि खेळाडूंनाही भरलेल्या स्टेडियममध्ये खेळता येईल.”
 
अहमदाबादच्या स्टेडियममधल्या रिकाम्या खुर्च्या वन डे फॉरमॅटमध्ये लोकांचा रस कमी झाल्याचं दाखवते, असं काहीजण म्हणतायत.
 
कारण ज्या मोदी स्टेडियमवर वन डे विश्वचषकाच्या सामन्यात स्टँड्स रिकामे राहिले, त्याच स्टेडियमवर यंदा आयपीएलच्या मोसमातल्या पहिल्या सामन्यासाठी आणि फायनललाही मोठी गर्दी उसळली होती.
 
ते पुढे विचारतात, “लोकांना वाटतं ना, क्रिकेट किती लोकप्रिय आहे. आता कळून आली ना क्रिकेटची लोकप्रियता?”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रिकेट वर्ल्ड कप ENG vs NZ : रचिन रविंद्र, डेव्हॉन कॉनवेची शतकं, न्यूझीलंडचा गतविजेत्या इंग्लंडला दणका