फास्टॅगच्या त्रासातून देशाला लवकरच मुक्ती मिळणार आहे. यासोबतच टोलनाकेही आता भूतकाळातील गोष्ट होणार आहेत. वास्तविक, राष्ट्रीय महामार्गावरील टोल हटवून ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेऱ्यातून टोल टॅक्स वसूल करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.
बिझनेस स्टँडर्डवर प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, सध्या टोल प्लाझावर FASTag द्वारे कर कापला जातो . पण, लवकरच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे हे काम करतील. कॅमेरे या स्वयंचलित नंबर प्लेट्स वाचतील आणि तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्सचे पैसे कापले जातील.
यासंदर्भात माहिती देताना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, या योजनेवर पथदर्शी प्रकल्प म्हणून काम सुरू आहे. ही योजना लागू करण्यासाठी कायदेशीर सुधारणा करण्याचाही विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
नंबर प्लेट रीडर कॅमेरे बसवणार
नितीन गडकरी म्हणाले की, आता टोल प्लाझा हटवून नंबर प्लेट रीडर कॅमेरे बसवण्याची तयारी सुरू आहे, जे वाहनचालकांकडून टोल टॅक्स वसूल करतील. रिपोर्टनुसार, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेऱ्यांद्वारे टोल टॅक्स वसूल करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. मात्र, या प्रकल्पातही काही अडथळे निर्माण होत असून, ते सोडविण्याचा विचार सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. उदाहरणार्थ, नंबर प्लेटवर नंबर सोडून दुसरे काही लिहिले लिहिले असेल तर कॅमेरा वाचण्यात अडचण येऊ शकते.