Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गजानन महाराज पुण्यतिथी : ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली

Webdunia
शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (09:50 IST)
गजानन महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. शेगाव (बुलढाणा जिल्हा), महाराष्ट्र, येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाया) चे भारतीय गुरू होते. त्यांना भगवान गणेश यांचा अवतार मानला जातो. त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाच्या २०व्या वर्षी १८७८च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला दिसले. त्यांचे अनुयायी ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून, आणि ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात.
 
गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री. दासगणू महाराज यांनी लिहिला असून त्याचे नाव "श्री गजानन विजय असे आहे. या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात. वर्णनाप्रमाणे सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती. पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे.
 
गजानन महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते . चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत. आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.
 
महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे व्यतीत केला असला तरी कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे.
 
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराजमात्र हा पूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तेथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले, त्यांतलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात.
 
जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"
 
लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.
 
त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, "जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||" आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली.
 
८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Navratri 2024 : स्तुती सुमने आई मी,उधळली

Shardiya Navratri 2024 शारदीय नवरात्री साजरी करण्यामागील कारण माहित आहे का? श्रीरामाने देवीची पूजा का केली?

महिला पिंड दान करू शकतात का?

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

आरती शनिवारची

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments