Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लघुभागवत - अध्याय ६ वा

लघुभागवत - अध्याय ६ वा
, बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:23 IST)
आतां पुढील अनुसंधान । ऐका तुम्ही सावधान । नारदनीति परम गहन । बोधप्रद अत्यंत ॥१॥
एकदां नारदासी युधिष्ठिर । पुसतसे सादर । सनातन धर्माचे सार । कल्याणाचें निधान जें ॥२॥
धर्मराज म्हणे स्वामी । बहुतां मुखीं ऐकिलें आम्ही । ईशप्राप्ति येचि जन्मीं । वर्ततां वर्णाश्रमधर्मे ॥३॥
तरी प्रतिवर्णाचे धर्म । पाळावयासी कवण नियम । येविषयी माझा भ्रम । दूर केला पाहिजे ॥४॥
ऐसा प्रश्न परिसुनी । संतोषले नारदमुनी । म्हणती सांगतो तें मनीं । धरुनि, तैसें वर्तावें ॥५॥
सनातन धरासी आधार । ऋग्वेदादि वेद चार । तेथूइ स्मृतींचा विस्तार । धर्मराया जाहला ॥६॥
ब्राम्हणादि चार वर्ण । त्या सर्वांसी जे साधारण । शास्त्रविहित आचरण । तेचि आधी सांगतो ॥७॥
मुख्य पाहिजे ईश्वरभक्ती । गुरुजनांचे गौरव चित्तीं । शास्त्रपुराणें श्रुती स्मृती ।  यांवरी श्रद्धा असावी ॥८॥
सत्य भाषण आर्जव । सहनशील प्रेमळ स्वभाव । माधुर्य सत्यत्व मार्दव । वाचेमध्ये असावें ॥९॥
ऐश्वर्याचा नसावा गर्व । आप्त इष्ट जन दीन सर्व । यांचे ठायीं आत्मीय भाव । निरंतर असावा ॥१०॥
सर्वभूतीं सारखी दया । शुचिर्भूत रक्षावी काया । सोडूं नये कदापि विनया । प्रांजळ बुद्धि असावी ॥११॥
कोणाचा न कीजे उपहास । देऊं नये कोणा त्रास । करूं नये भलतें साहस । येतें अपयश त्या योंगे ॥१२॥
परद्र्व्य परनारी । यापासून असावे दूरी । यांसमान दुजे वैरी । नाहींत कोणी जगासी ॥१३॥
परनाशाची वासना । तीच आत्मघाताची सूचना । म्हणूनि सांडूनि हीन कल्पना । सरळ वृत्ती धरावी ॥१४॥
शक्य तितका निरंतर । करावा सर्वत्र परोपकार । नसावें कपट द्वेष मत्सर । मनीं सुविचार धरावा ॥१५॥
अंध पंगू रोगी जन । यांसी यथा शक्ति द्यावें दान । स्वाधीन असावें मन । कांही व्यसन नसावें ॥१६॥
कोठें नसावा अति स्नेह । त्यापासूनि अंती कलह । म्हणूनि असावें नि:स्पृह । त्यासारिखें सुख नाही ॥१७॥
धरूं नये भलती भीड । बोलावें सत्य सरळ उघड । करूं नये व्यर्थ बडबड । परी तत्व रक्षावें ॥१८॥
कार्य करुनि नंतर । प्रगट करी तोचि चतुर । तोचि व्यवहारदक्ष साचार । दूरदर्शी म्हणावा ॥१९॥
न चढतां स्वयें क्रोधा किंवा न करिता अमर्यादा । भाषण करावें सर्वदा । निराभिमान वृत्तीनें ॥२०॥
सकल म्हणतील धन्य धन्य । ऐसें अंगी असावें सौजन्य । मनीं एक मुखीं अन्य । परम दैन्य ते जाणा ॥२१॥
दया असावी सर्वत्र साचार । परी बाह्य वृत्ति पाहिजे क्रूर । तरीच दासदासी इतर । मानिती धाक आपुला ॥२२॥
तथापि देऊं नये कोणा कष्ट । देव नाही त्यांत संतुष्ट । दुष्ट बुद्धिने होय अनिष्ट । आपुलेचि परिणामीं ॥२३॥
हानि केलिया आपण । तेणें आपलाच नाश दशगुण । जैसें पेरिले तें शतगुण पिकासी येई स्वभावें ॥२४॥
म्हणूनि चित्त निर्मळ । ठेऊनि वागावें सरळ । त्यांतचि कल्याण सर्वकाळ । कुटूंबाचें होतसे ॥२५॥
सारांश ईश्वराचें भय । धर्मनीति सत्यत्व विनय । यांपासूनि सर्वत्र जय । नि:संशय लाभतो ॥२६॥
चारी वर्णासी सर्वसाधारण । शास्त्रीं कथिलें हें लक्षण । आतां विशेष आचरण । प्रतिवर्णाचे सांगतो ॥२७॥
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्र । यथानुक्रम वर्ण चार । ब्रम्ह जाणूनि वागे पवित्र । तो ब्राम्हण जाणावा ॥२८॥
अध्ययन अध्यापन । यजन आणि याजन । प्रतिग्रह आणि दान । हें षड्कर्म विप्रांचें ॥२९॥
शास्त्रोक्त नियमानुसार । ज्यांआ व्यवहार आचार । तेचि ब्राम्हण साचार । आधार इतर वर्णांसी ॥३०॥
चित्तेंद्रियांचे दमन । क्षमा शुचित्व शास्त्रज्ञान । ईशश्रद्धा तप साधेपण । हे मुख्य गुण विप्रांचे ॥३१॥
जे नेणती वेदपठण । नियमें न करिती संध्यावंदन । करिती मद्यमांससेवन । त्यांसी ब्राम्हण म्हणूं नये ॥३२॥
ऐसे जे दुराचारी विप्र । ते पतित किंवा अपवित्र । त्यांची जगीं सर्वत्र विटंबना होतसे ॥३३॥
त्यांसी नाहीं कोठे मान । ते जाणावे शूद्रासमान । त्यांची निंदा इतर वर्ण । करिती उघड मुखावरी ॥३४॥
आतां क्षत्रियांचे विशेष धर्म । दक्षता धैर्य पराक्रम । निर्भय वृत्ति औदार्य परम । सामर्थ्य धाडस मुख्यत्वें ॥३५॥
वेदाध्ययन यज्ञ दान । शास्त्राधारें हीं कर्मे तीन । करावया अधिकार पूर्ण । असे क्षत्रिय वैश्यांसी ॥३६॥
जे भूपालनीं असमर्थ । त्यांसी क्षत्रिय नाम व्यर्थ । त्यांची वल्गना वृथा निश्चित । दग्धबीज ज्यापरी ॥३७॥
आतां वैश्यकर्म स्वाभाविक । ईश्वरभक्ति बुद्धि धार्मिक । गोपालन वाणिज्य सात्विक । कृषिकर्म त्यांतें नेमिलें ॥३८॥
घेऊनि लाभ परिमित । व्यापार करावा शुद्ध चित्त । लहान थोर जन समस्त । एक्या मोलें तोलणें ॥३९॥
तीन्ही वर्णाची करिती सेवा । तो शूद्रवर्ण मानावा । संचिताचा जैसा ठेवा । तैसा जन्म येतसे ॥४०॥
मनुष्यजन्म आल्यावरी । बुद्धि पराक्रम जैशापरी । तैसी स्थिती वाईट बरी । सहन केली पाहिजे ॥४१॥
दुसर्‍यासी देऊनि दोष । न चुकती आपुले क्लेश । समस्त जीव प्रारब्धवश । असती येथें नरलोकीं ॥४२॥
तळमळ करुनि वायस । कैसा होईल राजहंस । सांगणे इतुकाचि सारांश । कर्मापरी जन्म हा ॥४३॥
या कारणें प्रारब्धानुरुप । जन्म आला तो निष्पाप । मानूनि जेवीं आईबाप । वर्तले तैसें वर्तावें ॥४४॥
याहुनि सांगूं काय अधिक । मति वृत्ति ज्याची सात्विक । तो हीन तरी निष्कलंक । निश्चयेंचि जाणावा ॥४५॥
शूद्र वर्ण नसतां देशीं मरतील सकल उपवासी । म्हणूनि नसावा शूद्रांसी । खेद शूद्रजन्माचा ॥४६॥
वायूसि जैसें नभ । तेचीं देशाचे आधारस्तंभ । शूद्रचि होत म्हणूनि लोभ । सतत कीजे त्यांवरी ॥४७॥
आतां जैसे कां वर्ण चार । तितुकेची आश्रम साचार । तत्संबंधी ऐका विचार । अतिसंक्षिप्त सांगतों ॥४८॥
ब्रम्हचर्य गृहस्थाश्रम । वानप्रस्थ संन्यास उत्तम । प्रत्येकाचें भिन्न कर्म । आहे शास्त्रीं निरुपिलें ॥४९॥
ब्रम्हचर्याश्रम प्रथम । सांगतो त्याचे मुख्य नियम । विद्याभ्यास सतत उत्तम । सावधान करावा ॥५०॥
आवरुनि वासना । वसावें गुरुच्या सदना । गुरुचरणीं सद्भावना । ठेवूनि आज्ञा पाळावी ॥५१॥
सेवाधर्में गुरुचें मन । करुनि घ्यावें सुप्रसन्न । तरीच विद्याध्ययन । सफल होय शेवटीं ॥५२॥
क्षुधाशांत्यर्थ आहार । परिमित करावा निरंतर । आहार सेवितां अपार । निद्रा जडत्व येतसे ॥५३॥
सदा साधें वर्तन । नसावें कांहीच व्यसन । वर्ज्य करावें दिवा शयन । उन्मत्त भाषण सांडावें ॥५४॥
अवश्य पडेल कारण । तरीच स्त्रियांसी संभाषण । कार्यापुरतें करावें, पूर्ण । शुद्ध चित्त ठेवूनी ॥५५॥
जो कां ब्रम्हचर्य व्रती । तेणें स्त्रियांचे संगती । प्राणान्तींही एकान्तीं । राहूं नये क्षणमात्र ॥५६॥
सोडूनि सर्व कुसंगती । विद्याभ्यास धरावा चित्तीं । तरीच गुरुची प्रीती । जोडूनि कल्याण होतसे ॥५७॥
ऐसा ब्रम्हचर्याश्रम धर्म । ज्यासी कळलें याचें वर्म । त्याचा झाला सफल जन्म । सुनिश्चित हें असे ॥५८॥
आतां गृहस्थाश्रमाचे नियम । जयानें पाळिले उत्तम । त्यातें होय सुख परम । अहोरात्र संसारीं ॥५९॥
सर्वां ठायीं परम प्रीती । दक्ष असावें स्वहितीं । सदा ठेवावी सानंद वृत्ती । चित्तीं शांति असावी ॥६०॥
गृहीं राबती सेवक । त्यांसी असावा पूर्ण धाक । परी आपुलें वर्तन सात्विक । आधि आवश्य असावें ॥६३॥
यथाशक्ति प्रतिदिन । वाचकांसि करावें दान । नित्यनैमित्तिक कर्माचरण । कुलधर्मही पाळावे ॥६२॥
काढूनि दुसर्‍याचें ॠण । करूं नये साजरा सन । पाहूनियां आंथरूण । सुज्ञें शयन करावें ॥६३॥
अतिथि स्नेही सोयरे । वागवावे एक्याचि आदरें । साधेल तितुकें करावें बरें । हेंचि सुख संसारीं ॥६४॥
भार्या साध्वी सद्गुणी सदनीं । पुत्र पौत्र अर्ध्या वचनीं । सेवक संपत्ति समृद्ध, याहुनी । अधिक काय स्वर्गांत ॥६५॥
न्याये मिळवावे धन । करावें परमार्थसाधन । प्रेम विश्वास संपादन । करुनि जन सुखवावे ॥६६॥
मुख्य पाहिजे चित्ती दया । नातरी गृहस्थाश्रम वायां । आतां ऐक धर्मराया । वानप्रस्थ आश्रम ॥६७॥
संसारतृप्ती झालिया मना । छेदूनि विषयवासना । दूर जाऊनि कानना । एकांतस्थळी बसावें ॥६८॥
स्वाभाविक होय उत्पन्न । तें कंदमूल फक्त भक्षण । करुनि रक्षावे प्राण । राहूं नये कुटुंबीं ॥६९॥
निर्मत्सर निरभिमान । धरावें मनि समाधान । करावें ईश चिंतन । अनासक्त असावें ॥७०॥
आतां संन्यासलक्षण । कर्म करुनि ईश्वरार्पण । फलाविषयीं चित्त शून्य । सर्वकाळ असावें ॥७१॥
लेशमात्र नसावी आस । सुखदु:खाठायीं चित्त निरिच्छ होय मानस । तो संन्यास म्हणावा ॥७२॥
शिखासूत्रपरित्याग । भगव्या वसनें झांकिलें अंग । तेणें न घडे संन्यास योग । संन्यासाचे सोंग ते ॥७३॥
ऐसें नारदनीतीचे सार । उमजूनि करावा व्यवहार । प्राप्त होय यश निरंतर । हें निर्धारें जाणावे ॥७४॥
भागवत ग्रंथ प्रसिद्ध । तेथील सार सुबोध । गातसे गोविंद सानंद । बालहिताकारणें ॥७५॥
याचें करितां श्रवण पठण । आयुरायोग्य ऐश्वर्य पूर्ण । प्राप्त होय विद्याधन । ऐसें वरदान व्यासाचें ॥७६॥
इति श्रीलघुभागवते षष्ठोऽध्याय:  ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लघुभागवत - अध्याय ५ वा