suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवराज्याभिषेक दिन भाषण Shivrajyabhishek Sohala Speech 2026

"प्रौढ प्रताप पुरंधर, 
क्षत्रिय कुलावतंस, 
सिंहासनाधिश्वर, 
महाराजाधिराज, 
योगीराज, 
श्रीमंत, 
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!"
 
मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व शिवभक्त बंधू-भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
 
आजचा दिवस म्हणजे ६ जून १६७४. हा केवळ एक दिवस नाही, तर हा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवलेला आणि आपल्या सर्वांच्या अभिमानाचा दिवस आहे! याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याचा पाया रचला गेला.
 
शिवरायांच्या आधी या महाराष्ट्रावर निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांची जुलमी राजवट होती. रयत स्वतःच्याच भूमीत गुलाम बनून जगत होती. मंदिरे पाडली जात होती, माता-भगिनींची अब्रू धोक्यात होती आणि शेतकऱ्यांच्या घामाची किंमत नव्हती. अशा अंधकारात शिवरायांनी हातामध्ये स्वराज्य स्थापनेची मशाल घेतली. ६ जून १६७४ रोजी जेव्हा महाराज सिंहासनावर बसले, तेव्हा जगाला संदेश गेला की—"आता हे राज्य कोण्या परकीय सुलतानाचे नाही, तर हे 'हिंदवी स्वराज्य' आहे, हे रयतेचे राज्य आहे!"
 
मुघलांच्या आणि आदिलशाहीच्या गुलामगिरीत पिचून गेलेल्या जनतेला, स्वतःचे राज्य म्हणजे काय, हे महाराजांनी दाखवून दिले. ‘रयतेचे राज्य’ कसे असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य. त्यांनी कधीही धर्म, जात किंवा पंथ असा भेद केला नाही. शेतकरी, कष्टकरी आणि महिलांचा सन्मान हे त्यांच्या स्वराज्याचे मुख्य वैशिष्ट्य होते.
 
शिवाजी महाराज हे केवळ युद्ध जिंकणारे राजे नव्हते, तर ते 'प्रजाहितदक्ष' राजे होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असा सैन्याला कडक आदेश दिला.
त्यांनी महिलांचा आदर करायला शिकवला, मग ती शत्रूची सून का असेना!
त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे तोडण्यावर बंदी घातली आणि जलव्यवस्थापनाचे उत्तम आदर्श उभे केले.
 
आज रायगडावर शिवभक्तांचा महापूर आला असेल. पण मित्रांनो, शिवरायांचे विचार फक्त अंगात आणून चालणार नाही, तर ते आपल्या कार्यात आणले पाहिजेत. शिवरायांची जयंती साजरी करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शिवरायांचे विचार जगणे महत्त्वाचे आहे.
 
स्त्रीचा सन्मान करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, गरिबांना मदत करणे आणि आपल्या देशावर, मातीवर मनापासून प्रेम करणे, हीच शिवरायांना दिलेली खरी मानवंदना ठरेल.
 
आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपण सर्वांनी एकच संकल्प केला पाहिजे, की महाराजांनी दाखवलेल्या समतेच्या आणि न्यायाच्या मार्गावर आपण नेहमी चालत राहू. त्यांनी दिलेल्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहू.
 
जाता जाता महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो:
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू,
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी!
जय भवानी, जय शिवाजी!
जय हिंद, जय महाराष्ट्र!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shivrajyabhishek 2026 Images शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोशल मीडियावर शेअर करा शुभेच्छा Photos