इस्रायलने सीरियावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच सीरियन सैनिक ठार झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने राज्य माध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सीरियाची राजधानी दमास्कसवर हा हवाई हल्ला करण्यात आला.
इस्त्रायलने दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि राजधानीच्या दक्षिणेकडील इतर ठिकाणी हवाई हल्ले केले, असे सीरियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. पाच जवान शहीद झाले आणि मालमत्तेचे नुकसान झाले. सीरियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हा हल्ला परतवून लावला आणि बहुतेक क्षेपणास्त्रे पाडण्यात यश मिळवले, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
दमास्कस विमानतळावरील उड्डाणांवर इस्रायली हल्ल्याचा परिणाम अद्याप ज्ञात नाही. प्रादेशिक राजनैतिक आणि गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, इस्रायलने सीरिया आणि लेबनॉनमधील मित्र राष्ट्रांना शस्त्रे वितरीत करण्यासाठी इराणचा हवाई पुरवठा रोखण्यासाठी सीरियन हवाई तळांवर हल्ले वाढवले आहेत.
दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये वारंवार चकमकी होत असतात. दोघांमध्ये जुना वाद आहे. गोलन हाइट्स किंवा गोलन हिल्सच्या ताब्यावरुन दोघांमध्ये लष्करी संघर्ष झाला आहे. ही टेकडी एकेकाळी सीरियाच्या ताब्यात होती, पण 1967 मध्ये अरब देशांसोबतच्या युद्धानंतर इस्रायलने ती ताब्यात घेतली.