Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पाळीव कांगारूच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

पाळीव कांगारूच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
, मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (13:37 IST)
पाळलेल्या कांगारूने हल्ला केल्यामुळे एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा कांगारू त्या व्यक्तीने पाळला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
ही 77 वर्षीय व्यक्ती त्याच्या रेडमंड येथील घरात जखमी अवस्थेत त्याच्या नातेवाईकांना आढळली. रेडमंड पर्थ पासून 400 किमी अंतरावर आहे. जेव्हा वैद्यकीय पथक त्यांच्यावर उपचार करायला आलं तेव्हा कांगारूने या व्यक्तीवर उपचार करण्यास अडथळे निर्माण केले.
 
त्यामुळे या मादी कांगारूला पोलिसांनी ठार केलं. त्या व्यक्तीचाही मृत्यू झाला.
 
कांगारूने या व्यक्तीवर हल्ला का असं पोलीस प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांना सांगितलं. ऑस्ट्रेलियात 5 लाख कांगारू राहतात. मात्र असे हल्ले करण्याची घटना दुर्मिळ आहे. 1936 नंतर पहिल्यांदाच कांगारूने असा हल्ला केल्याची घटना घडली आहे. अमेरिकेत पाळीव सापांमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
 
अमेरिकेत 2019 साली घडली होती अशी घटना
अमेरिकेत एक महिला गळ्याला अजगराचा विळखा पडलेल्या अवस्थेत मृत आढळली आहे. विशिष्ट पट्ट्यांची त्वचा असलेला हा अजगर 8 फूट लांबीचा होता.
 
लॉरा हर्स्ट (36) असं या महिलेचं नाव आहे. इंडियाना प्रांतातल्या ऑक्सफोर्ड शहरात ही घटना घडली आहे.
 
ज्या घरात हा सगळा प्रकार घडला तिथे जवळपास 140 साप आणि अजगर होते. या सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीच हे घर वापरण्यात येत होतं.
 
या सापांपैकी जवळपास 20 साप लॉरा यांच्या मालकीचे होते आणि त्या आठवड्यातून दोन दिवस सापांना बघण्यासाठी इथे यायच्या.
 
विशेष म्हणजे हे घर बेनटॉन काउंटीचे पोलीस अधिकारी डॉन मनसन यांच्या मालकीचं आहे. ते शेजारच्याच घरात रहायचे. त्यांनी 'द जर्नल अँड कुरियर' या स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम त्यांनीच लॉरा हर्स्ट यांना फरशीवर निपचित पडलेलं बघितलं होतं.
 
ही अत्यंत 'दुर्दैवी घटना' असल्याचं आणि आपण 'सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करत' असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
डॉन मनसन यांनीच लॉरा यांच्या गळ्याभोवती विळखा घालून बसलेला अजगर काढला. मात्र, वैद्यकीय पथकाला लॉरा यांचे प्राण वाचवता आले नाही, अशी माहिती इंडियानाचे पोलीस अधिकारी सार्जेंट किम रिले यांनी दिली.
 
लॉरा हर्स्ट बॅटल ग्राउंड शहरात राहायच्या आणि तिथून त्या आपल्या सापांना भेट देण्यासाठी आल्या होत्या, असंही सार्जेंट किम रिले यांनी सांगितलं.
 
या घटना दुर्मीळ आहेत. या घटनांमध्ये वन्यप्राण्यांनाच पाळीव प्राणी बनवल्यामुळे अशा घटना घडल्याचं दिसतं पण जर पाळीव प्राणी घरात असतील तर त्याचे फायदे देखील असतात असं तज्ज्ञ सांगतात.
 
पाळीव प्राणी असल्याचे फायदे
पाळीव प्राण्याने मालकाला ठार करण्याच्या घटना दुर्मिळ असल्या तरी प्राणी पाळण्याचे फायदेही असतात.
 
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की पाळीव प्राण्यासोबत खेळताना आपल्या शरीरात ऑक्सीटोसीन तयार होत असतं. हे हॉर्मोन मेंदू शांत होण्यास मदत करतं. त्यामुळे चिंता आणि ताण कमी होतो.
 
इतकंच नाही तर शरीरात ऑक्सिटोसीन तयार होत असल्याचं प्राण्यांनाही जाणवतं. त्यामुळे मनुष्य आणि प्राणी यांच्यात घट्ट नातं तयार होण्यास मदत होते.
 
प्राणी पाळणाऱ्यांमध्ये कॉर्टीसॉल या स्ट्रेस हॉर्मोन्सची पातळी कमी असल्याचंही अभ्यासात आढळलं आहे. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता कमी होते.
 
सतत प्राण्यांची देखभाल करणाऱ्यांमध्ये भावनांवर नियंत्रण राहण्याबरोबरच, सामाजिक भान आणि स्वाभिमान या भावना वृद्धिंगत होतात.
 
सजीव प्राण्याशी जबाबदारीने वागल्याने लहान मुलांवरही चांगले संस्कार होतात. ते अधिक जबाबदार बनतात. त्यांना शिस्त आणि चांगल्या सवयी लागतात.
 
पाळीव प्राण्याचा सांभाळ करणं मेहनतीचं काम असलं तरी त्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं.
 
कुत्र्याला किंवा मांजराला फिरायला नेणं असो, मेंढ्यांना चरायला नेणं असो किंवा हत्तीला आंघोळ घालणं असो, प्राणी आपलं शरीर सक्रीय ठेवण्यास मदत करतात.
 
ज्यांच्या घरी कुत्रा आहे आणि जे त्याची रोज काळजी घेतात, त्यांचं शरीर सक्रीय असतं आणि कुत्रा नसलेल्या लोकांपेक्षा त्यांचा बांधा चांगला असतो, असं अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या एका अभ्यासात आढळलं आहे.
 
पाळीव प्राणी असेल तर समाजात तुम्ही एकटे पडण्याची शक्यता खूप कमी होते, असं संशोधनात आढळलं आहे. कारण तुमच्याजवळ प्राणी असेल तर इतर लोक तुमच्याशी अधिक बोलतात आणि तुमचा संवाद वाढतो.
 
प्राण्याला फिरायला घेऊन गेल्यावर अनेक अनोळखी आणि प्राणी पाळणारे इतर माणसंही उत्स्फूर्तपणे बोलतात, असं कुणीही सांगेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई-महाराष्ट्रात फिरायचंय ना?- नारायण राणेंचा ठाकरे गटाला इशारा