Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चार्ल्स तृतीय यांची नवे राजे म्हणून घोषणा

चार्ल्स तृतीय यांची नवे राजे म्हणून घोषणा
, शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (22:41 IST)
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर चार्ल्स तृतीय यांची नवे राजे म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा सेंट जेम्स पॅलेस येथे करण्यात आली. राज्यारोहणाच्या समितीमध्ये ज्येष्ठ राजकीय नेते, न्यायमूर्ती, अधिकारी यांचा समावेश असतो. या समितीने चार्ल्स यांची राजेपदी घोषणा केली. अशी घोषणा करण्याच्या कार्यक्रमाचे चित्रिकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वतः राजे उपस्थित नव्हते. पण नंतर दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या पहिल्या प्रिव्ही काऊन्सिल बैठकीला ते उपस्थित राहिले. प्रिव्ही काऊन्सिलचे क्लर्क रिचर्ड टिलब्रूक यांनी 'गॉड सेव्ह द किंग'ची घोषणा करण्याआधी चार्ल्स यांची 'किंग ऑफ द कॉमनवेल्थ, डिफेंडर ऑफ द फेथ' अशी घोषणा केली. अभ्यागतांनी पूर्ण भरुन गेलेल्या सभागृहात क्विन कॉन्सर्ट, प्रिन्स ऑफ वेल्स, पंतप्रधान लिझ ट्रस यांनी या वाक्याचा पुनरुच्चार केला.
 
राजेपदी घोषणा झाल्यावर राजे चार्ल्स म्हणाले, "माय लॉर्ड्स, लेडिज अँड जेंटलमेन, माझी प्रिय आई, महाराणी यांचं निधन झाल्याची घोषणा करण्याची दुःखद जबाबदारी मी पार पाडत आहे." "तुम्ही एक राष्ट्र म्हणून आणि माझ्यामते संपूर्ण जगच यावेळेस आपल्याला कधीच न भरुन येणाऱ्य़ा दुःखात सहभागी असतील याची मला कल्पना आहे." "या दुःखात माझ्या भावडांकडेही अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत हे माझ्यासाठी मोठं सांत्वनच आहे. याच प्रकारची आपुलकी आणि आधार दुःखात बुडालेल्या माझ्या सर्व कुटुंबाप्रतीही मिळावा."
 
राजे चार्ल्स तृतीय यांनी राष्ट्र आणि राष्ट्रकुल देशांना उद्देशून केलेलं पहिलं भाषण:
"मी आज तुमच्याशी अतीव दु:खाच्या भावनांसह बोलत आहे. माझी आई महाराणी एलिझाबेथ ही तिच्या संपूर्ण आयुष्यात माझ्यासाठी आणि माझ्या सर्व कुटुंबासाठी एक प्रेरणा होती. कोणतेही कुटुंब हे त्यांच्या आईच्या प्रेमासाठी, आपुलकीसाठी, मार्गदर्शनासाठी ज्याप्रकारे ऋणी असेल, तसेच आम्हीही महाराणीचे ऋणी आहोत.
 
"राणी एलिझाबेथ यांनी एक चांगलं जीवन व्यतीत केलं. तिच्या निधनानं मला खूप दुःख झालं आहे. पण, तिनं दिलेल्या आजीवन सेवेच्या वचनाचा मी आज तुम्हा सर्वांसमक्ष पुनरुच्चार करत आहे.
 
"माझ्या सर्व कुटुंबाला वाटत असलेल्या वैयक्तिक दु:खाबरोबरच, मी युनायटेड किंगडममधील तुमच्यापैकी बर्‍याच लोकांसोबत तसंच राणी प्रमुख असलेल्या राष्ट्रकुल आणि जगभरातील देशांसोबत कृतज्ञतेची तीव्र भावना व्यक्त करतो. 70 वर्षांहून अधिक काळ माझ्या आईने राणी म्हणून या अनेक राष्ट्रांतील लोकांची सेवा केली.
 
"आयुष्य लहान असो वा दीर्घ, ते लोकांच्या सेवेसाठी समर्पित करण्याचं वचनं माझ्या आईनं 1947 मध्ये तिच्या 21 व्या वाढदिवशी केपटाऊन ते कॉमनवेल्थपर्यंतच्या एका प्रसारणात दिलं होतं.
 
"ते एका वचनापेक्षा जास्त होतं. ती एक गहन वैयक्तिक वचनबद्धता होती जी तिचं संपूर्ण आयुष्य परिभाषित करते.
 
"तिनं कर्तव्यासाठी बलिदान दिले. सार्वभौम म्हणून तिचं समर्पण आणि बांधिलकी तिनं कधीही सोडली नाही. बदल आणि प्रगतीच्या काळात, आनंद आणि उत्सवाच्या काळात आणि दुःख आणि नुकसानाच्या वेळी कधीच तिनं ही भावना सोडली नाही.
 
"तिच्या सेवेच्या जीवनात आम्ही परंपरेचे अखंड प्रेम पाहिले. प्रगतीचे ते निर्भय आलिंगन जे आम्हाला राष्ट्र म्हणून महान बनवते ते पाहिले.
 
"तिनं प्रेरित केलेले स्नेह, कौतुक आणि आदर हे तिच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य बनले. माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य साक्ष देऊ शकतो की, तिनं दयाळूपणा आणि लोकांमध्ये नेहमीच सर्वोत्तम पाहण्याची अविचल क्षमता या गुणांना एकत्र जोडण्याचं काम केलं.
 
"मी माझ्या आईच्या स्मृतीला आदरांजली वाहतो आणि मी तिच्या सेवेचा आदर करतो. मला माहित आहे की तिच्या मृत्यूमुळे तुमच्यापैकी अनेकांना खूप दुःख झालं आहे आणि मी त्या नुकसानाची भावना तुम्हा सर्वांसोबत व्यक्त करतो.
 
"जेव्हा राणी राजगादीवर आली तेव्हा ब्रिटन आणि जग अजूनही दुसर्‍या महायुद्धानंतरच्या परिणामांचा सामना करत होतं आणि पूर्वीच्या काळातील नियमांनुसार जगत होतं.
 
"गेल्या 70 वर्षांमध्ये आपण पाहिलं आहे की आपला समाज अनेक संस्कृती आणि श्रद्धा यांच्यापासून तयार झाला आहे.
 
"राज्यातील संस्था आलटून पालटून बदलल्या आहेत. पण, सर्व बदल आणि आव्हानांपलीकडेही आपलं राष्ट्र आणि त्याच्या क्षेत्रांचं विस्तृत कुटुंब, त्यांच्या प्रतिभा, परंपरा आणि कर्तृत्वाचा मला अभिमान आहे. या सर्वांची समृद्धी आणि भरभराट झाली आहे. आमची मूल्ये कायम आहेत. आणि स्थिर राहिले पाहिजे.
 
"राजसत्तेची भूमिका आणि कर्तव्ये देखील तशीच राहतात. चर्च ऑफ इंग्लंड ज्या चर्चमध्ये माझा स्वतःचा विश्वास खूप खोलवर रुजलेला आहे त्या चर्चशी सार्वभौमचा विशिष्ट संबंध आणि जबाबदारी कायम आहे.
 
"त्या विश्वासात आणि त्यातून प्रेरणा देणारी मूल्ये, मला इतरांप्रती कर्तव्याची भावना जपण्यासाठी आणि आपल्या अनोख्या इतिहासातील मौल्यवान परंपरा, स्वातंत्र्य आणि जबाबदार्‍या तसंच आपल्या संसदीय शासन पद्धतीचा सर्वांत जास्त आदर करण्यासाठी वाढवलं गेलं आहे.
 
"स्वतः राणीनं जशी अविचल भक्ती केली, सेवा केली, तशीच मी सुद्धा आता देवानं मला दिलेल्या कालावधीत आपल्या राष्ट्राच्या केंद्रस्थानी असलेल्या घटनात्मक तत्त्वांचं पालन करण्याची शपथ घेतो.
 
"तुम्ही युनायटेड किंगडममध्ये कुठेही राहत असला किंवा जगभरात कुठेही राहत असाल, तुमची पार्श्वभूमी किंवा श्रद्धा काहीही असो, मी आयुष्यभर तुमची निष्ठा, आदर आणि प्रेमानं सेवा करण्याचा प्रयत्न करेन.
 
"मी माझ्या नवीन जबाबदाऱ्या हाती घेतल्यानं माझं जीवन नक्कीच बदलेल. ज्या धर्मादाय संस्था आणि समस्यांसाठी मी मनापासून काळजी घेतो त्यांना माझा इतका वेळ आणि ताकद देणं यापुढे मला यापुढे शक्य होणार नाही. पण या बाबी विश्वासार्ह लोकांच्या हाती जाईल, हे महत्त्वाचं काम मला चांगलंच ठाऊक आहे.
 
"माझ्या कुटुंबासाठीही हा बदलाचा काळ आहे. मी माझी प्रिय पत्नी कॅमिला हिच्या प्रेमळ मदतीवर विश्वास ठेवतो. सतरा वर्षांपूर्वी आमच्या लग्नानंतर तिनेही स्वत:च्या एकनिष्ठ सार्वजनिक सेवेची ओळख म्हणून करून दिली आहे. मला माहित आहे की ती आता तिच्या नवीन भूमिकेच्या कर्तव्याप्रती अविचल बांधिलकेनं काम करेल.
 
"माझा वारस म्हणून विल्यमनं आता स्कॉटिश पदवी स्वीकारली आहे. ज्याचा माझ्यासाठी खूप मोठा अर्थ आहे. तो माझ्यानंतर ड्यूक ऑफ कॉर्नवॉल म्हणून आला आणि डची ऑफ कॉर्नवॉलची जबाबदारी स्वीकारली. जी मी पाच दशकांहून अधिक काळ सांभाळत होतो.
 
"आज त्याला प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून जाहीर करताना मला आनंद होत आहे. हेही माझ्यासाठी विशेष आहे. कारण ही उपाधी माझ्या आयुष्यातील आणि कर्तव्याच्या काळात निभावण्याचा बहुमान मला मिळाला आहे.
 
"कॅथरीन सोबत आमचा नवीन प्रिन्स ऑफ वेल्स आणि वेल्सची राजकुमारी, आमच्या राष्ट्रीय तत्वांना प्रेरणा देत राहतील आणि नेतृत्व करत राहतील. तसंच वंचित लोकांना केंद्रस्थानी आणण्यास मदत करतील. इथून त्यांना महत्त्वपूर्ण मदत दिली जाऊ शकते.
 
"हॅरी आणि मेगन परदेशात त्यांचं आयुष्य उभं करत आहेत. त्यांच्यावरही माझं खूप प्रेम आहे.
 
"माझ्या लाडक्या आईला विश्रांती देण्यासाठी आठवडाभरातच आपण एक राष्ट्र म्हणून, राष्ट्रकुल म्हणून आणि खरंच एक जागतिक समुदाय म्हणून एकत्र येऊ. या दु:खात आपण तिच्या उदाहरणातून प्रेरणा आणि ताकद मिळवूया. माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीने, मी तुमच्या शोक आणि समर्थनासाठी तुम्हाला प्रामाणिक आणि मनापासून धन्यवाद देऊ शकतो.
 
"माझ्या प्रिय स्वर्गीय वडिलांकडे जाण्याचा शेवटचा महान प्रवास सुरू करत असताना मला माझ्या प्रिय आईला फक्त एवढंच सांगायचं आहे की, धन्यवाद. तू आमच्या कुटुंबावर केलेल्या प्रेमाप्रती तुझे आभार आणि इतकी वर्षं मेहनतीनं ज्या राष्ट्रांची तू सेवा केली, त्यासाठीही तुझे खूप खूप आभार.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची एक कोटी रुपयांची फसवणूक, सीईओ आदर पूनावाला यांच्या नावाने मेसेज पाठवला