गाझामधील चार नागरिक बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी बॉम्बस्फोटांच्या छायेतील त्यांचं जीवन रेकॉर्ड करत आहेत.
अन्न आणि पाण्याच्या शोधात दिवस-दिवस कशी पायपीट करावी लागत आहे, तसंच हवाई हल्ल्यांनी केलेल्या बॉम्बच्या वर्षावात सकाळपर्यंत जिवंत राहावं अशी प्रार्थना करत रात्रीचा कसा आश्रय शोधत आहेत, याचं वर्णन ते करत आहेत.
इस्रायलचं सैन्य गाझापट्टीवर 7 ऑक्टोबरपासून बॉम्बहल्ले करत आहे. त्यात 10 हजारांपेक्षा पॅलिस्टिनी नागरिकांनी प्राण गमावल्याचं हमासच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हे बॉम्बहल्ले केले जात आहेत. हमासच्या हल्ल्यात 1400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तर 242 जणांना हमासनं ओलीस ठेवलं.
या परिसरातील फोन नेटवर्क अस्थिर आहे तसंच कम्युनिकेशन ब्लॅकआऊटमुळं (संवादाची साधने पूर्णपणे बंद) संपर्क साधणं कठीण होत आहे. मात्र, आमच्या संपर्कातील लोक त्यांना शक्य तसे मेसेज आणि व्हीडिओ पाठवत आहेत.
शुक्रवार 13 ऑक्टोबर
उत्तर गाझा भागात इस्रालच्या विमानांतून काही पत्रकं टाकण्यात आली. त्यात नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी दक्षिणेकडे जाण्याचा इशारा इस्लायलच्या लष्करानं दिला होता.
फरिदा : 26 वर्षीय फरिदा गाझा शहरात राहणाऱ्या इंग्रजीच्या शिक्षिका आहेत. "आमच्या शेजाऱ्यांपैकी तिघांची घरं आता उद्ध्वस्त झाली आहेत. आम्ही सर्वांनी इथून जायला हवं, पण आमच्याकडे जाण्यासाठी दुसरी जागाच नाही. आम्ही फक्त वाट पाहत आहोत. आमचे काही मित्र बेपत्ता आहेत. माझ्या आई-वडिलांबद्दलही मला काही माहिती नाही," असं त्यांनी पाठवलेल्या पहिल्या संदेशात म्हटलं.
भावंडं आणि त्यांच्या सहा मुलांसह त्या दक्षिणेकडे पायी निघाल्या. ते जवळपास आठवडाभर चालत राहिले. त्यादरम्यान ते सगळे रस्त्यावर झोपत होते. वादी गाझाच्या बाहेर पडण्याचा त्यांचा उद्देश होता. कारण त्या भागात ते सुरक्षित राहू शकणार होते.
अॅडम : त्याच दिवशी खान युनूस या दक्षिणेतील शहरात अॅडम या तरुण कामगाराला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू होती. पाच दिवसांत पाचव्यांदा त्यांना दुसरीकडं नेलं जात होतं.
"उत्तर गाझामधून सुमारे 10 लाखांहून अधिक लोकांना दक्षिणेकडे आणि विशेषत: खान युनूसला जाण्यास सांगण्यात आलं होतं. पण त्याठिकाणीही हवाई हल्ले होत आहेत. माझ्या घराच्या अगदी जवळच एक हल्ला झाला," असं अॅडमनं सांगितलं.
इस्रायलनं गाझा पट्टीला पूर्णपणे वेढा घातल्यानंतर अन्न, औषधं आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं अॅडमला त्यांच्या वृद्ध वडिलांची काळजी घेणं कठिण जातंय. त्यांच्या वडिलांना पार्किन्सन आहे. त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड मिळणंही कठिण होऊन बसलं आहे. आदल्या दिवशी तर त्यांना हॉस्पिटच्या अंगणामध्ये जमिनीवर झोपून रात्र काढावी लागली.
खालिद : उत्तर गाझामधील जबालियामध्ये ते औषधी उपकरांच्या पुरवठ्याचं काम करतात. खालिद यांनी इशारा मिळाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबाला इतर ठिकाणी हलवण्यास नकार दिला.
"आम्ही कुठेही जाणार? कुठेही सुरक्षितता नाही. कोणत्याही परिस्थितीत आमचा अंत होणार आहे," असं ते व्हीडिओ मेसेजमध्ये म्हणाले. त्यावेळी मागे कुठेतरी बॉम्ब फुटत असल्याचा आवाज व्हीडिओत येत होता. खालिद त्यांच्या चुलत भावांच्या दोन मुलांनाही सांभाळत आहे. जवळच्या बाजारपेठेतील एका हल्ल्यातून ते बचावले आहेत.
"मोठ्या प्रमाणावर नागरिक जखमी असल्यानं औषधींची प्रचंड तुटवडा आहे. काही औषधं कमी तापमानात ठेवावी लागतात. पण वीजच नसल्यानं ती औषधं खराब झाली आहेत. या औषधांची तातडीनं गरज आहे," असंही ते म्हणाले.
युद्ध सुरू झाल्यापासून औषधांचा पुरवठा करणं शक्य होत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
सोमवार 16 ऑक्टोबर
नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी दोन मार्ग ठरवण्यात आले आहेत. त्यापैकी एक सालाह अल-दीन मार्गावर नागरिकांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर हलला झाला. त्यात 70 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुलं होती, असं पॅलिस्टिनी आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
इस्रायलच्या संरक्षण विभागानं यमागं त्यांचा हात नसल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत 2785 पॅलिस्टिनी मारले गेले आहेत.
दक्षिण भागात हल्ले होत असल्यानं बहुतांश पॅलिस्टिनींनी उत्तर भागातील घरांमध्येच राहायचं ठरवलंय. तर दक्षिणेत आश्रयासाठी गेलेल्यांनी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
फरिदा : अनेक दिवस रस्त्यांवरच झोपावं लागल्यानं फरिदा यांची वाईट अवस्था झाली आहे. "मला कसं वाटत आहे, किंवा काय घडतंय याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडं शब्द नाहीत. आमच्या आजुबाजुला प्रचंड बॉम्बहल्ले होत आहेत. सगळी लहान मुलं रडत आहेत. कुठं जायचं हेच आम्हाला माहिती नाही."
"गाझामध्ये प्रत्येक रात्री झोपताना तुम्ही उद्याची सकाळ पाहणार का? याची शाश्वती नसते. मी फक्त हिजाब परिधान करून माझ्या कुटुंबाबरोबर बसलेली असते. अचानक एखादा हवाई हल्ला झाला, तर त्यासाठी मला स्वतःला तयार ठेवायला हवं ना."
मंगळवार 17 ऑक्टोबर
गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयातील स्फोटात 471 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हॉस्पिटलच्या परिसरात आश्रय घेतलेल्या महिला आणि चिमुकल्यांचा समावेश होता. इस्रायलनं यात त्यांचा सहभाग नसून, हा स्फोट पॅलेस्टाईनच्या इस्लामिक जिहादनं चुकीच्या दिशेनं रॉकेट हल्ला केल्यानं झाल्याचा दावा केला.
अब्देलहकीम : युद्ध सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी अब्देलहकीम यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरींगची पदवी पूर्ण केली होती. ते मध्य गाझाच्या अल बुरैज छावणीत राहतात. त्यांचे काही मित्र रुग्णालयाच्या स्फोटावेळी तिथं होते, असं त्यांनी सांगितलं. त्यापैकी एक जखमी झाला तर एकाचा संपूर्ण कुटुंबासह मृत्यू झाला, असंही ते म्हणाले.
"मी 23 वर्षांचा असून सध्या जीवंत आहे. मी जिवंत असेपर्यंत माझी कहाणी समोर येईल का? हे माहिती नाही. कदाचित माझ्या डोक्यावर फिरणाऱ्या विमानांच्या हल्ल्यात मी मारला जाईल," असं त्यांनी व्हीडिओत म्हटलं. तो व्हीडिओ त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात तयार केला होता.
"आमच्याकडे पाणी, औषधी, वीज असं जीवनावश्यक काहीही नाही. मी ब्रेडच्या एका तुकड्याशिवाय तीन दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही. तो ब्रेडही मला भावडांबरोबर मिळून खावा लागला. गेल्या 12 दिवसांत मी आणि माझ्या कुटुंबाला 10 तासांपेक्षाही कमी झोप मिळाली आहे. त्यामुळं आम्ही आता थकलो आहोत. एवढी चिंता आहे की, आम्ही आरामही करू शकत नाही."
अब्देलहकीम आणि इतर स्वयंसेवक स्वतःच्या घरून देणग्या वाटप करत आहेत. "आम्ही मदतीसाठी पॅकेज आणि ब्लँकेट तयार करत आहोत. अगदी लहान मुलंही मदत करत आहेत. इजिप्तहून मदत साहित्याचे ट्रक येण्याची वाट पाहत बसण्याऐवजी आम्हीच पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे," असं ते म्हणाले.
शुक्रवार 20 ऑक्टोबर
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात अब्देलहकीम यांचं घर उध्वस्त झालं. त्यांनी पडक्या इमारतीचा व्हीडिओ पाठवला. कुटुंबांना ढिगाऱ्यातून बाहेर काढणं सुरू असताना, मागून नातेवाईकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत.
अब्देलहकीमः "आम्ही सगळे बसलो होतो आणि अचानक रॉकेट येऊन पडले. आम्ही सुदैवानं घराबाहेर आलो. आमचे शेजारी अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही सापडलं नाही. आम्ही जगत असलो तरी आमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण मृत्यूनं वेढलेला आहे."
"काहीतरी चमत्कार म्हणून मी आणि माझे कुटुंब जिवंत आहे. आम्हाला घराच्या काही भागाची दुरुस्ती करावी लागणार आहे. म्हणजे मग आम्हाला तिथं राहून मृत्यूची वाट पाहता येईल."
बुधवार 25 ऑक्टोबर
अब्देलहकीम यांच्या शेजाऱ्यांवर आणखी एक हवाई हल्ला झाला. आतापर्यंत 6972 पॅलिस्टिनी नागरिक मारले गेले आहेत.
अब्देलहकीम : यावेळी त्यांना फक्त रडक्या आवाजात एक व्हाईस मेसेज आणि काही टेक्स्ट मेसेज पाठवता आले. "मी मदतीसाठी काहीही करू शकत नाही. सगळीकडं लोकांच्या शरीराचे तुकडे पडलेले पाहून, माझ्या शरीरात प्राणच राहिलेला नाही. इथं कोणीही सुरक्षित नाहीत. आम्ही सर्व शहीद होण्याच्या मार्गावर आहोत," असं त्या मॅसेजमध्ये म्हटलं होतं.
मदतीसाठाचे ट्रक इजिप्तकडून राफाह क्रॉसिंग पॉइंटद्वारे गाझामध्ये सोडले जात आहेत. पण त्याद्वारे येणारी मदत कोणत्याही रुपानं गाझातील विस्थापितांसाठी पुरेशी नाही. कारण यूएनच्या अंदाजानुसार याठिकाणचे सुमारे 14 लाख लोक बेघर झाले आहेत.
अॅडम: त्यांच्या मनात सारखा कुटुंबासाठी अन्न मिळवण्याबाबतचा संघर्ष सुरू असतो. "मला मोठ्या रागांमध्ये उभं न राहता भोजन मिळवता यावं म्हणून पहाटे खूप लवकर उठावं लागतं. परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे."
"शाळेच्या अंगणात झोपलं की मनात मोठी खंत आणि आतून खचल्याची भावना निर्माण होते. हॉस्पिटलच्या अंगणात झोपलं तेव्हाही तसंच वाटतं. पण जेव्हा ब्रेडसाठी लांब रागांमध्ये उभं राहावं लागतं आणि पाण्यासाठी भीक मागवी लागते, तेव्हा पूर्णपणे खचून गेल्याची भावना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. "
खालिद : "ते सारखे बॉम्ब हल्ले करत आहेत, त्यामुळं ब्रेड आणण्यासाठीही बाहेर कसं जायचं हेच कळत नाही. अन्न ठेवण्यासाठी फ्रीज नाहीत. आम्ही खराब झालेलं अन्न खात आहोत. टोमॅटो सडले आहेत, फ्लॉवरमध्ये अळ्या झाल्या आहेत. आमच्याकडे ते खाण्याशिवाय पर्यायच नाही. कारण दुसरं काही उपलब्धच नाही. आमच्याकडे जे काही आहे, ते आम्हाला खावंच लागणार आहे."
फरिदा : आता कुटुंबीयांनी उत्तरेच्या भागात असलेल्या घरांमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. "दक्षिण भागात राहण्यासाठी आमची काहीही सोय नाही. तसंच अगदी मुलभूत गरजेच्या गोष्टीही नाहीत. आम्ही ज्याठिकाणी होतो, तिथं प्रचंड बॉम्ब पडत होते. त्यामुळं किमान स्वाभिमान तरी टिकून राहावा, म्हणून आम्ही परतलो आहोत," असं त्या म्हणाल्या.
"दिवसातून फक्त पाच मिनिटांसाठी का होईना पण आम्हाला मित्रांना भेटण्यासाठी, बसण्यासाठी जागा आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे."
ते परतल्यानंतर काही वेळातच त्या मार्गावर बॉम्बहल्ला झाला. त्यांच्या घराच्या काही भागाचंही नुकसान झालं.
शुक्रवार 27 ऑक्टोबर
गाझामध्ये फोन आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळं सुमारे 48 तासांसाठी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्याचं कारण म्हणजे, इस्रायलनं जमिनीवर मोहीम सुरू केली आहे. आम्हाला अॅडम, अब्देलहकीम, फरिदा आणि खालिद यांच्याशी संपर्क करणं अशक्य होत आहे. जेव्हा संपर्काची साधनं सुरू होतील तेव्हा या अंधकारातील काळाचं वर्णन ते करतील.
अब्देलहकीम: "काल रात्री प्रचंड बॉम्ब हल्ले झाले. संपर्क साधण्यासाठी काहीही व्यवस्था नव्हती. रुग्णांच्या मदतीसाठी अॅम्ब्युलन्सही येऊ शकत नव्हती. त्यामुळं या बॉम्बहल्यात जो सापडला, त्यांचा जागीच मृत्यू झाला."
अॅडम : "ईश्वराच्या कृपेनं मी ठिक आहे. पण संपर्क तुटलेला होता, त्यादरम्यान माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ. मला माझ्या जवळच्या लोकांना सांगता येणं किंवा माझ्यासोबत बोलवणंही शक्य नव्हतं."
फरिदा : "माझ्या मित्राचा मृत्यू झाला आणि माझं घरंही उद्ध्वस्त झालं. माझा भाऊ जखमी झाला. माझं मन मला खात आहे. आम्ही ठिक नाही आहोत, खच्चीकरण झालं आहे," असं सांगताना त्यांना अश्रू अनावर होत होते.
खालिद : "दिवस अगदी सामान्य होता. पण जेव्हा इंटरनेट सुरू झालं तेव्हा आम्हाला बातम्या समजू लागल्या. पूर्ण घरं, कॉलनी उद्ध्वस्त झाल्या होत्या. अनेकांची पूर्ण कुटुंब मारली गेली. परिस्थिती अत्यंत दुःखद आहे. त्यांनी आमचा जगापासून संपर्क तोडला आणि नंतर नरसंहार सुरू झाला."
सोमवार 30 ऑक्टोबर
इस्रायलचे रणगाडे गाझा शहरात आले, लोकांना उत्तर भागातून दक्षिण भागात नेण्याच्या सालाह अल-दीन या मुख्य मार्गावर ते दिसत आहेत.
खालिद : "आम्ही जाणार नाही. आम्ही आता असा विचार करतोय की, कधी एकदाचा पुढचा बॉम्ब पडेल आणि मृत्यू होऊन आम्ही यातून मुक्त होऊ?"
आम्ही खालिदकडून ऐकलेले हे अखेरचे शब्द होते. इस्रायलनं 31 ऑक्टोबरला जबालियावर हवाई हल्ला केल्यानंतर आमचा त्यांच्याशी संपर्क तुटला. खालिद तिथंच राहत होते.
पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या हल्ल्यात किमान 101 जणांचा मृत्यू झाला. तर 382 जण जखमी झाले होते.
इस्रायलनं ते सामान्य नागरिकांना नव्हे तर हमासच्या एका कमांडरला लक्ष्य करत होते, असं स्पष्टीकरण दिलं.
इस्रायल, अमेरिका, युके, युरोपियन महासंघ आणि इतरांना दहशतवादी ग्रुप ठरवलेल्या संघटनेनं त्यांचे सदस्य सामान्य नागरिकांमध्ये लपवले असल्याचा आरोपही इस्रायलनं केला.
फरिदा : "माझी काही स्वप्नं आहेत. माझे एक उत्तम कुटुंब आणि खास मित्र आहेत. माझं उत्तम जीवन आहे. मी विचार करत असते की, जेव्हा आपण मरू तेव्हा काय होत आहे, हे कोणालाही कळू शकणार नाही. त्यामुळं मी सांगत आहे, ते सर्व काही लिहा. मला माझी कहाणी जगासमोर आणायची आहे, कारण मी फक्त एक आकडा नाही."
अॅडम : "तुम्ही ही संपूर्ण कहाणी सर्वांना सांगावी अशी माझी इच्छा आहे. हे वाचल्यानंतर असं सर्व घडू दिलं गेलं, यासाठी संपूर्ण जगाला लाज वाटावी, यासाठीच या सर्वाची कागदोपत्री नोंद केली आहे. "
गाझामध्ये नरसंहार रोखण्यासाठीचा वेळ हातून निघून जात आहे, असा इशारा यून मधील तज्ज्ञांनीही दिला आहे.
या युद्धाच्या पहिल्या चार आठवड्यांमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक पॅलिस्टिनींचा मृत्यू झाला. त्यातील बहुतांश सामान्य नागरिक होते. तर 4000 हून अधिक लहान मुलं होती.
*गाझामधील मृतांचा आकडा हमासद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेला आहे.
अतिरिक्त वार्तांकन-हया अल बदरनेह आणि मेरी ओरेली
Published By- Priya Dixit