Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चीनमध्ये प्राथमिक शाळेमधून कोव्हिडच्या संसर्गाचा नवा उद्रेक

चीनमध्ये प्राथमिक शाळेमधून कोव्हिडच्या संसर्गाचा नवा उद्रेक
, गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (15:55 IST)
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये नव्यानं वाढ पाहायला मिळत आहे. या नव्या प्रकरणांचा संबंध फुजियान प्रांतातील प्राथमिक शाळेशी असल्याचं समोर आलं आहे.
 
एका विद्यार्थ्याच्या वडिलांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळं कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
 
याठिकाणी चार दिवसांत कोरोनाची जवळपास 100 हून अधिक नवी प्रकरणं आढळली आहेत. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची आठवडाभरात चाचणी करण्याचे निर्देश फुजियानमधील प्रशासनानं दिलेले आहेत.
 
महिनाभरापूर्वी चीनमध्ये नान्जिंग प्रांतात वुहाननंतरचा कोरोनाचा सर्वांत मोठा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता फुजियानमध्ये ही लाट आली आहे.
 
फुजियान प्रांतातील पुतियान हे जवळपास 30 लाख लोकसंख्येचं शहर आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या ठिकाणांपैकी हे एक आहे.
 
याठिकाणी आढळलेल्या सुरुवातीच्या प्रकरणाचा संबंधही प्राथमिक शाळेबरोबरच होता.
 
एका विद्यार्थ्याचे वडील 4 ऑगस्ट रोजी सिंगापूरहून चीनला परतले होते. त्यानंतर 38 दिवसांनी म्हणजे 10 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांच्यामार्फतच कोरोनाचा संसर्ग पसरला असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
या मुलाचे वडील 21 दिवस विलगीकरणात होते. या दरम्यान त्यांनी नऊ वेळा कोव्हिडची चाचणी केली. पण त्या सर्व चाचण्यांमध्ये ते निगेटिव्ह असल्याचं समोर आलं होतं, असं ग्लोबल टाइम्सया या सरकारी वृत्तपत्रानं म्हटलंय.
 
या विद्यार्थ्याच्या वडिलांमुळेच हा संसर्ग पसरला आहे का? हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण विलगीकरण आणि एवढ्या कालावधीनंतर असं होणं हे दुर्मिळ आहे.
 
दरम्यान, हा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीनं पावलं उचलली आहेत.
 
शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसंच पुतियानमधून बाहेर जाणाऱ्यांना 48 तासांच्या आत केलेल्या कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे.
 
सिनेमागृह, संग्रहालयं आणि ग्रंथालयं याठिकाणी अंतर्गत भागात म्हणजे इनडोअर कामं बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर रेस्तराँना मर्यादीत कालावधीसाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 
झियामेन आणि क्वांझहाऊ या जवळच्या शहरांनादेखील याचा फटका बसला आहे. झियामेन शहरात जिम आणि बार बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
सोमवारी झियामेनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची 32 प्रकरणं समोर आली. यापैकी बहुतांश प्रकरणांचा संबंध पुतियानशी आहे. ग्लोबल टाईम्समधील वृत्तानुसार, याठिकाणी आढळलेली प्रकरणं ही डेल्टा व्हेरिएंटची आहेत.
 
चीनमध्ये नॅशनल डेच्या निमित्तानं 1 ऑक्टोबरपासून एक आठवड्याच्या सुट्यांना सुरुवात होत आहे. या आठवड्याला गोल्डन वीक असंही म्हटलं जातं. या दरम्यान चीमध्ये लाखो प्रवासी प्रवास करत असतात. या सुट्यांच्या तोंडावर कोरोनाची ही नवी प्रकरणं आढळली आहेत.
 
तसंच चीनमध्ये मिड ऑटम फेस्टिव्हल निमित्तही तीन दिवसांच्या सुट्या असतात. रविवारपासून तीन दिवसांच्या या सुट्यांना सुरुवात होत आहे.
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाक PM इमरान खानसोबत Shah Rukh Khan चा फोटो बघून भडकले नेटकरी, Boycott ची मागणी