चीनमधील हेबेई प्रांतातील सान्हे शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये बुधवारी झालेल्या भीषण स्फोटात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका जोरदार होता की जवळपासच्या अनेक गाड्या आणि इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे
चिनी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगपासून 80 किमी अंतरावर असलेल्या सान्हे शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजता ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या गळतीनंतर हा स्फोट झाला.
चीनच्या मदत आणि बचाव विभागाने सांगितले की, लोकांना वाचवण्यासाठी 36 वाहने आणि 154 बचाव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. बीजिंगमध्ये काही उच्चस्तरीय बैठकीनंतरच या स्फोटाची बातमी आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये स्फोटानंतर रेस्टॉरंटमधून धूर निघताना दिसत आहे. याशिवाय अनेक वाहनांच्या तुटलेल्या काचा आणि जवळपासच्या इमारतीचा काही भाग पडला आहे.