Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

श्रीकृष्ण जीवनाचा नेमका अर्थ

श्रीकृष्ण जीवनाचा नेमका अर्थ
अयोध्येचा राजा श्रीराम व द्वारकापती श्रीकृष्णाने भारतीयांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे. राम-कृष्ण नावात भारतीय संस्कृती सामावून गेली आहे. येथे राम-कृष्णाच्या चरित्रास वेगळ्या दृष्टीकोनातून पहाण्याचा प्रयत्न आहे. गोकुळात प्रेम व स्नेहाचे वातावरण प्रस्थापित करणारा, जरासंध व शिशुपालाचा नाश करणारा, द्रौपदीची विटंबना होत असतांना रक्षणासाठी धावून येणारा किवा प्रेमाने अर्जुनाचे घोडे हाकणार्‍या कृष्णाचे वर्णन येथे येणार नाही. कृष्णाकडे येथे व्यक्ती म्हणून नाही तर प्रतीक म्हणून पाहण्याचा प्रयत्न आहे. 
 
गोकुळात श्रीकृष्ण- 
गोकुळाचा अर्थ व्यापक आहे. गो म्हणजे इंद्रिये. हिरवे गवत बघून गाय जशी धाव घेते त्याचप्रमाणे इंद्रिय विषयांमागे धावत असतात. आपले जीवनही गोकुळच आहे. कुल म्हणजे समुदाय. इंद्रियांचा समूह म्हणजेच गोकुळ. याप्रमाणे आपणा प्रत्येकाकडे गोकुळ आहे. मात्र, या गोकुळात आनंद नव्हता. सुख-शांती नव्हती, संगीत नव्हते, सुव्यवस्था नव्हती, गीत-नृत्य नव्हते. जीवनरूपी गोकुळातील सुर हरवले होते. आकर्षण इंद्रियांना आपल्याकडे खेचत असते. याप्रमाणेच मनाच्याही विविध प्रवृत्ती आहेत. त्यामध्ये एकवाक्यता नसते. गोकुळात द्वेषाग्नी धगधगत असतो. अंतकरणाच्या यमुनेत अहंकाराचा कालिया नाग घर करून बसत असतो. अघासुर, बकासूर या गोकुळात येण्यासाठी तत्पर असतात. आपल्या ह्रदयात नेहमी हलकल्लोळ माजलेला असतो. त्यामुळे रात्रंदिवस ह्रदयमंथन सुरू असते. समुद्र मंथनाची कथा आपण ऐकलीच असेल. समुद्र मंथन म्हणजे हृदयरूपी समुद्राचे मंथन. वासना व विकाराच्या लहरी या समुद्रात नेहमी आदळत असतात. या मंथनातून अनेकविध वस्तू बाहेर येत असतात. कधी लक्ष्मी बाहेर येऊन धनलाभ देते, कधी अप्सरा मोहित करतात, कधी मद्याचे घडे समोर येतात. कधी प्रेमाचा चंद्र उगवतो तर कधी द्वेष-हलाहल उत्पन्न होते. अमृतप्राप्तीपर्यंत म्हणजे खरे समाधान-शांतता लाभेपर्यंत हे मंथन सुरूच राहणार. 
 
आपल्या ह्रदयात सतत अशांततेची ज्वाला धगधगत असते. द्वेष व मत्सराने तुडूंब भरलेल्या गोकुळात श्रीकृष्ण जन्म घेत असतो. कृष्णाने नंद-यशोदाच्या पोटी जन्म घेतला. नंदाचा अर्थ आहे आनंद. यशोदेचा अर्थ आहे यश देणारी सतवृत्ती. आनंदासाठी व्याकुळ असलेला जीवात्मा व जीवात्म्यास सहायता करणारी सत्प्रवृत्ती यातूनच श्रीकृष्ण जन्म घेत असतो. राम-श्रीकृष्णाच्या जन्माचा शोध घेतल्यास आपणांस खरा अर्थबोध झाल्याशिवाय राहणार नाही. रामचंद्राचा जन्म भर दुपारी झाला. पाय जळतील एवढे तापले होते. शोधून सावली सापडत नव्हती. विश्रांती घेण्यासाठीही कोठे जागा नव्हती. आत्मा व्याकुळ होतो, ह्रदय दु:खाने पिळवटून निघते, त्यावेळेसच रामचंद्र जन्म घेत असतात. 
 
श्रीकृष्णाने कधी जन्म घेतला? रामांचा जन्म भरदुपारी झाला तर श्रीकृष्णाचा मध्यरात्री. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात, यमुना दुधडी भरून वाहत असताना श्रीकृष्ण जन्म झाला. जीवनात कृष्णपक्षाचा अंधार दाटला असताना, निराशेचे डोह भरले असताना, डोळ्यांमधून आसवांच्या धारा वाहत असताना, सर्व मार्ग खुंटले असताना, हृदयाची यमुना दुथडी भरून वाहू लागते. यावेळी श्रीकृष्ण जन्म घेतो. श्रीकृष्णाने आपल्या सैरभैर जीवनास स्थिर केले. कवी रवींद्र यांनी लिहिल्याप्रमाणे 'संपूर्ण दिवस सतारीत तार घालण्यात गेला. मात्र, अजूनपर्यंत तार लागली नाही. त्यामुळे संगीताचे सूर उमटलेच नाहीत. 'आम्हा सर्वांची हीच स्थिती आहे. जीवनाच्या सतारीचे तार अजूनही जुळलेले नाहीत. जीवनाची सतार सात तारांची नसून हजारो तारांची आहे. या असंख्य तारांमधून केव्हा मधूर झंकार उमटेल? 
 
प्रत्येक प्रवृत्ती सुंदर स्वरूप धारण करून जीवात्म्यास मोहीत करण्याचा प्रयत्न करत असते. श्रीकृष्ण गोपींच्या बाह्य स्वरूपाने प्रभावित न होता गोपींना त्यांने खरे स्वरूप दाखवून देतो. यावेळी दृष्टी प्रवृत्ती लज्जित होऊन श्रीकृष्णास म्हणते, हे श्रीकृष्णा ! तू म्हणशील तसेच करणार, तुझ्या आदेशाप्रमाणेच चालणार, बोलणार, व्यवहार करणार. तुम्ही आमचे स्वामी आहात.' सर्व इंद्रिये व प्रवृत्तींना महान ध्येयप्राप्तीसाठी प्रेरीत करून जीवनात स्थिरत्व प्राप्त करणेच जीवनातील मुख्‍य कर्म असते. भ्रमर कमळाकडे जाणार, पतंग प्रकाशाकडे झेपावणार. तद्वतच आपल्या प्रवृत्ती, शक्तींना एखाद्या ध्येयाप्रती वाहून घेणे आवश्यक असते. श्रीकृष्ण हे काम करतो. तो सर्व प्रवृत्तींना एकत्रित करून ध्येयप्राप्तीचा मार्ग दाखवतो. यामुळे अशांतता संपुष्टात येते. मनाच्या गाभार्‍यात एकच स्वर उमटतो. कृष्ण. कृष्ण. कृष्ण.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनभावन हा श्रावण!