Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

६६ वर्षांची आजी आणि ७९ वर्षांच्या आजोबांचे धुमधडाक्यात लग्न

६६ वर्षांची आजी आणि ७९ वर्षांच्या आजोबांचे धुमधडाक्यात लग्न
, बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (16:10 IST)
सांगली- आयुष्याभर संसार करण्यात वेळ आणि वय निघून जातं आणि खरी साथाची गरज भासते ती म्हणजे जीवनाच्या शेवटल्या टप्प्यावर. पण कित्येकदा या सुखाच्या क्षणांमध्ये दोघांमधील एक साथ सोडून जगाला निरोप देतं आणि मागे राहिलेल्या साथीदाराला एकाकी जगणं ओझं वाटू लागतं. अशात नवा साथीदार मिळाला तर उरलेलं आयुष्य कसं सुखाचं आणि आनंदचं होऊ शकत याच विचाराने एक आगळावेगळा विवाह संपन्न झाला. ज्यात नवरदेवाचं वय ७९ वर्षे तर वधूचं वय ६५ वर्षे आहे.
 
मिरजेतील आस्था बेघर महिला केंद्रात हा विवाह सोहळा संपन्न झाला. मिरजेतील आस्था बेघर केंद्रात मुलींसह काही वृद्ध आश्रय घेतात. येथे यापूर्वी अनेक मुलींचे विवाह झाले परंतु मंगळवारी झालेला विवाह सोहळा मात्र काही वेगळाच रंग घेतलेला होता. 
 
बेघर केंद्रात आश्रयाला असलेल्या पुण्याच्या शालन पतीचे आणि मुलाचे अकाली निधन झाल्यामुळे संघर्ष करत होत्या. कुणावर भार नको म्हणून त्यांनी मिरजेतील आस्था बेघर केंद्राचा आधार घेतला. कवठे एकंद येथील ७९ वर्षीय निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे यांची मुलं बाहेरगावी असून पत्नीच्या निधनानंतर एकाकी जगण्याचा त्यांना कंटाळा आला. भावनिक आधाराची गरज असल्याने त्यांनी मुलांच्या सहमतीने पुन्हा बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. त्यांचा वधूशोध आस्था बेघर केंद्रातील शालन यांच्याजवळ येऊन थांबला.
 
आस्था बेघर केंद्राने शालन आणि दादासाहेब या दोघांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला आणि लग्नाचे सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले. समाज सुधारक सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून आणि वृक्षाला पाणी घालून, फुलांच्या अक्षदा टाकण्यात आल्या. वयाचे बंधन झुगारून पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
या सोहळ्यासाठी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी शुभ संदेश पाठवून आशीर्वाद दिला. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे, केंद्र संचालिका सुरेखा शेख, वंदना सवाखंडे, अश्विनी नागरगोजे, रूपाली काळे, आदी उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश