देशाला १९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले. १९७७ला आणीबाणीत दुसरे स्वातंत्र्य मिळाले. आता, २०१९ साली तिसरे स्वातंत्र्य देशाला मिळायला हवे. गुजरात सोडून बाकीच्या राज्यांचा नरेंद्र मोदी दुस्वास करतात. लोकांची सतत फसवणूक करणारे हे सरकार आता घालवायलाच हवे. २०१९ साली ‘मोदीमुक्त’ भारत करण्याची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. देशाला झालेला हा आजार घालवायलाच हवा. त्यासाठी मोदींविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही राज यांनी केले.
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवरील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी लोकांची निव्वळ फसवणूक करत आहेत. देशाला दिलेले एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. न्यायसंस्थेपासून माध्यमांपर्यंत सर्वांची मुस्कटदाबी केली जात आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना संपविण्यात येत आहे. देशात एक प्रकारची अघोषित आणीबाणीच लादली आहे. २०१४ पूर्वी मोदींनी ‘काँग्रेसमुक्त’ भारताचे आवाहन केले होते. महाराष्ट्र आणि देश वाचवायचा असेल, तर आता ‘मोदीमुक्त’ भारतासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही राज यांनी केले.