Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक्झिट पोल्स कसे केले जातात? गेल्या निवडणुकांतील एक्झिट पोलचे अंदाज किती बरोबर होते?

Webdunia
शुक्रवार, 31 मे 2024 (17:54 IST)
1 जूनला देशातलं सातव्या टप्प्याचं मतदान झालं की 2024च्या निवडणुकीमधली मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर लक्ष असेल ते 4 जूनला होणारी मतमोजणी आणि निकालाकडे.पण 1 जूनला मतदान झाल्यानंतर सगळ्या एजन्सीज आणि न्यूज चॅनल्स एक्झिट पोल प्रसिद्ध करतील.
 
2024 च्या लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल्स काय आहेत, हे एक जूनला समजेल. पण त्याआधी या एक्झिट पोल्सबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ. सोबतच 2019ची लोकसभा निवडणूक आणि 2023च्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल्स आणि प्रत्यक्ष निकाल काय होते हे देखील पाहू.
 
एक्झिट पोलबद्दल समजून घेण्यासाठी बीबीसीने प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज (CSDS) चे सहसंचालक प्राध्यापक संजय कुमार यांच्याशी चर्चा केली.
 
एक्झिट पोल म्हणजे काय आणि ते कसे करतात?
एक्झिट म्हणजे बाहेर पडणं. हा शब्दच या चाचण्या म्हणजे Polls बद्दल खूप काही सांगतो.
 
जेव्हा मतदार निवडणुकीसाठी मत देऊन केंद्रामधून बाहेर पडत असतो, तेव्हा त्यांना विचारलं जातं - तुम्ही कोणत्या पक्षाला वा उमेदवाराला मत दिलं, हे सांगाल का?
 
एक्झिट पोल्स करणाऱ्या संस्था त्यांच्या लोकांना मतदान केंद्राच्या बाहेर उभं करतात. जसजसे मतदार मतदान करून बाहेर येतात, त्यांना विचारलं जातं की त्यांनी कुणाला मत दिलं. इतरही काही प्रश्न त्यांना विचारले जातात. उदा. पंतप्रधान पदासाठी तुमचा आवडता उमेदवार कोण वगैरे.
 
सहसा प्रत्येक मतदान केंद्रावरील दर दहावा मतदार किंवा मग मतदान केंद्र मोठं असेल तर मग दर विसाव्या मतदाराला असे प्रश्न विचारले जातात. मतदारांकडून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून या निवडणुकीचे निकाल काय असतील याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जातो.
भारतात कोणत्या संस्था एक्झिट पोल्स करतात?
सी व्होटर, अॅक्सिस माय इंडिया, CNX भारत या एक्झिट पोल्स करणाऱ्या काही प्रमुख संस्था आहेत. निवडणुकीच्यावेळी अनेक नवीन कंपन्याही येतात ज्या निवडणूक झाल्यानंतर मात्र गायब होतात.
 
एक्झिट पोलविषयी नियम - कायदे काय आहेत?
 
एक्झिट पोल्सना रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्ट 1951चा सेक्शन 126A लागू होतो.
 
भारतीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोल्ससाठी काही नियम आखले आहेत. निवडणुकीवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम वा प्रभाव पडू नये, यासाठी हे नियम असतात.
 
निवडणूक आयोग वेळोवेळी एक्झिट पोल्ससाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करतो. यामध्ये एक्झिट पोल कसे करावेत हे सांगितलं जातं. मतदानाच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करू नयेत, असा नियम आहे.
 
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपल्याच्या अर्धा तास नंतर पर्यंत एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करता येत नाहीत. यासोबतच मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करण्यासाठी ही पाहणी करणाऱ्या संस्थेला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
 
एक्झिट पोलचे अंदाज सहसा बरोबर असतात का?
प्राध्यापक संजय कुमार याची तुलना हवामान विभागाच्या अंदाजांशी करतात.
 
ते म्हणतात, "एक्झिट पोलचे अंदाज हे देखील हवामान विभागाच्या अंदाजांसारखे असतात. काही वेळा ते अगदी अचूक असतात, काही वेळा आसपास असतात आणि काही वेळा ते बरोबर नसतात. एक्झिट पोलने दोन गोष्टींचा अंदाज बांधला जातो. मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज बांधला जातो आणि त्या आधारे पक्षांना मिळणाऱ्या जागांचा अंदाज बांधला जातो."
 
संजय कुमार सांगतात, "2004ची निवडणूक विसरून चालणार नाही. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार पुन्हा येईल असं सगळ्या एक्झिट पोल्सनी म्हटलं होतं. पण एक्झिट पोल्सचे अंदाज चुकीचे ठरले आणि भाजप निवडणूक हरली."
 
अनेकदा वेगवेगळे एक्झिट पोल्स वेगवेगळा अंदाज व्यक्त करतात, असं का?
याचं उत्तर देताना प्रा. संजय कुमार एक उदाहरण देत सांगतात, "अनेकदा एकाच आजारासाठी वेगवेगळे डॉक्टर्स वेगवेगळ्या प्रकारे तपासण्या करतात. एक्झिट पोलबाबतही हे होऊ शकतं. वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळं सँपल घेतलं (चाचणी गट निवडला) किंवा वेगळ्या प्रकारे फील्डवर्क केल्याने असं होऊ शकतं. काही एजन्सीज फोनवरून डेटा गोळा करतात तर काही एजन्सीज त्यांच्या कर्मचाऱ्यांना फील्डवर पाठवतात. यामुळे निकाल वेगवेगळे असू शकतात."
 
भारतात एक्झिट पोल पहिल्यांदा कधी झाला होता?
1957च्या दुसऱ्या सार्वजनिक निवडणुकांदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने भारतात पहिल्यांदा निवडणूक चाचणी केली होती.
 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनचे प्रमुख एरिक डी कॉस्टा यांनी निवडणूक सर्वेक्षण केलं होतं, पण याला पूर्णपणे एक्झिट पोल म्हणता येणार नाही.
 
त्यानंतर 1980मध्ये डॉक्टर प्रणय रॉय यांनी पहिल्यांदा एक्झिट पोल केला. त्यांनीच पुन्हा 1984मध्ये एक्झिट पोल केला होता.
 
दूरदर्शनने 1996मध्ये एक्झिट पोल केला. पत्रकार नलिनी सिंह यांनी हे सर्वेक्षण केलं होतं, पण यासाठीची आकडेवारी गोळा करण्यासाठी सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज (CSDS) ने फील्ड वर्क केलं होतं.
 
त्यानंतर एक्झिट पोल्सचं हे सत्र सुरूच आहे. फक्त त्याकाळी एखाद-दोन एक्झिट पोल असत, आता डझनभर एक्झिट पोल्स होतात.
 
जगातल्या इतर देशांत एक्झिट पोल्स होतात का?
भारताच्या आधीपासून अनेक देशांमध्ये एक्झिट पोल्स होत आले आहेत. अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियासह जगभरातल्या अनेक देशांत एक्झिट पोल होतात.
 
अमेरिकेत 1936मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक्झिट पोल करण्यात आला. जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी न्यूयॉर्क शहरात एक निवडणूक पाहणी केली. राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोणत्या मतदाराला मत दिलं हे यामध्ये मतदान करून बाहेर येणाऱ्या व्यक्तींना विचारण्यात आलं. फ्रँकलिन रुझवेल्ट ही निवडणूक जिंकतील, असा अंदाज या आकडेवारीवरून व्यक्त करण्यात आला.
 
प्रत्यक्षात ही निवडणूक रुझवेल्ट यांनीच जिंकली. यानंतर एक्झिट पोल इतर देशांतही लोकप्रिय झाले. ब्रिटनमध्ये 1937साली पहिल्यांदा एक्झिट पोल झाला. फ्रान्समध्ये 1938 मध्ये पहिल्यांदा एक्झिट पोल घेण्यात आला.
 
आता भारतातल्या एक्झिट पोल्सच्या निकालांविषयी जाणून घेऊ. सगळ्यात आधी 2019ची लोकसभा निवडणूक.
 
लोकसभा निवडणूक, 2019
भाजप आणि NDAला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बहुतांश एक्झिट पोल्सनी जाहीर केला होता. तर काँग्रेसच्या नेतृत्त्वातील UPA आघाडीला 100च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
 
प्रत्यक्षातले निकाल हे व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजांसारखेच होते. भाजपला 303 जागा मिळाल्या आणि NDA ला सुमारे 350 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या होत्या.
 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021
2021साली केरळ, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. पण सगळ्यांचं लक्ष होतं पश्चिम बंगालवर.
 
292 जागांच्या या विधानसभेत भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळतील, असं बहुतेक एजन्सीजने म्हटलं होतं. 'जन की बात' नावाच्या एका एजन्सीने तर भाजपला 174 पर्यंत जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.
काहींनी तृणमूल काँग्रेसला जास्त जागा मिळतील, असं म्हटलं होतं, तर काहींनी भाजप पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल असं म्हटलं होतं.
 
पण निकाल जाहीर झाले तेव्हा ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत आली. भाजपला 2016मध्ये तीन जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत चांगली कामगिरी करत त्यांचा आकडा 75 पर्यंत पोहोचला, पण हा आकडा सत्ता स्थापनेसाठी पुरेसा नव्हता.
 
गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणूक 2022
2022च्या नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. गुजरातसाठीच्या एक्झिट पोल्समध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचं सांगण्यात आलं. 182 जागांच्या विधानसभेत भाजपला 117-148 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
 
काँग्रेसला 30 ते 50 जागी विजय मिळेल असा अंदाज सगळ्याच एक्झिट पोल्सने व्यक्त केला होता. पण निकाल जाहीर झाले तेव्हा भाजपने राज्यात आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी करत 156 जागा मिळवल्या. तर काँग्रेसने सर्वात खराब कामगिरी करत फक्त 17 जागा जिंकल्या.
 
हिमाचल प्रदेशमध्ये बहुतेक एक्झिट पोल्सनी भाजपला आघाडी दिली होती. इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडियाने काँग्रेसला आघाडी दाखवली होती. पण निकाल लागला तेव्हा 68 जागा असणाऱ्या या विधानसभेत काँग्रेसने 40 जागा जिंकत सरकार स्थापन केलं, तर भाजपला फक्त 25 ठिकाणी विजय मिळू शकला.
 
कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023
 
कर्नाटकमध्ये 2023च्या एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या राज्यात काँग्रेसची कामगिरी भाजपपेक्षा चांगली असेल, असं एखाद संस्था वगळता बहुतेक संस्थांनी म्हटलं होतं. निकालही थोड्याफार फरकाने तसेच लागले. फरक इतकाच होता की काँग्रेसची कामगिरी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजांपेक्षा चांगली होती. एकूण 224 जागांपैकी काँग्रेसने 43% मतं मिळवत 136 ठिकाणी विजय मिळवला.
 
हा गेल्या तीन दशकांतला या राज्यातला काँग्रेसचा सर्वात मोठा विजय होता. भाजपला फक्त 65 जागा मिळाल्या तर जनता दल सेक्युलरला 19 जागा जिंकता आल्या.
 
नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये निवडणुका झाल्या.
 
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढत होईल असं सगळ्याच एजन्सीजने म्हटलं होतं, किंवा मग काँग्रेसला आघाडी दाखवली होती. एकूण 90 जागांपैकी काँग्रेसला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज होता. भाजपला 25 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज होता.
 
निकाल जाहीर झाले तेव्हा भाजपला 54 जागी विजय मिळाला आणि त्यांनी सरकार स्थापन केलं, तर काँग्रेसला फक्त 35 जागा मिळाल्या.
 
मध्य प्रदेश विधानसभेत 230 मतदारसंघ आहेत. इथे भाजपला 88 ते 163 जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोल्सनी व्यक्त केला. तर काँग्रेसला किमान 62 तर जास्तीत जास्त 137 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
 
प्रत्यक्षात भाजपने 163 जागा मिळवल्या तर काँग्रेसला 66 जागी यश मिळालं.
 
राजस्थान
राजस्थानात भाजपचं पारडं जड असल्याचं ABP न्यूज - सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं होतं. भाजपला इथे किमान 77 आणि जास्तीत जास्त 128 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर सत्ताधारी काँग्रेसला किमान 56 आणि जास्तीत जास्त 113 जागा मिळतील, असा अंदाज होता.
 
पण निकाल लागला तेव्हा भाजपला 115 तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. इतर लहान-मोठे पक्ष आणि अपक्षांना मिळून 15 जागी विजय मिळवता आला होता.
 
तेलंगणा
तेलंगणातल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर असेल असं जवळपास सगळ्या एजन्सीजने म्हटलं होतं. काँग्रेसला किमान 49 तर जास्तीत जास्त 80 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सत्ताधारी BRS पुन्हा सत्तेत येणार नाही, असं जवळपास सगळ्यांनी म्हटलं होतं. निकालांमध्ये काँग्रेसला 64 तर BRSला 39 जागा मिळाल्या.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपचा आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments