Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आदिशक्ती माता एकविरा देवी मंदिर

ekvira devi dhule
, बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (17:14 IST)
सुर्यकन्‍या तापी नदीची उपनदी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पांझरा नदीच्‍या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचे अतिप्राचीन मंदीर आहे. धुळे शहरातील देवपूर या उपनगरात असलेल्‍या या मंदिरातील शेंदूर लेपीत आणि पद्मासनी बसलेली ही स्‍वयंभू देवी महाराष्‍ट्रासह मध्‍यप्रदेश, राजस्‍थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्‍याने येथे सतत वर्दळ असते.
 
भक्‍तांच्‍या संकटांना दूर करून त्‍यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्‍वयंभू अशी ही देवी असल्‍याची भाविकांची श्रध्‍दा आहे. आपल्‍या पराक्रमाने तिन्‍ही लोकी नावलौकीक मिळविलेल्‍या परशूराम या वीरपुत्राची जननी म्‍हणून आदिशक्‍ती एकवीरा देवी ओळखली जाते. एकवीरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्‍याची धारणा आहे. जमदग्‍नी ऋषींची पत्‍नी असलेल्‍या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीर पुत्र असल्‍याने या देवीस 'एक वीरा' असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकवीरा म्‍हणून रूढ झाले. कर्नाटक राज्‍यातही देवीचे मंदिर असून तेथूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
 
प्रभातकाळी पांझरेच्‍या पात्रातून उगवणा-या सुर्याची कोवळी किरणे जेव्‍हा पूर्वाभिमुखी असलेल्‍या या देवीच्‍या पायी लोटांगण घेतात तेव्‍हा हे दृश्‍य डोळयात साठवून घेण्‍यासारखे असते. यावेळी गाभा-यात सतत तेवत असलेल्‍या नंदादीपाच्‍या स्‍िनग्‍ध प्रकाशातही पद्मासनी बसलेल्‍या या आदिमायेचे अष्‍टभूजा रूप अधिकच उजळून दिसते. देवीच्‍या उजव्‍या बाजूस श्री गणपती व डाव्‍या बाजूस तुकाईमातेची चतुर्भूज शेंदूर लेपित मूर्ती आहे.
 
देवीच्‍या पायी नतमस्‍तक होण्‍यासाठी मंदिरात प्रवेश करताच अखंड दगडात कोरून काढलेले दोन भव्‍य हत्ती आपले स्‍वागत करतात. अतिशय प्राचीन असलेले हे मंदीर पूर्वी हेमाडपंथी होते. मात्र देवी अहिल्‍याबाई होळकर यांनी नंतर या मंदिराचा जिर्णोध्‍दार केला. या मंदिराच्या परिसरात भरपूर पाण्‍याची सोय व्‍हावी यासाठी त्‍यांनीच पायविहीर बांधली असून मंदीर परिसरात दोन दीपस्‍तंभही उभारले आहेत. त्‍यावर नगारखाना आहे.
 
मंदिराच्‍या परिसरात प्राचीन शमीवृक्ष असून वृक्षाखालीच शमीदेवतेचे भारतातील एकमेव मंदिर आहे. विजयादशमीच्‍या दिवशी भाविक येथे दर्शन घेऊन सिमोल्‍लंघन करीत असतात. या परिसरातच परशुरामाचेही मंदीर आहे. विस्‍तीर्ण पसरलेल्‍या मंदिराच्‍या परिसरात महालक्ष्‍मी, विठ्ठल-रुक्‍मीणी, शितला माता, हनुमान आणि काळभैरवाचेही मंदीर आहे. तसेच चार खोल्‍यांची धर्मशाळाही आहे.
 
मंदिराच्‍या जुन्‍या इतिहासासंदर्भात खान्‍देशच्‍या इतिहासाचे संशोधक डॉ.टीटी.महाजन यांनी सांगितले, की ब्रिटीश राजवटीच्‍या काळात 1818-19 च्‍या सुमारास कॅप्‍टन ब्रिग यांची धुळ्याचे पहिले कलेक्‍टर म्‍हणून नेमणूक केल्‍यानंतर त्‍यांनी 1821-22 च्‍या काळात त्‍यांनी येथे व्‍यापार पेठ वसवली. परगणे, लळींग व सोनगीर मिळून त्‍यावेळच्‍या धुळे शहराची निर्मिती केली गेली. मंदिरात नित्‍य नियमित दीवाबत्तीसाठी ब्रिटीश राजवटीत देवस्‍थानाला वार्षिक 29 रुपये मिळत असल्‍याचा उल्लेखही जिल्‍हाधिकारी कचेरीतील कागदपत्रांमध्‍ये आढळून येतो.
 
मंदिराच्‍या परिसरात नित्‍यनियमित पूजा अर्चा आणि आरती अभिषेक करण्‍यात येतो. तर पौर्णिमा आणि आमावस्‍येच्‍या आदल्‍या दिवशी (चतुर्दशी) देवीला पंचामृत स्‍नान करून अभिषेक केला जातो. नवरात्रोत्‍सवाच्‍या काळात येथे मोठा उत्‍सव आणि जत्रेचेही आयोजन केले जात असते.
 
कसे जालः
रस्‍ताः मुंबई-आग्रा आणि नागपूर-सुरत हे राष्‍ट्रीय महामार्ग धुळे शहरातून गेले आहेत. तर देवपूर हे शहरातील उपनगर आहे.
रेल्‍वेः मुंबईकडून येणा-या रेल्‍वेने चाळीसगावला आल्‍यास तेथून धुळे येथे येण्‍यासाठी दर तासाभरात रेल्‍वे उपलब्‍ध आहेत. तर भुसावळ-सूरत रेल्‍वे मार्गाने जवळचे स्‍टेशन नरडाणा आहे. नरडाणा स्‍टेशन मुंबई-आग्रा महामार्गावर आहे.
हवाई मार्गेः जवळचे विमानतळ नाशिक किंवा औरंगाबाद.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजू श्रीवास्तव यांनी हा शेवटचा कॉमेडी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता