भगवान विष्णूच्या मोहिनी अवतराला समर्पित एकमेव मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे. हे मंदिर मोहिनिराज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर म्हणनू ओळखलं जातं. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे.
मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंती स्थापत्यशैली असून विविध प्रकारच्या मुरत्या या नक्षीदार दगडावर आहेत. मंदिराचे बांधकाम उंचावर आहे तसेच प्रवेशद्वार उत्तर बाजूला आहे. मंदिराच्या भव्य गाभाऱ्यात श्री मोहिनीराजाची आर्कषक मूर्ती आहे. मूर्ती उंच सिंहासनावर विराजित असून हातात शंख, चक्र, गदा, अमृताची कूपी आहे. नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, पायात तोडे तर डोक्यावर मुकुट घातलेली साडे चार फूट उंचीची मोहिनीराजाची मूर्तीचे दर्शन घडल्यावर मन आनंदाने भरुन येतं. मूर्तीच्या शेजारी श्री लक्ष्मी विराजित आहे.
मंदिराचा इतिहास
समुद्रमंथन झाले तेव्हा 14 रत्ने बाहेर आली. त्यापैकी एक अमृत होते. अमृत कलश घेऊन धन्वतरी देवता प्रकट झाले. तेव्हा अमृत कलश बघून देवांना आणि राक्षसांना आनंद झाला. पण राक्षसांना अमृत मिळाल्यास त्यांना अमरत्व प्राप्त होईल म्हणून देवांना चिंता पडली. त्यावेळी दानव कलश हिसकावून पळू लागले तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले. त्यांनी सर्वांना मोहित करुन अमृत वाटपाचे काम हाती घेतले. त्यांनी देवाच्या पंक्तीला अमृताचे तर दानवांच्या पंक्तीत सुरा म्हणजेच मदिरेचे वाटप केले. ही गोष्ट राहूच्या लक्षात आली आणि ते देवांच्या पंक्तीत येवून बसले. मोहिनीरुप घेतलेल्या विष्णूंनी त्यांना अमृत दिले परंतु त्यांनी अमृत प्राशन केल्याक्षणी जेव्हा हा प्रकार विष्णूंच्या लक्षात आला, सुदर्शन चक्राने लगेच त्यांचे शीर छेदले गेले. राहूचे शीर उडून ज्या ठिकाणी जाऊन पडले त्या गावाला राहुरी असे नाव पडले. व काया म्हणजे धड जेथे पडले त्या ठिकाणाला कायगाव असे म्हणतात. तसेच श्री विष्णूंनी मोहिनीरुप घेवून अमृताचे वाटप केले ते ठिकाण म्हणजे नेवासे. म्हणून मोहिनीराज यांचे भव्य मंदिर नेवासे येथे आहे.
असे ही म्हणतात की मोहिनीरूप घेतल्यावरही देवांना विष्णू दिसतं होते तर दानवांना त्यांचे स्त्री रूप दिसतं होते म्हणून या मूर्तीचे वैशीष्टय म्हणजे हे अर्धनारी रूप आहे.