Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पुणे शहराच्या नैऋत्येला असलेला 'सिंहगड'

पुणे शहराच्या नैऋत्येला असलेला 'सिंहगड'
, मंगळवार, 14 मे 2019 (16:29 IST)
तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा किल्ला म्हणजे सिंहगड. पुणे शहराच्या नैऋत्येला सिंहगड हा किल्ला आहे. सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर या उपरांगेवार आहे. भुलेश्वराची उपरांग पुण्याच्या दक्षिणेला असून ती पुर्व पश्चिम अशी धावते. या रांगेमध्ये सिंहगड, सोनोरी आणि दौलतमंगळ असे तीन किल्ले आहेत.
 
सिंहगड हा डोंगरी किल्ला असून याचे भौगोलिक स्थान अतिशय महत्वाचे आहे. सिंहगडावर जाण्यासाठी काही वेगवेगळे मार्ग आहे. पुर्वीच्या काळात सिंहगडावर जाण्यासाठी दक्षेणेकडील कल्याण दरवाजा मार्ग वापरण्यात येत असे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला कल्याण नावाचे छोटेसे गाव आहे. तेथून हा मार्ग गडावर येतो. कोंढणपूर या पुर्व पायथ्याच्या गावातून दमछाक करणार्‍या वाटेनेही सिंहगडावर येता येते. उत्तरेकडील खानापूर येथूनही लांबच्या मार्गाने सिंहगडावर चढाई करता येते. सिंहगडावर जाणार्‍या या मार्गाशिवाय सर्रास वापरला जाणारा मार्ग म्हणजे उत्तर पायथ्याचा अतकरवाडीचा मार्ग. 
 
पुण्याच्या दिशेला असल्यामुळे सिंहगडाच्या या दरवाजांना पुणे दरवाजे असे नाव मिळाले आहे. हे एका पाठोपाठ काही अंतरावर असलेले तीन दरवाजे आहेत. वेगवेगळ्या कालखंडामध्ये बांधलेले हे दरवाजे कड्याच्या वर आहेत.
 
पहिला दरवाजा ओलांडून आपण दुसर्‍या दरवाजाकडे निघालो की डावीकडे तटबंदीमध्ये एक दिंडी दरवाजा (लहान दरवाजा) आहे. या दरवाजातून आत गेल्यावर आपण खंदकडा (खांदकडा ?) म्हणून असलेल्या भागात पोहोचतो. येथे तटबंदी व बुरुज आहे. हा सर्वात पुर्वेकडील भाग आहे. हा भाग बघून पुन्हा आपण दिंडी दरवाजातून येवून दुसरा दरवाजा ओलांडतो. येथून थोडीशी सपाटी आहे. या सपाटीच्या टोकाला तिसरा दरवाजा आहे. या दरवाजाचे बुरुज मोठे आहेत. दरवाजा पुढील काही पायर्‍या चढताच उजव्या बाजूला बालदखाना नावाची इमारत आहे. कड्याजवळच ही इमारत असून अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे.
webdunia
इंग्रजांनी १८१८ इ.स. मध्ये सिंहगडाचा ताबा घेतला. तेव्हा त्यांनी या इमारतीचा वापर चर्चसारखा केला. येथे जमून ते प्रार्थना करीत म्हणून त्यांनी ही इमारत नष्ट केली नाही. या इमारतीला दक्षिणोत्तर असे दरवाजे आहेत. उत्तरेकडील कड्यावरुन पुण्याचा विस्तृत प्रदेश नजरेच्या टप्प्यामध्ये येतो. खडकवासला धरणाचे दृष्य उत्तम दिसते. या इमारतीमधून पुन्हा आपण पायर्‍यांवर येतो. येथेच थोडेसे पुढे डावीकडे खडकात कोरलेला मार्ग आहे. या मार्गाने आत शिरल्यावर खडकात कोरलेली गुहा आहे. गुहेमध्ये खांब आहेत. हे पुर्वीचे कोठार असावे.सध्या याला घोड्याची पागा असेही म्हणू लागले आहेत. या कोठाराच्या वरुन दुरदर्शनच्या प्रक्षेपण मनोर्‍याकडे जाणारी वाट आहे. या वाटेने मनोर्‍याकडे निघाल्यावर डावीकडे अजून एक कोरलेली गुहा तसेच पाण्याचे टाके आहे. दुरदर्शनच्या मनोर्‍याला पुर्ण फेरी मारता येते. याच्या पुर्व टोकावरील बुरुजावर चढण्यासाठी पायर्‍या आहेत. या बुरुजावर उभे राहील्यास कोरीगड, तुंग, तिकोणा, मोरगिरी, लोहगड, विसापूर,भामचंद्र डोंगर. देहूरोड ते लोणी काळभोर पर्यंतचा विस्तृत प्रदेश तसेच भुलेश्वर रांगेमधील गोकूळ, वृंदावन, लक्ष्मी ही शिखरे, सोनोरीचा किल्ला, सासवड ते जेजुरी परिसर वज्रगड पुरंदी हे किल्ले, खंबाटकी घाट, रोहिडा किल्ला, रायरेश्वर पठार, राजगड, तोरणा असे किल्ले परिसरात पाहता येतात.
 
मनोर्‍याला फेरी मारुन आपण दक्षिणेकडे कड्यावर येतो. या कड्यावरुन चालताना दोन ठिकाणी पूर्वी बुरुज असल्याचे आढळते. या पहार्‍याच्या जागा होत्या. या बाजूचा कडा हा सरळसोट असल्यामुळे या भागात तटबंदीची उभारणी केल्याचे आढळत नाही. या कड्यावरुन खाली खेडेबोरे हे खोरे दिसते. या खोर्‍यामधून शिवगंगा नदी वाहते. कड्यावरुन चालत पुढे आल्यावर उजवीकडे राजसदरेची जागा आहे. त्याला लागूनच मैदान आहे. येथे जवळ तोफ ठेवलेली आहे. या मैदानाच्या परिसरात तात्पुरती उपहारगृहे उभारलेली आहे. या मैदानातून पश्चिमेकडे जाणार्‍या वाटेने निघाले की उजव्याबाजूला आपल्याला घुमटाकार छत्री दिसते. या छत्रीमध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचा अर्धपुतळा उभारलेला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचे स्मरण करुन सिंहगडावर येणारे सर्वजण येथे नतमस्तक होतात. गडाच्या मध्यावर हे स्मारक आहे. याच्या खालच्या बाजूला अमृतेश्वराचे प्राचिन मंदिर आहे. आतमध्ये सुबक मूर्ती आहे. या बाजूला पाण्याचा मोठा असा बांधीव तलाव आहे. अमृतेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशदारातून बाहेर पडल्यावर समोरच खालच्या बाजूला प्रसिद्ध असे देव टाके आहे. कड्यात असलेल्या या टाक्यावर पत्र्याचे आच्छादन घालून ते बंदिस्त केलेले आहे. एका बाजून दोरी व बादलीच्या सहाय्याने पाणी काढता येते. देव टाक्याचे पाणी थंडगार असून बारमाही आहे. १९७२ च्यादुष्काळामध्ये सुद्धा आजूबाजूला पाण्याचे दुर्भिक्ष असताना या टाक्याला अखंड पाणी होते. देव टाक्याकडून दक्षिणेकडे निघाल्यावर दोन वाटा फुटतात. चढावरची वाट जाते ती मोगलांचा किल्लेदार उदयभानूच्या स्मृतीस्थळाकडे तर डावीकडील खाली जाणारी वाट कल्याण दरवाजामध्ये जावून पोहोचते. एका पाठोपाठ असे भक्कम बांधणीचे हे दोन दरवाजे आहेत. हा गडाचा पुर्वीचा मार्ग होता. येथून उतरुन कल्याण गावाकडे अथवा राजगड तोरण्याकडे जाता येते.
 
कल्याण दरवाजा पाहून पुन्हा वर आल्यावर टेकाडाला वळसा मारुन नैऋत्येकडील बुरुजावर पोहोचता येते. या बुरुजावरुन गुंजन मावळातील राजगड आणि कानंद मावळातील तोरणा पहाता येतो. या भागातील कडे फार उंच नसल्यामुळे येथे विशेषकरुन तटबंदी उभारलेली दिसून येते. या तटबंदीकडून आपल्याला डोणागिरीचा कडा उत्तम प्रकारे दिसतो. हाच कडा चढून नरवीर तानाजी मालुसरे गडावर आले. सोबत दोनशे मावळे होते. कल्याण दरवाजातून सूर्याजी मालुसरे तीनशे मावळे घेवून गडावर पोहोचले. गडावर घनघोर युद्ध झाले. तो दिवस होता माघ वद्य नवमी, म्हणजे १६७० ची ४ फेब्रवारीची रात्र. चाळीत पन्नास मावळे व पाचशे रजपूत या युद्धात ठार झाले. तानाजी आणि उदयभान ही या युद्धात धारातिर्थी पडले. महाराजांना ही बातमी कळताच महाराज म्हणाले एक गड आला पण एक गड पडला. मात्र नंतरच्या काळामध्ये गड आला पण सिंह गेला हा वाक्प्रचार रुढ झाला. म्हणून 'सिंहगड' असे किल्ल्याचे नाव पडले, असा प्रवाद सुरु झाला. 
 
किल्ल्याचे सुरवातीस नाव होते कुंडीयाना, नंतर कोंढाणा. याचे नाव सिंहगड होते असे शिवपुर्वकालातील उल्लेख आहेत. यादव कालानंतर हा किल्ला बहमनीच्या राजवटीमध्ये होता. बहमनीची शकले झाल्यानंतर आदिलशहाकडे हा किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन वेळा हा किल्ला शत्रुकडून घेतला. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्युनंतर पुन्हा सिंहगड मोगलांकडे गेला. छत्रपती राजाराम महाराजांच्या वेळेस नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी पुन्हा सिंहगड जिंकून घेतला. छ. राजाराम महाराजांचा मृत्यु ३ मार्च १७०० मध्ये सिंहगडावर झाला. पुढे मोगल, छ.शाहू, पेशवे व नंतर इंग्रज राजवटीमध्ये सिंहगड होता. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी सिंहगड ताब्यात घेतला. तेव्हा त्यांना नुसता सिंहगडच मिळाला असे नव्हे तर संपत्ती ही मिळाली. ही संपत्ती जवळ जवळ ५० लाख रुपयांची होती. 
webdunia
सिंहगड किल्ल्याची मोहीनी अनेकांना पडली. अनेकांनी सिंहगड किल्ल्याला भेट दिल्याचे उल्लेख आहेत. यात प्रामुख्याने राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, छ . राजाराम महाराज, ताराराणी, बाळाजी विश्वनाथ भट, सेनापती धनाजी जाधव, मिर्झाराजा जयसिंग, औरंगजेब, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेकांचा समावेशआहे.
 
डोणागिरीचा कडा पाहून आपण पश्चिम टोकावरील कलावंतीनीच्या बुरुजावर पोहोचतो. येथुन पानशेत, वरसगांव तसेच खडकवासला धरणाचे उत्तम दृष्य पहायला मिळते. उत्तर कड्याजवळ समोरच्या बाजुला विश्रामगृह (एम.टी.डी.सी.) आहे. त्याच्या समोर एक शिल्प छोट्या झुडुपांच्या मध्ये आहे. हे शिल्प म्हणजे कोणी अनामिका सती गेल्याचे शिल्प आहे. हाताच्या चिन्हाचे हे शिल्प आहे. सिंहगडावर काही काळ रजपुतांचे वास्तव्य होते. तेव्हा कोणीतरी वीरपत्नी सती गेली असावी असे दिसते. येथून एक रस्ता सरळ थोडासा खाली कड्याकडे जातो. येथेच छ. राजाराम महाराजांचे स्मारक आहे. मोठी घुमटावजा ही वास्तु आहे. आतील बाजुस महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ असे आढळणारे गंडभैरुंडाचे शिल्प आहे. गंडभैरुंड म्हणजे दोन तोंडाचा काल्पनिक असा प्राणी आहे. जवळ पाण्याची टाकी व घराचे अवशेष आहेत. येथून वर चढून आल्यावर टेकाडावर कोंढाणेश्वराचे मंदिर आहे. गडावरील हे पुरातन मंदिर आहे. किल्ल्यावरील हे सर्वोच्च स्थान आहे. येथून किल्ल्याचा सर्व भाग दिसतो. आजमितीला सिंहगडावर अनेक खाजगी मालकीच्या वास्तु आहेत. यात लोकमान्य टिळकांचा ही बंगला आहे. या बंगल्याच्या दारात दोन तोफां आहेत. गडावर लहान मोठी अशी पाण्याची चाळीस एक टाकी आहेत. दुरदर्शनचा मनोरा, बिनतारी संदेशाचा मनोरा गडावर आहे. त्यामुळे सिंहगड हा खूप दुरुनही चटकन नजरेत भरतो. 
 
कोंढाणेश्वराचे दर्शन घेवून आपण गड उतरायला सुरवात करतो. पुन्हा तीन दरवाजे आपण ओलांडतो. येथून एक पाऊलवाट खाली अतकरवाडीकडे जाते. सरळ वाट वाहनतळाकडे जाते. आपण वाहनतळाकडे निघाल्यावर वाटेत एक भुयार लागते. या भुयारात पाणी आहे. याला सुरुंगाचे पाणी म्हणतात. वाहनतळाच्या परिसरामध्ये प्रस्तररोहण (रॉक क्लाईम्बिंग) करण्यासाठी उत्तम खडक आहेत. १५ ऑगस्ट २००८ पासून हा परिसर प्लास्टीकमुक्त करण्यासाठी प्लास्टीक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सिंहगड किल्ला साधारणपणे फिरण्यासाठी दोन तीन तास सहज पुरतात. येथील निसर्ग आणि जाज्वल्य इतिहासाच्या स्मृती मनात घेवूनच आपण परतीच्या प्रवासाला निघतो. 
 
कसे जालः पुण्‍याहून पुणे खडकवासला अतकरवाडी असा मार्ग आहे. पुण्यातून बससेवा उपलब्ध आहे. अतकरवाडीतून गडावर जाणारी पायवाट आहे. पुणे दरवाजामध्ये पोहोचण्यासाठी गाडी मार्गही आहे. अतकरवाडीच्या अलिकडे गोळेवाडीतून हा घाट रस्ता किल्ल्यावर जातो. पुणे सातारा मार्गावरील शिवापूर येथूनही कोंढणपूरला येवून गाडी मार्गाने पुणे ते सिंहगड अंतर ३० कि.मी. आहे.
 
साभारः महान्‍यूज

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फोटो कशाला लावतात?